अंधश्रद्ध अनाचार

Sthitapradnya
मराठी मिडिअम
2 min readAug 21, 2013

--

बऱ्याच दिवसात इथे मराठी लिहिलेले नाही. मनातील भावना समर्थपणे व्यक्त करण्यासाठी मातृभाषेला पर्याय नाही हेच खरं. मातृभाषेकडे परत पोचवणारा आजचा विषय तितकाच हेलावून टाकणारा. डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचा मृत्यू. ह्या क्षणी मन एकदम संमिश्र भावनांनी भरून गेलेले आहे. एका प्रखर बुद्धिवादी, विवेकी, विचारवंताचा अंत इतक्या निर्बुद्ध माणसांच्या हातून बळाने व्हावा ह्याबद्दलची चीड, आणि पुण्यासारख्या शहरात, हमरस्त्यावर गोळीबार करण्याची धमक पाहून वाटते आहे ती भीती.

मला दाभोळकरांच्या कार्याची समग्र माहिती नाही. त्यांच काही लिखाण वाचनात आलं आहे इतकंच. परिस्थिती मात्र जास्त गंभीर आहे. वैचारिक लढाईचा अंत हा कोणीतरी कोणालातरी आपले मुद्दे पटवून देण्याने किंवा दोघांनी सामोपचाराने दुसऱ्याच्या मताला आदर देण्याने होतो. ज्या क्षणी वैचारिक युध्द हे हातघाईच्या पातळीवर उतरते त्या वेळी त्यातील अर्थ निघून गेलेला असतो. आजही असंच झालं. जादूटोणा विरोधी ज्या विधेयकाचा दाभोळकर पुरस्कार करीत होते त्याने दुखावलेल्या काही शक्तींचा ह्यात हात असावा अशी प्राथमिक शंका आहे. ह्या वादांचे कितीही विच्छेदन जरी आता केले तरी गेलेले दाभोळकर परत येणार नाहीत.

ह्या घटनेने अजून एक मोठी समस्या प्रखर स्वरूपात सामोरी आली. सध्याची समाजाची असहिष्णू वृत्ती, कायदा सुव्यवस्थेबद्दलची अनास्था किंवा संपत चाललेली भीती. बालगंधर्व पुलाजवळ हा भ्याड हल्ला झाला. पुण्यातील अतिशय गजबजलेला हा भाग. मारेकरी दुचाकीवरून आले, ती रस्त्याच्या कडेला उभी करून त्यांनी दाभोळकरांची वाट पाहिली, त्यांचा पाठलाग केला, त्यांना तब्बल ५ गोळ्या मारल्या आणि आले तितक्याच शांतपणे ते दुचाकीवरून निघून गेले. कोणीही त्यांना आधी हटकले नाही आणि गोळीबारानंतर प्रतिकाराचा प्रयत्न पोलिसांकडूनही झाला नाही. हल्याच्या ठिकाणच्या अगदी जवळ नाकाबंदी सुद्धा होती आणि पोलिस ठाणे सुद्धा. प्रश्न असा की समाजकंटकांची कायद्याची भीती संपत चालली आहे का? ह्या सर्व घटनाक्रमाने काय सिध्द होते? जर पुण्यासारख्या विद्येचं माहेरघर मानल्या जाणाऱ्या, विवेकी आणि विद्वानांच्या शहरात अशी घटना घडू शकते तर बाकीच्या शहरांनी कोठे पहायचे?

आजकाल आपल्या धार्मिक भावना अगदीच नाजूक झाल्या आहेत. कुठलेही सडेतोड आणि प्रखर विधान आपल्याला लगेच प्रक्षोभक वाटू लागते. आपल्या भावना दुखावतात, आपण लगेच अश्या विधानांना, विचारांना मुळापासून उखडून टाकण्यासाठी झटतो. आजवर फक्त अश्या साहित्यावर, अश्या व्यक्तींवर बहिष्कार टाकून स्वतःची पाठ थोपटणारे आपण अचानक एक मोठंच पाऊल पुढे गेलो. पुरोगामी, वैचारिक, विवेकी अश्या शब्दांचेच वावडे आपल्याला आहे काय अशी भीती आता वाटते आहे.

दाभोळकरांनी आपल्याला समज दिली, विचार करण्यास शिकवले. फार नाही तरी अगदी प्रश्न विचारण्यास आणि चौकस होण्यास शिकवले. ही विचारसरणी माणूस संपला तरी संपत नसते. तर्कशुद्ध आणि बुद्धिवादी ह्या शब्दांनी एक जीवनशैली तयार होते, ती अंगी बाणवणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली होईल असे वाटते.

Originally published at harshalbhave.in on August 21, 2013.

--

--