उपमा

Sthitapradnya
मराठी मिडिअम
1 min readApr 27, 2014

न्हालेल्या जणू गर्भवतीच्या, सोज्वळ मोहकतेने बंदर
मुंबापुरीचे उजळीत येई, माघामधली प्रभात सुंदर

बा सी मर्ढेकरांचे शब्द. मला आठवतंय ही कविता आम्हाला शालेय अभ्यासक्रमात होती. त्यावेळी आमची अक्कल गुडघ्यातच. कवितेच्या ओळींकडे लक्ष द्यायचा सोडून आम्ही आपले बा सी मर्ढेकरांवर हसण्यात वेळ घालवायचो. त्यांच्या नावाचे शक्य तेवढे विचित्र उच्चार करण्यात संपून गेले ते वर्ष.

आज सकाळी न्याहारी करून येताना गाडी चालवणारी एक सुस्वरूप मुलगी दिसली. काचांमधून फक्त दिसला तो चेहरा. नुकतीच आंघोळ झालेला, केस किंचित ओलसर, फारसे न विंचरलेले, थोडेसे अस्ताव्यस्त. बहुदा कुठे तरी घाई घाईने जात असावी. तिला पाहिलं आणि अचानक शाळेतली ही कविता आठवली.

त्या वेळी फक्त भंकस करून आणि विचारलेल्या प्रश्नांची एका वाक्यात उत्तर देऊन मार्क मिळवण्यात धन्यता मानलेली आम्ही. ती भावना कधी कळलीच नाही. मर्ढेकर मुंबईच्या बंदराला कसली उपमा देतात? नुकत्याच आंघोळ झालेल्या गर्भवतीची. झाले मिळाले २ गुण. ना भाषा विषय कधी नीट शिकलो ना कधी त्याचा आनंद घेत तो समजावून घेतला. मार्कांच्या गणिताने बरंच वाटोळं केलं आहे खरं.

आज तिला पाहिलं आणि मर्ढेकरांची भावना कळली. नुसती कळली नाही तर आतवर जाऊन भिडली. असं वाटतंय की परत एकदा शाळेची पुस्तकं उघडावीत आणि प्रश्नोत्तरांचा विचार न करता, एकदा परत ती अनुभवावी.

Originally published at harshalbhave.in on April 27, 2014.

--

--