बग

Kedar Marathe
मराठी मिडिअम
5 min readNov 22, 2017

फोन वाजला. उचलला. पलीकडे बॉस होता.

“अरे अमुक अमुक जरा अर्जंट सुट्टीवर गेलाय. तमुक तमुक ठिकाणी जाऊन त्याचं अर्धं राहिलेलं असं असं काम कर ना जरा”

मी उठलो. बॉसला मनात दोन शिव्या घातल्या. कपडे बदलून गाडी काढली आणि सांगितलेल्या पत्त्याकडे जाऊ लागलो.

पोचलो तेंव्हा रात्रीचे ९ वाजले होते. मी एका मोठ्या सोसायटीसमोर उभा होतो. एक आळसावलेला रखवालदार जीर्ण खुर्चीवर बसून जागं राहण्याचा आटोकाट नाही तरी मनापासून प्रयत्न करत होता. आत छोटी पोरं सायकली चालवत होती. काही वेळापूर्वी बचाबचा खाल्लेले आणि ढेऱ्या सुटलेले लोक स्वत:ला दिलासा देण्यासाठी शतपावली करत होते. एक दोन तरुण पोरी जर्कीन घालून फोनवर बोलत बाकड्यांवर बसलेल्या होत्या. पलीकडे घसरगुंड्या आणि झोपाळ्यांवर आया आणि पोरांची गर्दी होती. वगैरे.

मुंडेन.

गाडीतून उतरून मी सूट आणि टाय व्यवस्थित केला आणि या सगळ्याकडे जमेल तितकं लक्ष न देता पटापट चालत लिफ्टकडे निघालो. लिफ्टच्या कॉरीडॉरमध्ये एक दिवा फ्लिकर होत होता. झटकन मान वर करून मी त्याच्याकडे पाहिलं. वायरिंगमधला प्रॉब्लेम. सहज सोडवता आला असता, पण ते माझं काम नव्हतं. थोडंसं हसत मी लिफ्ट बोलावण्याचं बटन दाबलं. १५व्या मजल्यावरून लिफ्ट हळूहळू खाली येऊ लागली. खरं तर मला जायचं होतं तिथे म्हणजे आठव्या मजल्यावर मी सहज उडतही जाऊ शकलो असतो, पण तशी पॉलिसी नव्हती. हातातली ब्रीफकेस मी खाली जमिनीवर ठेवली आणि दोन्ही हात वर करून एक जोरदार आळस दिला.

माझ्याजवळची स्पेशल किल्ली काढून मी आठव्या मजल्यावरच्या त्या घराचा दरवाजा ढकलला तेव्हा सव्वानऊ झाले होते. आतमध्ये काहीतरी मेजर राडा असणार याची अपेक्षा होतीच पण दार उघडल्यावर समोर जे दिसलं त्याने नाही म्हणलं तरी थोडं आश्चर्य वाटलंच. दारापासून थोडंसं आत लगेच जमिनीवर एक ट्रेकिंगला वापरतात तसा एक मोठा खिळा ठोकलेला होता. तो जवळजवळ अर्धा स्लॅबमध्ये घुसलेला होता. आजूबाजूची फारशी तडे जाऊन फुटली होती. खिळ्याला एक दोरखंड बांधलेला होता आणि त्याचं दुसरं टोक थेट समोरच्या टेरेसच्या कठड्यावरून खाली गेलेलं होतं. पुढे काहीतरी वजनदार लटकवलेलं होतं हे त्या दोरखंडाच्या टेन्शनवरून लक्षात येत होतं. ते काय असेल ते ओळखणं फार अवघड नव्हतं.

“वाचवा! प्लीज….इथे इथे…” कोणीतरी ओरडत होतं. दोरीच्या पलीकडच्या टोकावरून. हॉलमधला टीव्ही चालूच होता. सोफा रिकामा. समोर टीपॉयवर पिझ्झाचं कार्टन होतं. आत एक अर्धा खाल्लेला पिझ्झाचा तुकडा होता. शेजारी टीव्हीचा रिमोट. सॉसचे पाऊच खाली पडले होते. ओरिगानोचे रॅपर आणि ते सॉसचे सॅशे मी दार उघडल्यामुळे मागून वारा येऊन गॅलरीकडे उडाले. शांतपणे चालत मी टीपॉयजवळ गेलो. रिमोट उचलून टीव्ही बंद केला. त्या माणसाचं ओरडणं आता जरा जोरातच वाटू लागलं.

गॅलरीत जाऊन खाली डोकावलो. दोरखंडाचं दुसरं टोक त्या माणसाच्या घोट्याला बांधलेलं होतं. गाठ व्यवस्थित नव्हती. हळूहळू सुटत होती. थोडाथोडा करून तो खाली घसरत होता. त्याच्या बरोब्बर खाली जमिनीवर पोरं झोपाळे खेळत होती. काही वेळाने तो त्याच्या अंगावर पडणार होता. स्वतः मेलाच असता, वर एक दोघांना घेऊन गेला असता.

झकास.

खरं तर त्या मजल्याच्या अगदी बरोब्बर खालीच मुलांच्या खेळण्याची जागा का होती ते मला समजलं नाही. थोडी पुढे हवी होती. उद्या कोणी गॅलरीतून काहीही भिरकावलं तरी ते तिथेच पडलं असतं. मी पटकन एक नोटपॅड काढून हा मुद्दा लिहून घेतला. या माणसाचं ओरडणं अगोदर बंद करायला हवं होतं. आत्ता कोणी काही बोलत नव्हतं पण हे रात्रभर चालू राहिलं असतं तर नक्की कोणीतरी तक्रार केली असती. मी पटकन बॅगमधून एक ट्रँक्विलायजर गन काढली आणि एक बाण त्या माणसाच्या पोटात मारला. पाचेक सेकंदात तो बेशुद्ध झाला. ओरडणं थांबल्यामुळे मलाही जरा शांत वाटू लागलं.

माणूस तसा अंगापिंडाने मजबूत होता. १००एक किलो तरी असेल. त्याला वर खेचून घेणं मला एकट्याला शक्य नव्हतं. बाहेरून कोणाला बोलावणं पॉलिसीमध्ये बसत नव्हतं. ऑफीसमधूनही कोणी आत्ता या वेळी मदतीला येणं अवघडंच होतं. थोडक्यात माझा सहकारी उद्या सुट्टीवरून परत येईपर्यंत हा मनुष्य असाच व्यवस्थित लटकत राहील याची काळजी मला घेणं भाग होतं.

हं!

मी पटकन परिस्थितीचा आढावा घेतला. त्याच्या वजनाने तो दोरखंड गॅलरीच्या कठड्यावर काचेला जाऊन जरा फाटू लागला होता. ब्रीफकेस मधून एक फाईल(कागदाची नाही, वर्कशॉप मधली) काढून मी गॅलरीच्या कठड्याचा एक भाग थोडासा गुळगुळीत केला आणि मग तो दोरखंड थोडासा सरकवून तिथे आणून ठेवला. दाराजवळचा खिळा सिमेंटमध्ये ठोकला होता. सहज बाहेर निघाला नसता, तरी त्याला मी ब्राऊन सेलोटेपचे २-३ वेढे दिले आणि सेलोटेप जवळच्या जमिनीला आणि भिंतींना चिकटवली. इथलं काम तर आता झालेलं होतं.

बाहेर येऊन मी लिफ्ट बोलावली. खाली जाऊन गाडीमधून एक शिडी घेऊन आलो आणि तडक सातवा मजला गाठला आणि लटकणाऱ्या माणसाच्या घराच्या बरोबर खालचा जो फ्लॅट होता त्याची बेल वाजवली. एका बाईने दार उघडलं. तिला माझं आयकार्ड दाखवून मी आत गेलो. आत तिचा नवरा बनयन घालून एक पाय वर घेऊन खुर्चीत बसला होता. ऐसपैस. टीव्हीवर बातम्या चालू होत्या. बाईच्या हाताला साबण होता. ती आत भांडी घासत असावी. तिने साबणाच्याच हाताने कपाळावरची एक बट सरकवली, मग गाऊनला हात पुसले आणि माझं आयकार्ड नीट लक्ष देऊन पाहिलं.

“कोणे गं?” काखा खाजवत तिचा नवरा आतमधून ओरडला. ती थोडी लाजल्यासारखी झाली आणि कार्ड मला घेऊन पटकन नवऱ्याजवळ गेली. मागून हळूहळू चालत मीही गेलो. आता नवरा उभा राहिला होता आणि त्रासिक तोंड करून माझं कार्ड पाहत होता. बाई काहीच न कळून उगीच हँग होऊन तिथे उभी होती.
“झाली का भांडी?” नवऱ्याने तिच्याकडे न पाहताच विचारलं. लगबगीने ती आत निघून गेली. मी ती जाईपर्यंत तिची पाठमोरी आकृती पाहत राहिलो.
“बोला! काय काम?” नवऱ्याने टीव्हीचा आवाज थोडा कमी करत विचारलं.
“तुमची गॅलरी ५ मिनिटं हवी होती” मी किचनकडे पाहतच उत्तर दिलं. आता ती दिसत नव्हती. पण नळ आणि भांड्याचा आवाज मात्र येत होता. एक हुंदकाही ऐकू आल्यासारखा वाटला. मी कान टरकावले.

“गॅलरी इथे आहे. आत नाही!” नवरा तिरकस बोलला. त्याला माझं लक्ष कुठे आहे हे समजलं असावं. बॅगमधली बंदूक काढून याच्या डोक्यात एक गोळी घालावी आणि आतमधल्या बाईला मुक्त करावं असा एक बंडखोर विचार डोक्यात येऊन गेला. किती वय असेल तिचं? ३०? ३२?

मी मान जोरजोरात हलवून विचार झटकले. वाहावत जाऊन चालणार नव्हतं. आपला काय संबंध आहे असाही तिच्याशी? मी टाय सरळ केला आणि गॅलरीकडे निघालो.

“तुम्ही गॅलरी वापरताय तोवर घरातलं काही बंद नाही पडणार ना?”

“नाही”

“नाही, पडलं तरी चालेल. फक्त टीव्ही चालू असूद्या” जणूकाही घरात तो एकटाच होता.

“नाही. गॅलरी आयसोलेटेड असते. तिचा आणि घरातल्या इतर गोष्टींचा काही संबंध नाही” मी त्याला समजावलं. लोक असे बावळट प्रश्न नेहमीच विचारतात. अशा वेळी त्यांच्यावर चिडून चालत नाही. पॉलिसी….

गॅलरीत गेलो. शिडी लावली. चढलो. लटकणाऱ्या माणसाच्या पोटाजवळ माझं तोंड आलं. खिशातून तीच ब्राऊन सेलोटेप काढली आणि दोरखंड जिथे त्याच्या घोट्याला बांधला होता तिथे ८-१० वेळा गुंडाळली. आता गाठ सुटण्याचा धोका नव्हता. मग त्याला मी हलकासा धक्का देत बिल्डीन्गच्या भिंतीवर टेकवलं आणि त्याची मांडी आणि भिंत सेलोटेपने चिकटवून टाकली. सेफ साईड म्हणून.

खाली उतरलो, शिडी मिटली आणि काखेत घेऊन दरवाजाकडे जाऊ लागलो. नवरा टीव्हीत मग्न होता. काही न बोलता बाहेर निघालो. किचनकडे एकही कटाक्ष न टाकता.
जिन्याने वर जाऊन वरच्या मजल्याला कुलूप घातलं. पुन्हा खाली जाऊन गाडीत बसलो तेंव्हा सव्वादहा वाजले होते.
काचा बंद जाऊन बॉसला कॉल लावला.
“एक वर्कअराउंड दिलाय करून सर. बाकीचं उद्या सकाळी होईलच”

“काय केलंस?”

“सध्या सेलोटेप वापरून जखडलाय”

“ग्रॅव्हिटी ऑफ करून वर का खेचलं नाही त्याला?”

“सर ते आत्ता शक्य नव्हतं. सर्व लोक घरातच होते. खाली पोरं झोपाळे खेळत होती. ग्रॅव्हीटी बंद केली असती तर हवेत उडाली असती. खाली आणायला परत त्रास!”

“कारणं द्या तुम्ही फक्त. चल ठीके”

“सर…..”

“हं?”

“परत दुसऱ्याच्या कोडमधले बग काढायला मला सांगू नका. हे इफ-एल्स डीबगिंग मला आवडत नाही”

“…..”

“…..”

फोन कट.

एक उसासा टाकून मी गाडी चालू केली आणि क्लच सोडत पहिला गिअर टाकला.

--

--