भीती

Sthitapradnya
मराठी मिडिअम
4 min readDec 20, 2009

--

माझा मराठीत कथा लिहायचा हा प्रथम प्रयत्न. चूकभूल माफ असावी…:)

तिला जरा जास्तच उशीर झाला होता आज. नाही म्हणजे कामं काय असतातच सारखी पण म्हणून रात्रीचे साडे-अकरा ? तरी बरं की तिच्या बॉस ने तिला घरापर्यंत सोडण्यासाठी वाहन पाठवलं होतं. ती तशी कार्यालयापासून दूर राहायची. तब्बल एक तास लागायचा तिला घरी पोहोचायला. आता रहदारी कमी जरी धरली तरी चाळीस मिनिटांच्या आत काही ती पोहोचू शकणार नव्हती. तिने गाडीवाल्याला फोन लावला आणि मुख्य गेट वर वाट बघत उभी राहिली. गाडीवाला तसा तिच्यासाठीच थांबला असावा. कारण तिने फोन केल्यावर तो लगेचच आला तिला न्यायला.

त्यांचा नेहमीचा ओळखीचा माणूस होता तो. तो आल्यावर पटकन बसली ती आणि गाडी निघाली. प्रचंड थकवा आला होता तिला. कामाचा तिचा उरक चांगला असला तरी सध्या तसं सगळ्यांनाच काम बरंच होतं, वर्षाअखेरच्या गोष्टी, संपता संपत नव्हत्या. गाडीत बसल्या बसल्या तिने आधी घरी फोन केला नवऱ्याला, आपण निघालोय हे तिने सांगितलं, छोटा गुड्डू झोपला का हे पण विचारून घेतलं. फोन झाल्यावर तिने तो मांडीवर ठेवला आणि खिशातून तिचा नेहमीचा iPod काढला. लताच्या सुंदर आवाजात तिला शांत झोप कधी लागली हे कळलंच नाही.

जरा वेळानंतर तिच्या driver ने हाक मारून तिला उठवलं. जराशी झोप लागते असं वाटत असतानाच त्याने हाक मारल्यावर साहजिकच वैतागली ती. कामाचा त्रास जास्तच होता म्हणायचा. हा हा म्हणता तिच्या घराजवळ आलीच होती ती. अंमळ एक किलोमीटर रस्ता उरला होता. तिचा driver म्हणाला की गाडीचा चाक पंक्चर झालंय, आणि तिला थोडं थांबावं लागेल. कधी एकदा घरी पोहोचतेय असं झालं होतं अगदी तिला. तिने त्याला जायला सांगितलं आणि एकटीनेच चालत जायची तयारी दाखवली. त्याची पण शेवटची फेरी असावी, त्यात हा गोंधळ; तिने त्याला मोकळं केल्यावर खूष झाला तो.

तिने चालायला सुरुवात केली आणि मग तिच्या लक्ष्यात आलं की आपण हे बऱ्याच रात्री फिरण्याचं धाडस केलंय हे. तोपर्यंत रात्रीचे बारा वाजले होतेच. रस्ता तसा सामसूम आहे हे जाणवल्यावर तिने भरभर पावलं उचलायला सुरुवात केली. तेवढ्यात तिला पाहिमागे कोणाची तरी चाहूल जाणवली. रस्त्यावरच्या दिव्यांच्या प्रकाशात कोणाचीतरी सावली तिने पहिली. आता मात्र तिला धडकी भरली. कुठून दुर्बुद्धी सुचली आणि त्या driver ला जायला सांगितलं असं वाटायला लागलं तिला.

तिला जेवणाच्या वेळेच्या गप्पा गोष्टी आठवल्या. कोणीतरी कोणावरतरी दररोजच हल्ले करत असतंच. सकाळच्या चहासारख्या त्या वर्तमानपत्रातल्या बातम्या पण पटकन जिरून जातात. दोन क्षण दुःख व्यक्त करण्याखेरीज कुठे काही करतो आपण. काहीही झालं तरी असं काही आपल्या बाबतीत होईल अशी शंका पण शिवत नाही आपल्या मनाला. सगळ्या तत्सम बातम्या तिच्या डोळ्यासमोरून झरझर सरकायला लागल्या. अजून फक्त अर्ध अंतर कापलं होतं तिने. हातात पकडलेला iPod तिने कसाबसा पिशवीत कोंबला आणि चालण्याचा वेग अजूनच वाढवला. iPod काढल्यावर तर रात्रीची शांतता अजूनच भयाण वाटत होती.

तिच्या मनात आधी तिच्या घरचे विचार येऊ लागले. माझा गुड्डू झोपला असेल शांत, त्याला काय माहित त्याची आई पोहोचते आहे की नाही घरी. काहीही काय बरळतेस, काही होणार नाही तुला. पटपट चालत राहा फक्त. तिच्या मनाची पार द्विधा अवस्था झाली होती. काहीच सुचत नव्हत तिला. हे अजून जागे असतीलच वाट बघत. त्यांना फोन करू असं तिला जाणवलं आणि तिने फोन साठी पिशवीत हात घातला. कुठे गेला फोन, काही केल्या तिला सापडेना. शेवटी ह्यांना फोन केल्यावर गाडीतच विसरले बहुदा मी हे जाणवल्यावर अजूनच गर्भगळीत झाली ती. आता कसं होणार माझं. हे अगदी असे हाकेच्या अंतरावर आहेत पण त्यांना सांगू कसं. अवसान गळाल्यागत झालं होत तिचं. मागच्या व्यक्तीच्या चपलांचा आवाज जरा जवळ आल्यासारखा वाटला तिला. अजून एका रस्त्यावरच्या दिव्यानं मागच्या व्यक्तीची सावली आणखीनच गडद केली. तिच्या मनानं रीतसर कामं करणं बंदच केलं होतं एव्हाना.

ओ madam अशी त्या व्यक्तीने हाक मारली, पण मागे वळून पाहण्याची सुद्धा तिची हिम्मत झाली नाही. तिने चालण्याच्या ऐवजी आता पळायला सुरुवात केलीच होती. दूर तसा तिला तिच्या घरातला उजेड दिसू लागलं होता. तिने धावण्याचा वेग अजूनच वाढवला. कशीबशी ती घरापर्यंत पोहोचली, घराची बेल वाजवण्याचं पण तिच्या ध्यानात आलं नाही. तिने जोर जोरात दरवाजा ठोठावायला सुरुवात केली. आतून दार उघडलं जाताच, घामाने डबडबलेली ती आत गेली आणि दरवाजा धाडकन बंद केला. अगं काय झालं, ठीक आहेस का तू असे प्रश्न तिच्या कानावर पडत होते पण फारसा काही अर्थबोध त्यातून होत नव्हता. धाप लागली होती तिला पळून पळून. ती काही बोलणार एवढ्यात दरवाज्यावर कोणाचीतरी थाप पडली.

श्वास घेत काहीतरी बोलायचा प्रयत्न करायच्या आधीच तिच्या नवऱ्याने दार उघडलं,

“वो ! थांबा की बाई. कवाधरनं झालं घसा फाड्तोय म्या. म्या असं तिथं फुटपाथवर झोपलो व्हतो. आन ह्यो बाईसाहेब उतरल्या की गाडीमदून चालू लागल्या की बिगीबिगी. म्या बघितला की त्यंचा काहीसं पडलाय हो खालती. उचलला तर ह्यो फोन. म्या वराडतोय, आन ह्यांच्या कानांत त्या वायरी घातलेल्यान. आन माझं ऐकणार कश्या ह्या. हाक मारत माग पळतोय म्या अन ह्या अजुनच पळतायत की व्हो. कुठनं अवदसा आठवलीन अन झोपेचं खोबरं केलान मी सोताच्या”

त्यानी तो फोन जवळच्या टेबलावर आदळला आणि तरातरा निघून गेला.

Originally published at harshalbhave.in on December 20, 2009.

--

--