मैफिल

Sthitapradnya
मराठी मिडिअम
3 min readMay 13, 2014

एक वाडा. जुना, चौसोपी. शंभराच्या वर पावसाळे पाहिलेला. त्यात लक्ष्मी-नृसिंहाचं एक जुनं मंदिर. आज प्रकाशाने न्हाऊन निघालेलं. फुलांची मोहक आरास ल्यालेली त्यातली मूर्ती. गाभाऱ्यासमोर सभामंडप, त्याचे उंच गेलेले लाकडी भरभक्कम वासे. लोकांची लगबग, पुढे एक रिकामा स्वरमंच, गायकाची वाट पाहत आसुसलेले चेहरे. ८ वाजण्याच्या आसपास लोकांची चुळबुळ. हळूच मनगटावरच्या घड्याळाकडे टाकलेले कटाक्ष. फार नाही तरी २०० च्या आसपास जमलेला श्रोतृवृंद. एकमेकांत कार्यक्रम कसा होईल याबद्दल गप्पा. मधेच ध्वनिसंयोजकांची धावपळ. ध्वनिवर्धक स्वरमंचावर आपल्या जागी जाउन स्थिरावलेले, सेवेसी तत्पर. इतक्यात तानपुऱ्यांचे आगमन झाले आणि सर्वजण कलाकारांसाठी शोधू लागले.

प्रथम आले ते संवादिनी वादक, सुयोग कुंडलकर, स्वतःच आपले वाद्य उचलून मध्ये बसलेल्या लोकांना जरासं बाजूला होण्याची विनंती करत, हसतमुख. त्यामागाहून तबलावादक भरत कामत आणि आनंद गंधर्व आनंद भाटे ह्यांचं एकत्रच आगमन झालं. जागा किंचीतशी अपुरी वाटत होती. सवाई गंधर्व महोत्सवाच्या विशाल कलामंचावर प्रचंड मोठ्या जनसमुदायासमोर कला सदर करणारे हे तिघे अगदी सहज तेवढ्या जागेत सावरून बसले. घरचा माहौल. मिनिटकाटा हळूच ०८:१५ च्या पुढे गेलेला होता. फार वेळ न दवडता, यजमान अभिजित जोशी यांनी गुलाबाच्या फुलांनी कलाकारांचं स्वागत केलं. पुण्यातले कलाकार, जुन्या ओळखी आणि घरचं वातावरण, साधेपणा आणि मोकळेपणा.

आनंद भाटे यांनी मारू बिहाग ने सुरुवात केली ‘रसिया आओ ना, नां जाओ’ हे ख्यालाचे बोल. हळूहळू जसजसा आवाज चढत गेला तशी मैफिलीत रंगत येऊ लागली. पुढे द्रुत मध्ये त्यांनी ‘तडपत रैन दिन’ सादर केलं. त्याहून पुढे राग अभोगी मध्ये प्रवेश केला. ‘चरण धर आयो’ हा विलंबित आणि नंतर ‘लाज रखो मोरी’ हे द्रुत मधले बोल. सुरांना खेळवत मोठ्या नजाकतीने त्यांची अदाकारी सुरु होती.

पूर्वी मला विलंबित ख्याल ऐकणे अगदी नकोसे वाटे . सुतराम काही कळत नसे. आजही तांत्रिकदृष्ट्या कोरडा पाषाण जरी असलो तरी, तालाचं गणित कुठेतरी मनात बसू लागलेलं आहे. विलंबित ख्याल खुलवत नेण्याची गायकाची मोहक अदाकारी आता कधीकधी द्रुत तानांपेक्षा जास्त भुरळ घालते. त्यात समोर आनंद भाटे. स्वरभास्कर भीमसेन जोशींचे शिष्योत्तम. एक तान अंगावर काटा आणे तर मधेच एखादा हळवा स्वर अगदी अलगद मनात उतरून जाई. शास्त्रीय गायन अगदी संपू नये असंच वाटत होतं. पण काही झालं तरी घड्याळ कोणासाठी काही थांबत नाही. वेळेची आज्ञा पाळत शास्त्रीय संगीताकडून पुढे नाट्यसंगीताकडे वळण घेतलं.

नाट्यसंगीत हा तसा सर्वसामान्यांना आवडणारा प्रकार. शास्त्रीय संगीताची सुरेल बैठक आणि त्यावर भावनांचा तरल अविष्कार. गाणं सुद्धा फार मोठं नाही, आणि फार लहान नाही. शास्त्रीय संगीतातील गोडी उमजायच्या आधी, बरेच वेळा कानावर पडलेलं, आणि मनापासून आवडलेलं. कधी वाटत की भावगीत, त्यानंतर सुगम संगीत, मग नाट्यसंगीत आणि अखेरीस पूर्ण शास्त्रीय असा हा प्रवास असावा. जसे जसे पुढे जाता तसे शब्द विरतात आणि भावना केवळ स्वरांनी अधोरेखित होते. हेच पहा ना. जसं जसं ही स्वराची शिडी चढू लागतो तसं, सरळ उच्चारलेले शब्द अधिकाधिक स्वरमय होत जातात.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धाची सुरुवात झाली ती प्रभू मजवर कोपला ह्या गाण्यानी. नृसिंह जयंती सोहळ्यात, प्रभूच्या कोपाने, थोड्या दुःखी गाण्याने सुरुवात करणं मला थोडं विचित्र वाटलं पण असो. त्यापुढे एक एक सुरेख पदं सादर करत मैफिल सुरेख होत गेली. सुयोग कुंडलकर आणि भरत कामत दोघेही कसलेले. वर्षानुवर्षाचा अनुभव आणि कमावलेली स्वरांवरची पकड. संवादिनी अगदी गायकाशी आणि श्रोत्यांशी जणू संवादच करत होती. अशी पेटी ऐकली की पेटी हा शब्दच अपुरा वाटू लागतो, संवादिनी मधला अर्थ कळू लागतो. त्यांनी गायलेली काही पदं मी ध्वनिमुद्रित करून घेतली, प्रताधिकार भंग वगैरे करण्याचा हेतू नाही, त्याहून काही मिळावं तर एक दोन जणांना अभिजात संगीताची ओळख व्हावी आणि आवड वाढावी इतकंच.

सुरेख समाधीत असताना भैरवीचे बोल कानावर पडले आणि जाणवल की वास्तवात परत यायची वेळ झाली. जो भजे हरी को सदा या भैरवीने रात्री ११ नंतर मैफिलीचे समापन झाले. मी मैफिल म्हणण्याचं एक कारण आहे. आजवर मी सवाई, वसंतोत्सव आणि स्वरबहार सारखे कार्यक्रम आवर्जून ऐकले. त्याचा आनंद घेतला पण YouTube वर जुन्या वसंतरावांच्या, भीमसेनजींच्या मैफिली ऐकतो तेंव्हा एक वेगळीच जाणीव होते. माफक श्रोतृवर्ग असला की, आपसूकच रंगमंच आणि श्रोते ह्यांच्यात अधिक जवळीक निर्माण होते. ते सवाई मध्ये शक्य नाही. सवाई सारख्या व्यासपीठाचे स्वतःचे असे बरेच फायदे आहेत पण, वैयक्तिक स्पर्शाचा थोडा अभाव जाणवतो आणि तो अश्या कार्यक्रमात पुरेपूर असतो.

कार्यक्रम संपल्यावर मी तीनही कलाकारांना जाऊन भेटलो त्यांचे आभार मानले आणि मनात भैरवीचे सूर घोळवत तिथून निघालो. पाहू पुनश्च असा योग कधी येतो ते. तोवर iPod आहेच.

Originally published at harshalbhave.in on May 13, 2014.

--

--