फ़ितरत

Sthitapradnya
मराठी मिडिअम
2 min readApr 20, 2014

सूरज में लगे धब्बा, फितरत के करिश्मे है |
बुत हमको कहे काफ़िर, अल्लाह की मर्ज़ी है |

कधी असाच बसलो होतो, गुलाम अली साहेबांच्या गझल ऐकत. त्यातली एक ‘हंगामा है क्यो बरपा, थोडीसी जो पिली है’ सुरुवातीला अगदी साधे शब्द, सहज कळणारे. अकबर अलाहबादी ह्यांचे शब्द सहज उमजणारे आणि बहुदा एकच सरळ अर्थ असणारे. हे पहिल्या कडव्यापर्यंत ठीक होतं. मी वर दिलेला शेर म्हणजे दुसरं कडवं आहे. त्यातली नजाकत आणि दुर्दैव समजायला खरंच थोडीशी घ्यावी लागते असं वाटतं.

समजण्यास अगदी सोप्पी आहे. सुर्यावरही डाग पडू शकतो आणि पडला, हे तर निसर्गदत्त म्हणायचं. अजून काय उत्तर देणार त्याला, कशी उकल करणार ह्या असामान्य गोष्टीची. तेजोनिधी लोहगोल तो त्यावरही डाग? सर्वसामान्यत्वाच्या पलीकडे असलेल्या त्या आकाशीच्या ताऱ्यावर पण डाग? दैवाने कोणाला सोडलेलं नाही. कोणी त्याच्यापासून दूर जाऊ शकलेला नाही, ते तर साक्षात सुर्यनारायणालाही चुकलेलं नाही. असीम शक्ती ही नाही तर अजून कुठली? अकबर अलाहबादी त्याला करिष्मा म्हणतो, चमत्कार. ही मोठी गोष्ट सांगून आपल्याला गोष्टींचा मोठा आवाका ध्यानात आणून देऊन मग झटकन तो अगदी वैयक्तिक पातळीवर येतो.

काफीर म्हणजे इस्लाम धर्मानुसार, इस्लाम न मानणारा. अल्लाह न मानणारा. आणि इस्लाम धर्मात मूर्तीपूजेला मज्जाव आहे. मूर्तीपूजा मानणारे म्हणजे ते काफिर. इथे अकबर साहेब काय म्हणतात, बुत म्हणजे एक मूर्तीच मला काफिर म्हणते आहे. मी दारूच्या इतक्या आहारी गेलो की मला अधर्मी गोष्टी सुद्धा अधार्मिक म्हणू लागल्या? माझी पातळी मी एवढी सोडली? आणि दाद मागावी तरी कोणाकडे? पाहतो तर ही अल्लाहचीच मर्जी आहे. काय राहिलं आता माझ्या आयुष्यात? माझ्या देवाने मला धिक्कारलेलं आहे आता मी कुठे जाऊ? आणि अश्या वेळी थोडीशी जरा मी घेतली तर एवढा गोंधळ कशासाठी?

पहिली आणि दुसरी ओळ वेगळी वेगळी वाचली तरी त्यात प्रचंड अर्थ आहे, आणि दोन्ही एकत्र वाचल्या तर अजूनच मोठी कल्पना साकार होते. मी एक मोठा भक्त, माझ्या कडे पाहून लोकांनी आदर्श ठेवावे असा, माझ्या कर्तृत्वाला ग्रहण लागलेलं आहे, आणि कोण तर साक्षात माझ्या देवाचीच ही इच्छा आहे. दोन्हीचा एकत्र विचार करता ह्यापरीस दुसरे दुर्दैव ते कोणते?

Originally published at harshalbhave.in on April 20, 2014.

--

--