‘तुलना करणे’ हा स्वभावदोष? की स्वभावगुण ?

सर्वसामान्यत: समज आहे, ‘तुलना करणे’ चूक आहे. जो तो आपापल्या परीने यशस्वी होत असतो. तुलनेने ईर्ष्येचा जन्म होतो. आणि ईर्षेने ‘अमुक अमुक व्यक्तीपेक्षा जास्त’ आपण स्वत:जवळ काहीतरी असण्याची अपेक्षा ठेवतो — कुणा दुसर्याची संपत्ती, द्नान, मेहनत ई. असे काहीही त्याच्यासाठी लक्ष्य बनते म्हणजेच त्याच्या स्वप्नांची मर्यादा बनुन जाते!
पण तुलनेशिवाय ‘स्पर्धे’लाही काहीच अर्थ उरत नाही. कारण स्पर्धेचा विजेता / पराजित मनुष्य हा इतरांच्या ‘तुलनेत’ श्रेष्ठ वा कनिष्ठ ठरवला जातो.
स्पर्धेमूळे स्वत:ला स्वत:ची उन्नत्ती ठरवली जाते असे मानले तर स्वत:ची उन्नती आपण इतरांशी तुलना करूनच ठरवतो असे म्हटले तर चूक ठरत नाही.

सर्वप्रथम तत्त्वज्ञानाचे तीन प्रकार विचारात घेऊया.
1. Ontology (वास्तविकतावाद)
2. Phenomenology (प्रत्ययवाद)
3. Epistemology (द्नानमीमांसा)

वास्तविकतावाद -
ज्या गोष्टी ‘तथ्य’ आहेत, ज्यांचे अस्तित्त्व सिद्ध झाले आहे फक्त अश्याच गोष्टींचे आकलन म्हणजे वास्तविकतावाद.
मग इथे ‘सिद्धता’/’व्याख्या’ मनाने बनवलेल्या ‘मतांवर’ अवलंबलेल्या नाही. म्हणजेच माणसाच्या भावनांना, अनुभवांना व त्यावरील मतांना इथे स्थान नाही.

प्रत्ययवाद (phenomenology)-
प्रत्येकाच्या अनुभवानुसार बनलेल्या व्याख्यांच तत्त्वद्न्यान म्हणजे ‘प्रत्ययवाद’.
उत्तम उदाहरण द्यायचे झाले तर “द्रुष्टांत”!
जो व्यक्तिसापेक्ष( व्यक्तिनिष्ठ- subjective) असतो.
‘वास्तविकतावाद’ हा मात्र सर्वमान्य, सिद्धांत-आधारित (वस्तुनिष्ठ — objective).

ज्ञानमीमांसा(Epistemology) -
‘मुल्यांकन’ करणे वा साध्या भाषेत — ज्ञानाच्या (आकलनाच्या) आधारावर किंमत ठरवणे म्हणजे ‘ज्ञानमीमांसे’चे तत्त्वद्नान.
जसे की ‘दुर्मिळ’ गोष्टींचे जास्त मुल्य; आणि जे सहज आणि मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत त्यांचे कमी मुल्य ठरवणे.
ह्या प्रकारात प्रत्येकाच्या दृष्टिकोनाचा स्वीकार.

Ontology नुसार जे सिद्धांताशी संबंधित आहे ते बरोबर;जे सिद्धांताबाहेर आहे ते चूक.
Phenomenology नुसार, व्यक्तिसापेक्ष अनुभव व त्याचे तात्पर्य हे सत्य/बरोबर. 
Epistemology नुसार, ना कोणी चूक ना कोणी बरोबर, ज्याचा त्याचा स्वतंत्र ‘विचार’.

त्यामूळे ‘सत्य’ हे व्यक्तिसापेक्ष असते असे म्हटले तर वावग ठरणार नाही. अर्थात! सत्य हे ‘तथ्या’हुन वेगळे!

Ontologyमध्ये (वास्तविकतावादानुसार) ‘तुलना’ ही आवश्यक आहे!
उदाहरणार्थ Critical velocityपेक्षा जास्त वेग मिळाल्यामुळेच माणुस अंतराळात, चंद्रावर पोहचू शकला.
अर्थात, तुलना ही समगुणी पदार्थांशी करण्यात वावगे काही नाही. तसे करणे अधिक फलदायी ठरते.

प्रत्ययवादाला विचारात घेतले तर प्रत्येकाचे अनुभव, येणारे प्रत्यय वेगवेगळे असतात. प्रत्येकाच्या ‘सुख-दु:ख’, ‘भीती’च्या व्याख्या, कल्पना व आकलन वेगवेगळे.
त्यामुळे विचार ‘प्रत्ययवादी’ तत्त्वज्ञानाच्या प्रकारात मोडत असेल तर तुलना होणे शक्य नसते.

‘ज्ञानमीमांसा’ (Epistemology) ही सर्वसमावेशक ठरते. इथे सर्व विचारधारा समजून घेण्याची मुभा असते. ‘तथ्य’ जाणून घेतल्यावर स्वत:चे ‘सत्य’ ओळखण्यास, जाणण्यास प्रत्येकजण स्वतंत्र असतो.

जसे मद्यपी बापाकडे राहणाऱ्या, एकाच घरात वाढलेल्या दोन मुलांचे दृष्टीकोन वेगवेगळे असतात. एक ‘मद्यप्राशन’ न करण्याचे ठरवतो, आणि दुसरा ‘एकच life आहे’च्या उद्घोषात ‘मद्यप्राशन’ आयुष्यभर स्वीकारतो.
दोघा मुलांसाठी तथ्य एकच आहे — ‘माझे वडील दारू पितात’
पण दोघांनी आत्मसात केलेले ‘सत्य’ मात्र वेगवेगळे.
‘सत्य’ निवडण्याचे/आत्मसात करण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे,मग ‘श्रेष्ठते’पेक्षा ‘उत्तम’तेचा ध्यास घेतला तर? (श्रेष्ठता — इतरांपेक्षा उत्तम;
उत्तमता — स्वतःच्या ‘काल’पेक्षा सुधारित असा माझा ‘आज’)

अर्थात! ‘हेतु’ अत्यंत महत्त्वाचा..
कारण तुलना इतरांपेक्षा श्रेष्ठ बनण्याहेतुने करणे ह्यापेक्षा जर स्वत:ची प्रगती जाणण्याच्या हेतुने स्वत:शीच केली तर ते उचित ठरते.

म्हणजे, प्रगती/उन्नती जाणण्याचे एकक ‘तुलना’ हे असु शकते!
अर्थात-

कालचा ‘मी’ आणि आजचा ‘मी’ अशी तुलना केली तर ना ईर्षेला अंत:र्मनात जागा उरते, ना राहते स्वप्नांना मर्यादा!

Show your support

Clapping shows how much you appreciated Aditya Joshi’s story.