कॉपीराईट गजिनी.

फेसबुकच्या On this day ऑप्शनमुळे आज आज पुन्हा समोर आलेला हा २०१४ सालचा छोटा लेख.

आज आमच्या कॉलेजमित्रांच्या छात्रसेवाकाल शाळेत स्नेहसंमलेनाचा कार्यक्रम होता. कार्यक्रमाविषयी न बोललेलंच बर... पण त्या निमित्ताने आमचे शाळेचे जुने दिवस आठवले. जुने म्हणजे फार जुने पण नव्हेत. 2009 साल त्यावेळी संपण्याच्या मार्गावर होतं. आमची शाळा म्हणजे श्री भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालय, माजगाव. लांबलचक नाव असलेली ‘माझी शाळा’. (‘नाव मोठं, लक्षण खोटं’ या म्हणीला अपवाद ठरणार्या मोजक्या गोष्टींपैकीच एक.)

मी त्यावेळी नववीत होतो. खरं तर त्यापुर्वी मी एकदाही कुठल्या गॅदरींगला भाग घेतला नव्हता... म्हणजे माझ्याकडे सांस्कृतिक टॅलेंट नावाचा भागच नव्हता. पण त्या वर्षी भाग घ्यावासा वाटला. त्याचं कारणपण जरा भारीच आहे... त्याचं काय झालं, आठवीत असताना आमच्या सावंत सरांनी एकदा मला एका नाटकात घेतलं होतं. आठ दिवस रिहर्सल झाल्यावर त्यांनी माझ्यातला उदय चोप्रा ताडला आणी दुधातल्या माशीप्रमाणे अलगद मला बाजुला केलं होतं. नंतर ते नाटक शाप (एक मालवणी शब्द) पडलंच म्हणा. एवढं पडलं की शेवटचा आत्महत्येचा सीन खुपच मनोरंजक झाला होता.

एनीवेज, मग तोच स्वाभिमान म्हणा, इगो म्हणा किंवा अपुर्ण हूरहूरी म्हणा... माझी ‘‘नाटकं’’ करण्याची प्रचंड इच्छा जागृत झाली. आणी लगेचच कामालाही लागलो. त्याकाळी राज ठाकरेंचा परप्रांतीयविरोधी आंदोलन गाजत होतं. तर त्याचीच थीम धरून मी एक छोटंसं ‘‘सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ताँ हमारा!’’ नावाचं एकतेचा संदेश देणारं नाटक लिहलं. मित्रमंडळीमधुन पात्र मिळायला जास्त वेळ लागला नाही. नाटकपण छान बसलं.

सगळं छान चाललं होतं पण आमच्या चंचल मनाला काहीतरी ‘बडा धमाका’ करण्याचा ध्यास लागलेला. मग सुचलं ते एक विनोदी नाटक करण्याचं.... त्या डिसेंबरच्या 25 तारीखला आमिर खानची ‘गजनी’ फिल्म रिलिझ व्हायची होती. आमिरची बॉडी आणी शायटिंग-फायटींग टी.व्ही वर चमकत होत्या... झालं... त्याच फिल्मवरून नाटक करायचं ठरलं... एक रात्र जागवुन एक छानसं नाटकं लिहुन काढलं. नाटकाचं नाव होतं ‘‘कॉपीराईट गजनी’’

एक बनावट (आणी हाडकुळ्या) गजनीची दोन पत्रकार घेत असलेली विनोदी मुलाखत आणी क्लायमॅक्सला खरा धिप्पाड गजनी स्टेजवर येवुन त्या तिघांची वाजवलेली पुंगी, असा नाटकाचा विषय. दुसऱ्या दिवशी वर्गमित्रांना आयडिया सांगितल्यावर बरेचजण हो-नाही करत तयार झाले.

सगळी तयारी नीट चालु होती. मी दररोज त्या स्क्रिप्टमध्ये काहीतरी भर घालत होतो. पात्र निवडताना जराशी ‘झेंगटं’ झाली पण झालं सगळं नीट. मला माझ्या नाटकात आदित्य आणी कामेश पाहिजेतच होते. माहित नाही का, त्यामुळे काय झालं मी पत्रकार, कामेश (बनावट) गजनी, आणी गरज नसताना फक्त माईक धरायला आदित्याला दुसरा पत्रकार बनवावा लागला. या गोष्टीला कोणी ऑब्जेकशन पण घेतलं नाही. आणी कॅमेरामन म्हणुन आसिफ (तो कॅमेरा मी स्वत: चप्पलचा बॉक्स अन कापराची डबी जोडुन बनवला होता)

चला, सगळं नीट झालं. आमच्या चार पाच जणांच्या टीमने खुपच उत्साहाने भाग घेतला. आणी ज्यादिवशी पहिल्यांदा आम्ही आमच्या रिर्हसल कमिटीपुढं सादर केलं तेव्हा सगळ्यांनीच ते उचलुन धरलं. सगळे पोट धरून हसले. काहींनी सुचना दिल्या, त्या आम्ही मान्य केल्या. काहींनी शंका काढल्या, दिग्दर्शक म्हणुन मी मोठ्या हिंमतीने त्यांचं निरसन केलं. अश्या एकंदर साताठ वेळा ट्रायल्स झाल्या.पण या धांदलीत दोन गोष्टी मात्र घडल्या होत्या. एक म्हणज, पहिल्या नाटकाकडे बऱ्यापैकी दुर्लक्ष झालं होतं. आणी दुसरं म्हणजे आमच्या या नाटकात पात्रांची यादी बर्यापैकी वाढत चालली होती. कोणी चॅनेलवाले म्हणुन तर कोणी पादचारी म्हणुन नाटकात आले होते. कारण प्रत्येकाला या नाटकात भाग घ्यायचा होता. यातच सगळं आलं. एकंदरीत चारपाचजणांचे ते नाटक साताठजणांचे झाले होते.
मला आठवतं की गॅदरिंगच्या ऐन संध्याकाळी बाळकृष्ण लाईटमन म्हणुन कुठल्याशा काठीला चकचकीत जिलेटीन जोडून घेवुन आला होता. लोल! खरं तर तो मला आमच्या नाटकात नकोच होता. (आज कबुल करायला हरकत नाही)

नक्की तारिख आठवत नाही, पण अखेर गॅदरिंगचा तो दिवस उजाडला. अर्थातच आम्ही सगळे खुपंच उत्सुक होतं. पहिलं नाटक नीट पार पडलं. (मला आठवतं, माझ्या त्या तीन मिनिटांच्या धुमशानात मला समोरचा एकही माणुस दिसला नव्हता! एक तर समोर भला मोठा हॅलोजन होता आणी दुसरं म्हणजे समोर लोकांकडे बघायची हिम्मतच नव्हती. :-D )
आमचं ‘‘कॉपीराईट गजनी’’ अठराव्या नंबरला होतं. साडेनऊ वाजुन गेले असतील. त्या नाटकाच्या दोन मिनिटं आधी जेव्हा बॅकस्टेजला आमचा मेकअप चालु होता तेव्हा एक छान डायलॉग माझ्या कानावर पडला होता. आमच्या वर्गातली एक पोरगी तिच्या भावाला म्हणत होती, ‘‘थांब, कॉपीराईट गजनी बगुन मग जावया!’’ ;-) खरं तर आम्ही जेव्हा जेव्हा ते नाटक सादर केलं होतं, तेव्हा प्रत्येकवेळी तिने ते बघितलं होतं. तरीही तिला पुन्हा बघायचं होतं. व्वा! 
या अशा लहानसहान गोष्टी आमचा धीर वाढवत होत्या. तरीपण मी बराचसा नर्व्हस होतो आणी म्हणुनंच की काय, ते नाटक एरवीपेक्षा काहीसं भरकटलं. कोण डायलॉग विसरला तर एरवी जोरात फायटींग करणारा आमचा बनावट गजनी कामेश काहीसा जपत अॅक्टिंग करत होता. तरीही पहील्यांदाच नाटक बघणार्या प्रेक्षकांना ते जाम आवडलं. मघाशी पात्रपरिचयाच्या वेळी एक पात्र मुद्दाम अन्नुलिखित ठेवलं होतं. नाटकाच्या क्लायमॅक्सला येवुन सगळ्यांना चोप देणार्या खर्या गजनीचे काम आमच्या बाप्पाने म्हणजे ओमकार राणेने केलं होतं. पठ्ठयाने ती दोन मिनिटं बरीच गाजवुन टाकली. (स्टेजवर दोन मिनिटं उघडं परफॉर्म करून राणेने दहा मिनिटं उघडा काम करणार्या कामेशला पुरता फिका पाडला होता!


तर अश्याप्रकारे आमचं (खऱ्या अर्थाने) पहीलंवहीलं नाटक पार पडलं. नंतर 3-4 शाळांनी ते स्क्रिप्ट मागितंल होतं, पण त्या धांदलीत ते कुठे हरवलं देव जाणो! त्यानंतर आयुष्यात खुप नाटकं केली, पण रंगमंचावरचं हे शेवटचं!
या नाटकाचा मला वैयक्तिक फायदा म्हणजे, त्या वर्षापासुन माझ्या घरच्यांनी ‘‘तीया गॅदरिंगात भाग घेवन दाखय!’’ हे पालपुद कायमचं बंद केलं!