सुख म्हणजे नक्की काय असतं?!

Shalmali Kale
Nov 3 · 3 min read

प्रशांत दामलेंचं हे गाणं अनेकदा ऐकलं आहे…आवडीने गुणगुणलही आहे…पण याचा फार गांभीर्याने विचार कमी वेळा केला जातो.

गेल्याच आठवड्यात अंदमान सहलीच्या जाहिरातीवरून घरात चर्चा रंगली होती. साहजिकच सेल्युलर जेल आणि मग ओघानेच स्वातंत्र्यवीर सावरकरांचा उल्लेख झाला. सगळ्यांच्याच अभिमानाची आणि जिव्हाळ्याची गोष्ट! मग विषय वाढत गेला, आणि अगदी ‘त्या तिघी’ पर्यंत पोचला. सावरकर बंधू आणि त्यांच्या अर्धांगिनी…थोर व्यक्तिमत्व! वीर सावरकरांच्या जीवनपटावर आधारित सिनेमा मी शाळेत असताना पाहिला होता. त्यातला एक प्रसंग या चर्चेच्या निमित्ताने अचानक आठवला. सावरकरांच्या कुटुंबाला भर पावसात त्यांच्या राहत्या घरातून बाहेर काढण्यात आलं असा तो प्रसंग. नुसता विचार करून बघा, आपल्याला कोणी घरातून बाहेर काढणं सोडाच पण नुसतं धमकावलं तरी कित्ती त्रास होईल आपल्याला. तेही आपली काहीच चूक नसताना! हे दुःख आपाल्याला अक्षरशः आयुष्यभरासाठी पुरलं असतं. दुःख करणं अगदी न्याय्य समजून आपण ते कुरवाळतही बसलो असतो, काहीही कमीपणा न वाटता. सावरकरांनी तर आयुष्यभर क्लेश भोगले, यातना सहन केल्या…शारीरिक आणि मानसिक दोन्ही! तरीही आपल्या भारतभूचं स्वातंत्र्य हीच सुखाची अंतिम कल्पना असेल का बहुतेक सावरकरांची? असामान्य…इतकंच म्हणू शकतो!

आपण मात्र अगदीच सामान्य माणसं. पण सगळीच सामान्य माणसं फक्त पैसाअडका, गाडी-बंगला यात सुख शोधतात असं नाही बरं का! कधी कोकणात दापोलीला जाण्याचा योग आला तर फाटकांच्या ‘ज्ञानप्रसाद’मध्ये जरूर जेवायला जा. हे कुटुंब ज्या प्रेमाने, आपलेपणाने आणि हसतमुखाने जेवायला वाढतं ना, की नेहमीच्याच मटकीच्या उसळीला, खोबरं-कोथिंबिरीच्या चटणीला एक विशेष चव येते. सत्तरीतल्या त्या काकांसाठी लोकांना पोट भरून तृप्त करणं हेच सुख! वास्तविक तुम्हीच सांगा, व्यवसाय म्हणून खानावळ चालवणारी किती माणसं पंगत मांडून, अन्नपूर्णेचा श्लोक म्हणून जेवायला वाढतात? मग पदार्थ चविष्ट नाही झाले तरच नवल! अशी चाखलेली चव आणि अनुभवलेला साधेपणा, पण तरीही संपन्नता हे आपल्यासाठी साक्षात परमसुख नाही का!

आपल्या आजूबाजूला बघताना कोण सुखी किंवा दुःखी हे ठरवणं अथवा समजणं अगदीच व्यक्तिनिष्ठ आहे. एखादा कष्टकरी झोपडीतसुद्धा शांतपणे झोपी जाईल कदाचित, पण आलिशान बंगल्यात हाताशी चार नोकर असलेला श्रीमंत शांत-निवांत झोपलेच याची काही खात्री नाही. तो कष्टकरी म्हणेल कदाचित की “श्रीमंताच्या पायाशी सगळी सुखं लोळण घेत आहेत जणू!”; पण श्रीमंत कदाचित विचार करील की, “माझ्या निद्रानाशापेक्षा झोपडीतला कष्टकरीच सुखी!” आपल्याकडे जे आहे ते उपभोगण्यापेक्षा जे नाही त्याचं दुःख आपल्याला जास्त वाटतं. बहुतांशी आपली मानवी प्रवृत्तीच आहे तशी. भौतिकदृष्ट्या यशस्वी म्हणजे सुखी हे समीकरण म्हणावं तर त्यालाही अनेक अपवाद आहेत असं लक्षात येतं. सुखाचं परिमाण आपण ठरवू तसं बदलतं. सुख हे मानण्यावर असतं म्हणतात तेच खरं बहुतेक!

दहा दिवस कामानिमित्त बाहेरगावी जाऊन आल्यानंतर घरात पाऊल टाकताच आईच्या हातच्या आमटीचा दरवळलेला सुगंध जो आनंद देऊन जातो तो हॉटेलच्या जेवणात नाही…

सूर्यास्ताच्या वेळेला लाडघरसारख्या स्वच्छ आणि काहीशा निर्जन समुद्रकिनाऱ्यावर पायाला होणारा मऊ ओलसर मातीचा स्पर्श आणि क्षितिजावर क्षणाक्षणाला बदलणारे आकाशाचे रंग मुक्याने बघणं हे काही सुखापेक्षा कमी थोडीच आहे…

थंडीत सुट्टीच्या दिवशी सकाळी मस्त दुलई पांघरून लोळत पडण्यात किती मजा वाटते…

जम्मू-काश्मीरमध्ये ड्युटीवर असणाऱ्या आपल्या महाराष्ट्राच्या जवानाला आपले मराठी शब्द कानावर पडताच जाणवणारा आपलेपणा हे केवढं सुख…

सकाळी ट्रेनमध्ये चपळाईने चढून खिडकीची जागा पकडली तर कौतुकाने मनातच स्वतःच्या पाठीवर दिलेली शाबासकीची थाप हेदेखील सुखच…

घरासाठी पहिल्यांदाच आपल्या आवडीने काही खरेदी करावं आणि सगळ्यांची त्याला पसंती मिळावी याचाही आनंद मोठा…

जरा विनोदी वाटेल पण, आम्हा मुलींना तर ‘गुड हेअर डे’ पण काही सुखापेक्षा कमी नाही…

विचार करा खरंच, आपल्या दैनंदिन आयुष्यात अनेक असे ‘आहा! क्या बात है!’ क्षण येत असतात. तो क्षण त्याच क्षणी मनापासून जगला तर सगळं छान-सोप्पं वाटू लागेल कदाचित. आणखी वेगळं सुख म्हणजे नक्की काय असतं? म्हटलं तर उत्तर अगदी सोपं आहे आणि म्हटलं तर आयुष्यभर न सुटणारं एक कोड!

    Shalmali Kale

    Written by

    Mechanical Engineer. Dance lover. German enthusiast.