जे आणि जसं शिकवण्यात आलं त्याच्या विपरीत गोष्टींना आता सामोरं जायला लागतंय त्याविषयी हे 👇थोडं – —

“काय सांगाल ?”

“एकतर्फी प्रेम करणारया त्या मुलाने भर दिवसा तुमच्या मुलीवर चाकूने वार केले, तिला जबरदस्त जखमी केले, नेमक्या (?) काय भावना आहेत? “काय सांगाल ?”

असं ‘स्पष्ट’पणे विचारून त्या चॅनेल रिपोर्टरने माईक ‘अस्पष्ट’ चेहरा दिसणारया व्यक्तीकडे (दुर्दैवी मुलीच्या वडिलांकडे) दिला. ‘सर्वप्रथम ही बातमी आमच्या चॅनेलवरून दिली जात आहे’ ही तळटीप रन होतच होती.

‘अरे त्या दुर्दैवी मुलीवर काहीही चूक नसतांना काय प्रसंग ओढवालाय अन् अन्यायाच्या धक्क्यातून सावरण्याच्या आधीच त्यांना “काय सांगाल!” विचारणं कसं जमतं ह्यांना ?’🤔

काही वर्षांपूर्वीपर्यंत अशा दुर्दैवी बातम्या माहितगार व्यक्तीकडून सह्रुदयतेनं सांगितल्या जात आणि ऐकणारेही “काय सांगताय” असं हळहळत विचारत असत.

“काय सांगाल?” ह्या तशा नव्या अन् अलिकडच्या प्रश्नाला आताशा ‘कान’ सरावले असले तरी निबर न होऊ शकलेलं ‘मन’ मात्र उद्विग्न होतं ह्या प्रश्नाने. दुर्दैवी बातम्या देण्यातही ‘पहिल्या नंबर’ची स्पर्धा लावणारया चॅनेलस् ना “नेमक्या (?)भावना काय” विचारतांना काही ‘भावना’ असतात. काहो ?

तुम्हाला काय वाटतं,

“काय सांगाल?”

“सगळ्यांनी खूप सांभाळून घेतलं आणि उत्तम मार्गदर्शन मिळालं. माझ्या लाईफमध्ये असा चान्स मिळेल, असं कधी वाटलं नव्हतं”

रिॲलिटी शो मध्ये एक १० वर्षाचा बाल-कलाकार ( आता ‘लाईफ’ बद्दल सांगणारया कलाकाराला “बाल” तरी कसं म्हणावं?🤔)त्याने काम केलेल्या चित्रपटाच्या प्रमोशनच्यावेळी सांगत होता.

नाही, पिढीगणिक मुलं जास्तच स्मार्ट होत चाललीयेत हे खरंय !पण ‘लाईफ आणि चान्स’च्या इंग्रजी मिडियमी पार्श्वभूमीवर (म्हंजे बॅकग्राऊंडवर म्हणायचंय मला😊) “मार्गदर्शन” वगैरे जरा भारीच वाटतं नाही ?शिवाय आमच्यावेळी अगदी १२/१४ वर्षांपर्यंत आम्हाला ‘सांभाळून’ घेतलंच जात असे, म्हंजे असं ‘मेन्शन करावं’ अशी समज नसे.

मग आताची मुलं जास्त (की जरा जास्तच लवकर ?)समजुतदार झाली म्हणावी की निरागस बालपणाची वयोमर्यादा कमी झाली म्हणावी ?

तुम्हाला काय वाटतं,

“काय सांगाल?”

“माझ्या सादरीकरणाला भरभरून दाद देऊन पसंती दिल्याबद्दल मी तुमचे ‘धन्यवाद’ मानतो”,

आत्ताच्या प्रथेनुसार स्टेजवर डोई टेकवून झाल्यानंतर तो कलाकार व्यक्त होत होता आणि आॅडियन्स (प्रेक्षक सध्या ‘आॅडियन्स’ होऊन गेलेत 😊) मधून टाळ्या ऐकू येत होत्या. (प्रेक्षक संख्या अन् टाळ्यांच्या आवाजाची डेन्सिटी टॅली होत नव्हती तो भाग निराळा😃)

लहानपणी आम्हाला आभार ‘मानायला’ आणि धन्यवाद ‘द्यायला’ शिकवलं होतं ,असं सांगायला गेलं की हल्ली कसं आहे, लगेच ‘जनरेशन गॅप’ introduce होतेसं वाटतं. म्हणून मग ‘संवाद गॅप’ पडू नये म्हणून मौन पाळायचं.

‘भाषेच्या काटेकोर नियमांपेक्षा अनियमित शब्द (shortforms), इमोजी यांच्या हेल्पने convey तर होतंय नं, no worries’ असा approach बळावलाय सध्या. !

पण मग हे तर कर्रेक्ट बोलल्यानेही साध्य होतंच की, उगाच चुकीचं का बोलावं? 🤔असं मला वाटतं.

तुम्हाला काय वाटतं,

“काय सांगाल ?”

“हे पटॅटोज मॅश करून झालेयत. आता ह्या ग्रेटेड पनीर’ला’(हा ‘ला’ चा प्रत्यय कशाला😳) त्यात मिक्स करून बाॅल्स बनवून त्यां’ना’ ( आता हा ‘ना’ सुध्दा अनाठायीच) कढईत घालूया.”

. मराठी रेसिपी शोज मधले हे भाषेचं मिश्रण आणि मराठीचे अनाठायी प्रत्यय. स्विकारण्या शिवाय पर्याय नाही की काय ?🤔

तुम्हाला काय वाटतं,

. “काय सांगाल ?”

“मी २०१५ पासून ह्या अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलंय..’

कोणत्यातरी मुलाखतीच्या कार्यक्रमात ब्रेक ची अपरिहार्य वेळ झाल्याने,

“… या ‘दिग्गज’ कलाकाराशी बातचीत अशीच चालू राहील,पण ह्या छोट्याशा ब्रेकनंतर “असं ॲंकरने म्हटल्यावर जाहिरातींचा ओघ सुरू झाला.

‘कला हे पॅशन समजून जवळ जवळ अख्खं आयुष्य खर्ची घातल्यानंतरचे ‘दिग्गज’ परिचयाचे आहेत, आणि आता हे ३/४ वर्षाचे “दिग्गज” 😳कसं काssय?’ असं लगेच वाटून. गेलं.

‘Change is constant’ हे तर आहेचै पण बदलाचा ‘वेग’ पाहता लवकरच, “दिग्गज ‘online’ उपलब्ध करून देऊ” 🤔असं आवाहनही ‘आवेगात’ करण्यात आलं तर नवल वाटायला नको.

तुम्हाला काय वाटतं,

. “काय सांगाल ?”

. ©️ अनुजा बर्वे.