९ सप्टेंबर २०१८ च्या पिठोरी अमवस्येच्या-मातृदिनाच्या निमित्ताने समस्त मातांना आदरपूर्वक 🙏🙏
आणि हे 👇संवाद लेखन….
“Once a mother, always…”
“हॅलोs, हॅssलो आई, “
एकदम वेगळ्याच अन् अनपेक्षित वेळी Boston वरून लेकीचा फोन आल्याने जराशी गडबडलेच मी!पाचेक सेकंद तरी गेली असतील भानावर यायला.
“हुं, बोsल बोssल ! गेल्या दोन दिवसात अजिबात बोलणं नाही होऊ शकलं, काय ठीक आहे नं सगळं? आत्ता अचानक मध्येचसा फोन ?🤔”
“तेच सांगायला फोन केला की…”
“अगं, मेसेज केले दोन-तीन, तिथेही निळ्या रेषा दिसल्या नाही! कशात बिझी होतीस एवढी?”
नाही म्हटलं तरी लेकीला मध्येच अडवत काळजीयुक्त तक्रारीचा प्रश्न गेलाच माझा.
(हे ‘WhatsApp गुरू’ , सतत “काळजी करत बसण्यापेक्षा आत्ताचा क्षण enjoy करा”, “भावनांचं परावलंबित्व रोखायचा प्रयत्न करा …” इ. ‘डू’ज आणि ‘डोण्ट’ ची शिकवण देत असतात हो पण आईचं मन “कळतं पण वळत नाही” या वळणावर अडकलेलंच रहातं.😊)
“हॅलो आई ,तू मला ‘uninterruptedly’ बोलायला दे जरा प्लिज “
“ओके ! “
“अगं, आत्ता मी एयरपोर्टला जातेय. California च्या आॅफिस मध्ये महत्त्वाची मिटिंग आहे, अटेंड करायलाच हवीय.”
“बापरे ! आता गं ?😲”
( “छोट्या नातीचं कसं होईल? जावई कसं मॅनेज करेल? “ हे असे प्रश्न धडाधड मनात आल्याने माझी प्रश्नार्थी प्रतिक्रिया गेलीच. सुदैवाने लेकीचे सासरे काही दिवसांसाठी भेटायला म्हणून तिथे गेले होते त्यांचा आधार होता म्हणा !)
“आई, डोंट वरी ! माझ्या लेकीचं एक डिटेल्ड ‘ time-table’ बनवलंय. आणि फ्रिजवर लावून ठेवलंय ! त्यामुळे तिच्या बाबाला आणि आजोबांना पण सोयीचं होईल.
दोन दिवसांचं तिचं लंच ‘डे-केयरमध्ये’ होईल आणि सगळ्यांच्या डिनरसाठीच्या भाज्या करून ठेवल्यायत. मध्येच लागणारया ‘dry snacks’ ची प्रोव्हिजनही करून ठेवल्येय. शिवाय ‘आजोबा’ म्हंजे तिचे एकदम favourite person आहेत.”
मला म्हंजे अगदी “हे काय ऐकतेय काय मी” असं झालं. माझी लेक इतकी साटप कशी😳अन् कधी झाली ?खर्रच सांगते, माझ्या ‘कानांनी’ जे ऐकलं त्याने ‘मना’ला गुदगुल्या झाल्या खरया ! पण क्षणभरच ……
“ए बयो, पण रात्रीचं कसं सांभाळतील ही दोघं पुरूष माणसं? तुझ्याशिवाय झोपेल का ती ? काय बाई जिवाला घोर एकेक, तुझ्याही अन् इकडे आमच्याही ! अशावेळी हे भौगोलिक अंतर फारच मोssठ्ठं वाटतं गं !”
“आई, अगं करतील ते दोघं मॅनेज ! मी एकटी नाही का करत 24/7 मॅनेज ?आणि परवा पहाटे मी पोचतेच आहे घरी !”
“हो sग्गं , लहान मुलांच्या मूडचं काही सांगता येत नाही , पण तू म्हणतेयस तस्संच होऊंदे बाई !”
“म्हणून तर आत्ताही मी लवकर लवकर ती उठायच्या आत घराबाहेर पडलेय .”
“अगं ए बाई, तुझ्यासाठी बरोबर काही घेतलंयस की नाही ?एवढ्या लवकर घरातून बाहेर पडलेयस म्हणजे खाल्लं नसशीलच काही! दूध तरी पिऊन निघायचं. महत्त्वाची मिटिंग म्हंजे ‘पोटभर ‘ काम नुस्तं. एकदा तो लॅपटाॅप ‘उघडला’ की तहान-भूकेचे दरवाजे “बंद”!शिवाय परवा पहाटे परतणार म्हंजे रात्रीच्या प्रवासाचं जागरण आणि ॲसिडिटीला निमंत्रण !अशावेळी ते ‘पौष्टीक. लाडू” हवे गं ! मधे मधे. मी कुरियर करत जाईन म्हटलं तर मला मना करतेस !”
“हॅलो आई ‘चिल’ गं ! कित्ती काळजी करशील ? I will look after myself !आणि हो , पुढचे दोन दिवस जमेल तसं मेसेज करत राहीन. बोलता येईलच असं नाही. पोचले एयरपोर्टला, बाय बाय “
प्रवासासाठी आणि २ दिवसांच्या उपक्रमासाठी मी शुभेच्छा द्यायच्या आधीच लेकीनं गडबडीत फोन ठेवलासुध्दा !
कर्तृत्ववान लेकीबद्दल अभिमानानं ऊर भरून आला पण माझे हात मात्र डोळ्यांकडे झेपावले , नकळत ओलावलेल्या कडा टिपण्यासाठी !!
अनुजा बर्वे.