अनपेक्षित
संध्याकाळची ८ वाजेची वेळ होती, घरात संध्याकाळच्या कामांची धांदल सुरु होती. आमच्या तान्हुल्या बाळाला मात्र खेळायला पाहिजे होतं. बाळाला करमणुक म्हणून युट्युब (Youtube) वर आम्ही मराठी बालगीते लावली जेणेकरून बाळाला गाणी ऐकता येतील.
“मामाच्या गावाला जाऊया”, “नाच रे मोरा”, “ये रे ये रे पावसा” अशी सगळी गाणी एकामागून एक ऐकताना मनात बालपणीच्या सर्व आठवणी जागृत होत होत्या आणि बघता बघता आम्ही दोघंही बालगीते गुणगुणायला लागलो.
असं सगळं घरच बालपणात रमलेलं असताना पुढचं बालगीत सुरु झालं, “गोरी गोरी पान फुलांसारखी छान, दादा मला एक वहिनी आण”. हे गीत ऐकत ऐकत लहानाचं मोठं झालो, आंगणवाडी, बालवाडी, शाळा आणि रेडिओवर कदाचित हजारोवेळेस हे गाणं ऐकलं असेल. अजुन घरी टी-व्ही आला नव्हता, संपूर्ण गावात एकच टी-व्ही (तो सुद्धा साधा Black & White) होता, तिथे मात्र दर रविवारी सकाळी रामायण पहायला न विसरता जाणं व्हायचं, असो.
आजपर्यंत हजारोंदा ऐकलेलं बालगीत आज ऐकतांना मात्र मनात जो आनंद अपेक्षित होता तो होत नव्हता. कुठेतरी मनात काहीतरी विचारचक्र सुरु झालेलं जाणवत होतं. हातातलं काम करता करता जरा दोन क्षण थांबलो आणि जरा गाण्याला लक्षपूर्वक ऐकायला लागलो.
“गोरी गोरी पान फुलांसारखी छान, दादा मला एक वहिनी आण”
आणि अचानक मनात विचार आला, ह्यात काहीतरी चुकतंय. काहीतरी दर्शवलं जातंय, जे चुकीचं वाटतंय.
“गोरी गोरी पान फुलांसारखी छान”
- फक्त “गोरी गोरी पान” वहिनीच “फुलांसारखी छान” असेल का?
- वहिनीला “फुलांसारखी छान” असायला “गोरी गोरी पान” असणं आवश्यक आहे का ?
- निरागस बालगीतातून आपण अनावधानाने निरागस मनावर काहीतरी चुकीचं बिंबवतोय का ?
मनात सुरु असलेल्या विचारचक्राचे कारण लक्ष्यात आलं होतं. बालपणात रमलेलं मन क्षणभरात वर्तमानात येऊन थांबलं.
मनात प्रश्न होते पण उत्तर मात्रं नेमकं मिळत नव्हतं. घरातील आवराआवर झाल्यावर माहिती काढावी म्हणून थोडा वेळ इंटरनेटवर शोधाशोध केली.
काही मिनिटातच जी माहिती वाचायला मिळाली ते पाहून मी आश्चर्याने थक्कं झालो. आपल्या समाजात आपल्या डोळ्यासमोर होत असलेल्या घटनांना आपण कसं एवढे दिवस समजु शकलो नाही ह्याचा खेदही झाला.
आपल्या समाजात होणाऱ्या रंगभेदामुळे, त्यातून निर्माण होणाऱ्या सामाजिक समस्या, इंग्रजांचा डाव, समाजातील आर्थिक समस्या, आणि त्यातून होणारा व्यापार हे सगळं कसं एकमेकांशी जुळलंय हे सगळं मनात स्पष्ट होताना वाटत होतं.
समस्या खूपच कठीण आणि समाजात खोलवर रुतलेली आहे ह्याची मनाला जाणीव होत होती. शतको वर्षांपूर्वी समाजात रुजलेल्या विचारांना झटपट बदलता येणार नाही हेही पूर्णतः माहित होते.
म्हणूनच आपण वैयक्तिक पातळीवर काय करू शकतो असा विचार सुरु झाला आणि खूपच सोपे उत्तर मिळाले.
- फक्त “गोरी गोरी पान” वहिनीच “फुलांसारखी छान” असेल का? — नाही
- वहिनीला “फुलांसारखी छान” असायला “गोरी गोरी पान” असणं आवश्यक आहे का ?- नाही
मग त्या निरागस तान्हुल्या बाळाच्या मनावर आपण का म्हणून हि ओळ बिंबवायची ?
“गोरी गोरी पान फुलांसारखी छान, दादा मला एक वहिनी आण”
खरं बघायला गेलं तर तान्हुल्या बाळाला तर ह्या गीताची काही माहितीहि नाहीये.
आपणच नकळतपणे, दरवर्षी लाखो निरागस मनांवर सौंदर्य आणि त्वचेच्या रंगांची चुकीची प्रतिमा निर्माण करतोय. आपण जर ते थांबवलं तर कदाचित पुढच्या काही पिढ्यांमध्ये समाजातील हि समस्या निर्मूलन होईल.
आणि त्यासाठी मला आज काय करावं लागेल? युट्युब (Youtube) वर, “गोरी गोरी पान फुलांसारखी छान, दादा मला एक वहिनी आण” वगळून पुढचं बालगीत सुरु करावं लागेल…
स्वतःशीच हसलो, रात्रीचे १:३० वाजले होते, तान्हुलं झोपलं होतं… हेडफोन कानाला लावले आणि बालगीत ऐकायला लागलो…
सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय…
