डाॅक्टर आणि रूग्णांचे नातेच व्हेंटीलेटरवर…

धुळ्यात रेसिडेन्ट डॉक्टरला झालेली जीवघेणी मारहाण, त्यानंतर झालेला डॉक्टरांचा संप, डॉक्टरांना मिळालेली कोर्टाची फटकार, विधानसभेत मुख्यमंत्र्याचे या संपविरोधात आवेशपूर्ण भाषण, मंत्र्यांच्या आश्वासनानंतरही चालूच असणारे डॉक्टरांवरील हल्ले…

सगळ्याच मन सुन्न करणाऱ्या गोष्टी…

‘नातं टिकून राहणं महत्वाचं’

डाॅक्टरांना मारहाण करणाऱ्यांना, रूग्णालयाची तोडफोड करणाऱ्यांना कठोर शीक्षा ही झालीच पाहीजे व ती होईलच. मुलभूत सुरक्षा प्रत्येकाला पुरवणं ही सरकारची जबाबदारीच आहे, सरकार आज ना उद्या त्याकरिता काही न काही पावले उचलेल, डॉक्टरही स्वसुरक्षेसाठी काही न काही उपाय योजना करतील. पण मला खरी काळजी आहे ती दिवसागणिक बिघडतच चाललेल्या डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातल्या नाते-संबंधाची.

डॉक्टरला मारहाणीने सुरु झालेल्या या घटनाक्रमात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे समाजातल्या इतर कुठल्याही घटकांचा डॉक्टरांच्या आंदोलनाला पाठींबा असा मिळालाच नाही. मारहाणीचे समर्थन जरी नसले तरी डॉक्टरांच्या समर्थनार्थ समाजातील कुठलाही घटक रस्त्यावर उतरला नाही. जणू काही हे जे काही घडलं त्या सगळ्याला समाजाची एक मूक संमती होती. डॉक्टरांविरुद्ध समाजात वाढत्या असंतोषाच हे एक प्रतीक होते.

कशासाठी एवढा असंतोष, एवढी असंवेदनशीलता?

किती विश्वासाचे होते डॉक्टर आणि रुग्णाचे नाते. मला आठवतं माझ्या मित्राचे वडील प्रसीद्ध डॉक्टर होते बीडला, लांब लांबच्या गावाहून यायचे रुग्ण त्यांच्याकडे, हे डॉक्टर रुग्णाची किंवा नातेवाईकाची आय माय काढायचे त्यांना तपासताना, “भो### , तुला सांगितलं होतं बापाला चार दिवसांनी घेऊन ये, तू आज येतोयस, बाप नकोसा झालायं कारे ### ? “ तरीपण रुग्ण त्यांच्यावर फिदा, पाया पडूनच जायचे जाताना. एक काळ होता ‘फॅमिली डॉक्टरचा ‘, अगदी घरातल्या छोट्या मोठ्या भांडणांपासून ते हार्ट अटॅक पर्यंत त्यांचा सल्ला महत्वाचा असायचा. खूप प्रेम होतं त्या नात्यात, पण गेल्या वीस वर्षात एक डॉक्टर म्हणून काम करताना मी ह्या नात्याचा ह्रास होताना अगदी जवळून बघितलयं.

काय झालंय काय ह्या डॉक्टर-रुग्ण संबंधाला? कशाची नजर लागलीये? देव मानायचे डॉक्टरला आणि आता? आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय सगळ्या समाजाने; पत्रकार, मीडिया, राजकारणी, न्यायाधीश झाडून सगळेच डॉक्टरांच्या विरोधात. कालपरवाच माझ्या आत्याचा फोन आला “एकदा सगळ्या तपासण्या करून घेईन म्हणतेय, तिथे तुझ्याकडेच करू सगळं, इथे आमच्याकडचे डॉक्टर म्हणजे एकजात सगळे चोर“, अगदी सर्वसामान्यांचं मत पण डॉक्टरांविषयी असे कलुषित झालंय.

आपण सर्वानी एक लक्षात घ्यायला पाहिजे कि डॉक्टर आणि रुग्णाचे हे नाते जे सध्या व्हेंटिलेटर वर आहे त्याला जिवंत ठेवणे आपल्या सगळ्यांसाठीच महत्वाचं आहे. ह्या बिघडलेल्या संबंधाने डॉक्टरबरोबर समाजाचेही नुकसान होणार आहे. आज थोड्याथोडक्या नाही तर १२५ कोटी लोकांच्या आरोग्याचा प्रश्न आहे. तुम्हाला खरंच वाटतं कि कानशिलावर बंदुक लावल्यानंतर कुठलाही डॉक्टर निपक्षपाती पणे कोणाचाही इलाज करू शकेल? डॉक्टर आणि रुग्ण यामध्ये वाढत जाणारा अविश्वास, वाढत जाणारी असंवेदनशीलता याचा देशातील आरोग्य सुविधांवर विपरीत परिणाम होणार नाही?

समाजाने लक्षात घेतलं पाहिजे कि पाश्चिमात्य प्रगत देशांपेक्षाही आपल्या देशातील आरोग्य सेवा अनेक बाबींमध्ये वरचढ आहेत. अमेरिकेमध्ये रुग्णालयाचा खर्च हा सर्वसामान्यांना परवडण्यासारखाच नाही, तेथिल आरोग्य विमा आपल्या देशापेक्षा कित्येक पटीने महाग आहे. इंग्लंड सारख्या देशात तुम्हाला तज्ञ डॉक्टरांची भेट सहजासहजी मिळत नाही, आधी इंटर्न कडे जावे लागते, तज्ञ डॉक्टरची नुसती भेट घ्यायची म्हटलं तरी आठवडे उलटून जातात, इलाज आणि मग गरज पडल्यास शस्त्रक्रिया वगैरे ह्या तर खूप लांबच्या गोष्टी. भारतीय डॉक्टरांच्या कौशल्याबाबत सांगायचं तर भारतातील वाढते मेडिकल टूरिझम त्यांचे कौशल्य सिद्ध करायला पुरेसं आहे.

आणि आपण सर्वच हे जे सगळं ‘चांगलं’ आहे, त्याची जाणीव न ठेवता त्याची वाट लावायला निघालो आहोत.

डॉक्टरांना मारहाण करून आरोग्यसेवा चांगली मिळेल हि अपेक्षा ठेवणेच चुकीचे आहे, डॉक्टरांनीही नुसते मोर्चे काढून, हॉस्पिटल बाहेर बाउन्सर बसवून किंवा बंदुकीचे परवाने काढून प्रश्न सुटणार नाहीयेत. खरी गरज आहे ती डॉक्टर आणि रुग्णाचे विश्वासाचे नाते पुनर्जिवित करण्याची, ह्या नात्याचा सोनेरी भूतकाळ परत आणण्याची.आणि त्यासाठी डॉक्टर, समाज आणि सरकार सगळ्यांनीच मिळून प्रयत्न करणे जरुरीचे आहे.

समाजाला गरज आहे ती डॉक्टरांच्या कामाविषयी संवेदनशीलता वाढवण्याची. त्या धुळ्याच्या रेसिडेंट डॉक्टरला मारहाण झाली, ह्या रेसिडेंट डॉक्टरांचे कामाचे स्वरुप कधी जाणून घ्यायचा प्रयत्न केलाय? दररोज ओपीडी किंवा वॉर्डचे राउंड्स, आठवड्यातून दोन कधीकधी काही रुग्णालयात तर तीन-तीन दिवस इमर्जन्सी ड्युटी. इमर्जन्सी ड्यूटी म्हणजे सकाळी ८ ते दूसऱ्या दिवशी संध्याकाळी ८, म्हणजे सलग ३६ तास काम आणि हे सगळं सांभाळून तो एमडी किंवा एमएस चा अभ्यासही करतोय. खाजगी रुग्णालयातील डॉक्टरही त्याच्या परीने प्रयत्न करतोय चांगल्या सुविधा पुरवण्याचा, त्याच्या डोक्यावरही बॅंकेचं कर्ज आहे आधुनिक यंत्रसामग्रीसाठी घेतलेलं, त्याच्या डोक्यावर टांगती तलवार आहे ग्राहक मंचाची, त्यालाही अभ्यास करावा लागतोय परवाना नूतनीकरणासाठी, रात्री बेरात्री जागून तो तुमचा इलाज करतोय ते फक्त त्याच्या फायद्यासाठी नाही तर त्यात तुमचाही फायदा आहे, ह्या सगळ्याचीच रुग्णांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी जाणीव ठेवली पाहिजे.

आजारपण हे अनाहुत पाहूण्यासारखं तुमच्या दारात येऊन पोहोचतं आणि मग त्याचा बराचसा राग कळत नकळत दवाखान्यावर किंवा डॉक्टरवर निघत असतो. प्रत्येकाने ह्या आपत्कालीन समस्येसाठी तयारी करून ठेवली पाहिजे, प्रत्येकाकडे आरोग्याचा विमा असणे आवश्यक आहे. आपल्या देशात रस्त्यावर धावणाऱ्या प्रत्येक गाडीचा विमा काढणं अनिवार्य आहे पण ८०% जनता अाजही आरोग्य विम्याच्या अंतर्गत संरक्षित नाही. असं का? पाश्चात्य देशात प्रत्येक कुटुंब आपल्या मासिक वेतनाच्या जवळपास १५%रक्कम आरोग्य विम्यावर खर्च करते, आपल्या भारतात तर नक्कीच ते तेवढे महाग नाही.

आपली फसवणूक होत नाही ह्याची खात्री करून घेण्यासाठी तुम्ही अजून एखाद्या डॉक्टरचा सल्ला नक्कीच घेऊ शकता. जवळपासच्या नात्यामधील डाॅक्टरकडुन, फॅमिली डॉक्टरकडुन, अगदी कोणीच नाही मिळाले तर इंटरनेटवरही तुम्ही आपला इलाज व्यवस्थित चालू आहे याची खात्री करून घेऊ शकता. पण मग एकदा का ही खात्री झाली कि त्यानंतर मात्र कुठल्याही आजाराचा इलाज करताना येणारे संभाव्य धोके लक्षात घेऊन, “डॉक्टर हा देव नाही आणि नियतीच्या पुढे कोणीच जाऊ शकत नाही” हे मान्य करून पूर्ण विश्वासाने इलाज करून घ्यायला हवा.

डॉक्टरांसाठीतर रात्र वैऱ्याची आहे. एक काळ होता, समाजाचा विश्वासच नव्हता ह्या डॉक्टर प्रजातीवर, तांत्रिक-मांत्रिक जास्त जवळचे वाटायचे लोकांना. त्या काळात प्रसंगी लोकांचा रोष स्वीकारून, अथक परिश्रम करून डॉक्टरांनीच विश्वास निर्माण केला समाजामध्ये स्वतःबद्दल. तोच विश्वास आता परत निर्माण करायचाय. कुठल्याही डॉक्टरवर हात उगारला तर पेटून उठला पाहिजे समाज त्या हल्लेखोरांच्या विरोधात, अख्खं गाव जमायला पाहिजे त्या डॉक्टरला वाचवण्यासाठी…

आणि असं खरंच व्हावं असं वाटत असेल तर ‘आपल्यालाही बदलण्याची गरज आहे’ हे सर्व डॉक्टरांना मान्य करावंच लागेल.

मी सोशीअल मीडियावर विचारलं लोकांना त्यांच्या डॉक्टरांवरील नाराजीचे कारण, काय तक्रारी होत्या पहा लोकांच्या “डॉक्टरांनी काहीच समजावून सांगितंल नाही ”, “खूप तपासण्या लिहून दिल्या”, “त्यांच्या सहकाऱ्यानेच तपासलं, डॉक्टर दोन मिनिटं पण बोलले नाहीत“. माझ्या मते आजाराचं स्वरूप तसंच तपासण्या करण्याची नेमकी काय आवश्यकता आहे हे नीट समजावून सांगितलं, रुग्णाशी थोडा संवाद वाढवला, थोडा जास्त वेळ प्रत्येक रुग्णाला दिला तर बरीचशी नाराजी दूर होईल.

रुग्णांविषयी, त्यांच्या आजाराविषयी संवेदनशीलता डॉक्टरांना दाखवून द्यावी लागेल. लहान मोठ्या सर्व रुग्णालयात मदत कक्ष स्थापन करावे लागतील. सूचना/तक्रार पेट्या ठेऊन किंवा प्रत्येक रूग्णाला एक अभिप्राय पुस्तिका देऊन नेमके काय आणि कुठे सुधारण्याची गरज आहे, रुग्णांच्या नाराजीचे ज्या त्या रुग्णालयातले नक्की काय कारण आहे हे समजावून घ्यावे लागेल व त्यानुसार सुधारणा करण्यासाठी उपाययोजनाही कराव्या लागतील.

डॉक्टरांनी आपला अहंकार बाजूला ठेवणे सगळ्यात महत्वाचे. गेल्याच महीन्यात माझ्या शेजाऱ्याची मुंबईला हृदयरोगावरची शस्रक्रिया झाली, पुढच्या इलाजासाठी मीच त्याला औरंगाबादच्या एका हृदयरोग तज्ञाकडे पाठवले. या माझ्या शेजाऱ्याची एक लहानशी अपेक्षा होती कि मुंबईच्या आणि इथल्या डॉक्टरांमधे त्याच्या पुढच्या इलाजाविषयी थोडासा सुसंवाद व्हावा, पण दोन्ही डॉक्टरांचा अहंकार आडवा आला. अशा गोष्टी टाळण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. समाजात आपली प्रतिमा पुनर्स्थापित करण्यासाठी ह्या अशा शुल्लक गोष्टी आड येतील याचे भान आता प्रत्येक डॉक्टरला ठेवावेच लागेल.

पारदर्शकता जपण्यासाठी डॉक्टरांना अधिक काळजी घ्यावी लागेल. इलाज करणाऱ्या डॉक्टरांनीच सल्ला द्यावा सेकंड ओपिनियन घेण्यासाठी, रुग्णाच्या नात्यातला किंवा ओळखीतला कोणी डॉक्टर असेल तर इलाजाबाबत संवाद साधावा त्याच्याशी, समजावून सांगावे प्रत्येक शस्रक्रियेतील संभाव्य धोके तपशीलवार प्रत्येक रुग्णाला आणि त्याच्या नातेवाईकाला.

डॉक्टर आणि रुग्णांच्यामधले नाते संबंध सुधारण्यासाठी सरकारलाही आपली भूमिका निभावावीच लागेल. नुसती डॉक्टरांची सुरक्षा वाढवून चालणार नाही. सरकारी रुग्णालयातील डॉक्टरवरचा कामाचा ताण कमी करावा लागेल त्यासाठी काम करणाऱ्या डाॅक्टरांची संख्या वाढवावी लागेल. वाढत्या लोकसंख्येला सेवा पुरवण्यासाठी सरकारी रुग्णालयेही वाढवावी लागतील. सरकारी रुग्णालयातील सुविधाही वाढवाव्या लागतील. रुग्णांशी संवाद वाढवण्यासाठी प्रत्येक सरकारी रुग्णालयात मदत कक्ष स्थापन करावे लागतील. औरंगाबादच्या हेडगेवार रुग्णालयातील ‘सेवाव्रतींची‘ भूमिका तर सर्वश्रुतच आहे, सामाजिक संस्थांच्या मदतीने सरकारी तिजोरीवर कोणताही बोजा न टाकता ह्या ‘सेवाव्रती’ संकल्पनेची सर्व सरकारी रुग्णालयात अंमलबजावणी करता येईल.

आयुष्यात प्रत्येक नात्यामध्ये चढ-उतार हे येतच असतात. ‘नातं टिकून राहणं महत्वाचं’ यावर एकमत असेल तर चांगले दिवस परत यायला वेळ लागत नाही. डॉक्टर आणि रुग्ण ह्या नात्यासाठीही सध्या कठीण काळ आहे पण मला विश्वास आहे कि हे फक्त मध्यांतर आहे, शेवट हा आनंदीच असणार आहे; गरज आहे ती फक्त आपल्या सगळ्यांच्याच सामुहीक प्रयत्नांची …

डॉ . सचिन चिटणीस

One clap, two clap, three clap, forty?

By clapping more or less, you can signal to us which stories really stand out.