स्पर्श

दहा वाक्यांनी ज्या भावना बोलून दाखवता येतील त्या एका स्पर्शाने व्यक्त होतात असं म्हटलंय. स्पर्श ही फार मोठी शक्ती आहे, जादू आहे. एका स्पर्शाने राग, लोभ,प्रेम,मत्सर या साऱ्या भावना व्यक्त होऊ शकतात.

रडणार बाळ आईच्या एका स्पर्शाने शांत होत, वडिलांच्या हाताचा एक स्पर्श मुलाला आत्मविश्वास देऊ शकतो.घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं सांगतो.प्रिय व्यक्तीच्या हाताचा स्पर्श तर स्वर्गीय आनंद देतो. आवडत्या व्यक्तीचा स्पर्श सुखावतो तर नावडत्या व्यक्तीचा स्पर्श क्षणभर देखील नकोसा वाटतो.

स्पर्श भावना माणसांनाच असतात असे नाही तर प्राण्यांना सुद्धा असतात. मांजरीच्या पिलाला हात लावला तर ते जवळ येते, कुत्र्याच्या पाठीवरून हात फिरवला तर ते शेपटी हलवून आपुलकी दाखवते.घोड्याच्या मालकाने त्याच्या पाठीवर थाप मारली तर घोडा फुरफुरून प्रेम व्यक्त करतो.वाघ, सिंह असे जंगली भीतीदायक प्राणी सुद्धा स्पर्शाने माणसाळले जातात.

संत महात्म्यांच्या पायांना स्पर्श केला तर अंगात वीजप्रवाह शिरल्या सारखे वाटते,पापक्षालन झाल्याच्या भावना निर्माण होतात.पंढरीच्या विठीबाच्या पायावर डोकं ठेवलं की सगळे कष्ट नाहीसे होतात. यात्रा सफल झाल्या सारखे वाटते.हा स्पर्शाचा महिमा आहे.

काही स्पर्श शब्दांची भावना व्यक्त करतात, तर काही शब्द स्पर्शाची भावना व्यक्त करतात,अंध व्यक्तींचा भावनिक व्यवहार तर केवळ स्पर्शावरच चालतो.त्यांनाही सहानुभूतीचा स्पर्श नको असतो,सहकार्याचा स्पर्श हवा असतो. दोन स्पर्शातला फरक त्यांना कळतो.त्यांना तर स्पर्शज्ञान जबरदस्त असते.

स्पर्श आधार देतात,स्पर्श आत्मविश्वास देतात, आयुष्यात उभं राहायला मद्दत करतात. स्पर्श केवळ शारीरिकच नसतो तर मानसिकही असू शकतो. आयुष्याला कंटाळलेला एखादा सहज एखादी कविता वाचतो, त्या काव्यस्पर्शाने त्याला जगायची उर्मी मिळते,नापास झालेल्या मुलाला वडिलांनी आधाराचे शब्द दिले तरी तो पुन्हा यश मिळवू शकतो.

मात्र प्रत्येकाने योग्य स्पर्श ओळखायला शिकले पाहिजे, विशेषतः लहान मुला मुलीनी. दिव्यत्वाचा स्पर्श अध्यात्माची वाट दाखवू शकतो,ज्या प्रमाणे लोहचुंबकाला लोखंडाचा स्पर्श होताच लोखंड काही काळ लोह चुंबक बनते त्या प्रमाणे सज्जन व्यक्तीच्या स्पर्शाने सामान्य माणूस सद्विचारी होऊ शकतो,

स्पर्शा मध्ये एवढी ताकद असते की एखादा संतापलेला शांत होऊ शकतो.घाबरलेला निर्धास्त होऊ शकतो.रडणारा अश्रू थोपवू शकतो.स्पर्शामुळेच आपल्या आयुष्यात आनंद निर्माण झालाय हे नक्की !

ओविलो फुले मोकळी या पुस्तकातून .