अध्यात्म?- Dr. Sapna Sharma

अध्यात्म?- Dr. Sapna Sharma
परवा एक मेसेज आला. बरंच काही होतं त्यात. थोडक्यात सांगायचं तर अध्यात्म/ देव/ मूर्तिपूजा/ कर्म- कांड ह्यांच्या प्रसारकांच्या मान्यतांचा गोंधळ मला त्यात दिसला. काय खरं? कुणाचं मत मान्य करावं? कुणाचा मार्ग पत्करावा? प्रत्येकचं व्यक्ती आपापल्या मार्गाला श्रेष्ठ सिद्ध करायला तत्पर असते. मग निर्णय कसा घ्यावा?

“प्रत्येक मान्यतेवर संशय घ्या आणि स्वतःचा प्रकाश शोधा”

हे शब्द माझे नाहीत. भगवान श्री बुद्धांचे आहेत.

माझ्या मते मार्ग कुठला पत्करायचा हा दुय्यम सवाल नाही का? कुठे पोहोचायचं आहे हे आपल्याला नक्की माहीत आहे का? गंतव्य काय? असा प्रश्न आपण का विचारात नाही? कारण जेथे जाण्यासाठी इतकी धडपड, इतकि भांडण, विवाद, तर्क- कुतर्क तेथे आपल्याला खरंच जायचं आहे का? आणि जर जायचं असेल तर कशा साठी?

सगळेच शिकतात म्हणून जे लोक डिग्र्या घेतात ते सहसा सर्वसामान्यच राहतात. शिक्षण घेतात म्हणून त्यांना काहीतरी नक्कीच मिळतं पण ते सर्वोच्च नसत. आणि आपल्यातले अधिकतर, कुणीतरी करतोय म्हणून आपणही करू, ह्या भावनेने जीवनातले निर्णय घेत असल्यामुळे, आपल्या आसपास अधिकतर लोक सामान्य जीवन जगतांना आढळतात. त्याच्याजवळ विशेष क्षमता नाही असे नाही, पण आपल्या खास गुणांचा उपयोग ना करता ते दुसर्यांना ज्या मार्गावर यश मिळाले आहे त्या मार्गावर चालायचा निर्णय घेतात. पण दुसऱ्यासाठी जे उत्तम आहे ते आपल्यासाठीही उत्तमच असेल असे कसे शक्य आहे?

तसाच काहीसा दृष्टिकोण आपण आपला आध्यात्मिक मार्ग पत्करण्यासाठीही वापरतो. कुणीतरी सांगितलं म्हणून मंदिर/ मस्जिद/ गिरजाघरात जायचे. किंबहुना कुणाच्यातरी सांगण्यावरून आपण अमुक एका देवतेच्या देवळात जातो. कुणीतरी शिफारस केली म्हणून कुठल्यातरी एका पद्धतीने पूजा- अर्चना करतो. करायला काहीच हरकत नाही पण आपण तसे का करत आहोत? आपल्याला खरंच अध्यात्मावर अगर देवावर श्रद्धा आहे का? आपण जे करतोय ते आपण पूर्णपणे समजून घेऊन करतोय का? कि मनात कुठली तरी (परत कुणी तरी सांगितलेलीच) भीती किंवा लालूच बाळगून वर करणी आपण आध्यात्मिक आहोत ह्याचा भास निर्माण करतोय? (स्वतःसाठी आणि दुसऱयांसाठीही)

भीतीपोटी आगर लालसेमुळे जे आपण करतो त्यात श्रद्धा नसतेच. माझं मत पटत नसेल तर पुढच्या वेळी जेंव्हा देवाकडे काही तरी मागत असाल त्या वेळी तो जे देईल ते माझ्यासाठी सर्वोत्तम असेल अशी ठाम श्रद्धा मनात आहे का हे जरा चाचपून बघा. जिथे श्रद्धा असते तिथे शंका नसते. मग मनाजोग झालं नाही तरी त्या श्रद्धेला तडा जात नाही आणि अशी श्रद्धा वाईटातल्या वाईट परिस्थितीतही डळमळीत होत नाही. तशी श्रद्द्धा माझी आहे का?

सोप्पं उत्तर अस आहे कि अशी निर्विवाद श्रद्द्धा असेल तर कुठल्याही मार्गाने चाललो तरी अध्ययात्मिक प्रगती होत राहील. आणि श्रद्धाच नसेल तर कुठलाही मार्ग अपुराच.

वेगवेगळ्या गुरुजननांनी लिहिलेल वाचा, शक्य नसेल तर अध्यात्मिक प्रवचनांना जा. पण कुठल्याही मार्गाला किंवा गुरूला कमी किंवा अधिक न लेखता जा. चिंतन, मनन, करा. नम्रतेने प्रश्न विचारा, तुमचा मार्ग आपोआप तुमच्यासाठी उघडेल आणि तुम्हाला उमजेल. तो मार्ग आधी ऐकलेला असेल किंवा अगदीच नवा असेल. पण तो तुमचा मार्ग असेल.

नारदमुनींनी जेंव्हा स्वतःला विष्णूचा मोठा भक्त म्हंटलं तेंव्हा विष्णूंनी त्यांना डोक्यावर पाण्याची गागर घेऊन पाणी न सांडता चालायला सांगितले. नारदमुनी पाणी सांभाळण्यात असे गुंतले कि ‘नारायण- नारायण” विसरले. तेंव्हा विष्णूने त्यांना एक सामान्य शेतकरी दाखवला जो संसाराचे गाडे डोक्यावर सांभाळातही दिवसभर विष्णू नाम जपत असे. विष्णू म्हणाले “तो खरा भक्त”.

कुठलाही मार्ग पत्करावा पण अटळ श्रद्धा असायला हवी हे विसरू नये .

SAKAL Article 14 Aug 2016
Please do SHARE if u believe it can help someone

https://www.facebook.com/sapna.sharma.319/posts/1373930659303366