‘Inferior Goods’ ला मराठीत काय म्हणाल?

सहसा आपण बघतो की लोकांचे पगार वाढले की ते जास्त गोष्टी विकत घेऊ शकतात. उच्च मध्यमवर्गीय आणि श्रीमंत लोकांमध्ये हे कमी बघायला मिळते कारण त्यांच्या बऱ्याचशा गरजा आधीच भागलेल्या असतात. म्हणून पैशांची आवक अजून वाढली तर ते खर्च वाढवण्यापेक्षा बचत वाढवताना दिसतात. पण गरीब लोकांमध्ये ह्याच्या उलट चित्र दिसतं. त्यांच्या मूलभूत गरजा भागलेल्या नसल्यामुळे जर पैशांची आवक वाढली तर त्यांचा बचतीपेक्षा खर्चाकडे कल जास्त दिसून येतो. पण तो खर्च नक्की कशावर होतो?

आपण ज्वारीचं उदाहरण घेऊया. जर पगार (पैशाची आवक) वाढली तर तो माणूस जास्त ज्वारी विकत घेईल. ४ च्या ऐवजी रोज ६ भाकऱ्या खाईल. बाजारातल्या बहुतेक गोष्टी अशाच असतात. लोकांकडचे पैसे वाढले की त्यांची मागणी वाढते. पण अशा पण काही गोष्टी असतात की लोकांकडचे पैसे वाढले की त्यांची मागणी कमी होते. दुय्यम दर्जाच्या तांदुळाचा विचार करा. जोपर्यंत तुमच्याकडे कमी पैसे आहेत तोपर्यंत तुम्ही तो घ्याल. पण जास्त पैसे मिळाल्यावर तुम्ही काय विचार कराल? कदाचित तुम्हाला आता चांगल्या दर्जाचा तांदूळ परवडेल. मग तुम्ही दुय्यम दर्जाचा का घ्याल? सगळ्यांनीच असा विचार केल्यामुळे त्या गोष्टीची मागणी कमी होते. मग अशा गोष्टींना अर्थशास्त्रात ‘Inferior Goods’ म्हणतात.

आता ह्या ‘Inferior Goods’ साठी चांगला मराठी प्रतिशब्द सुचवा.