आजोबा — एक पवित्र व्यक्तिमत्व
सुयोग अनिल देशपांडे
मी आजोबांचा आशीर्वाद घेवून शिकण्यासाठी राजस्थान कोटा येथे गेलो होतो. कोट्यावरून फोन करून आजोबा आजींशी बोलायचो. “आशीर्वाद सदैव आहेत आमचे सुयोगराव” ह्या वाक्याने फोने संपायचा आणि मी परत माझ्या दुनियेत रमून जायचो. आलीकडे आजोबांची तब्येत खालावत चालली होती, फोन वर सुद्धा २-३ वाक्ये बोलून त्यांना धाप लागायची व ते आज्जीना फोन द्यायचे. मार्चचा महिना होता आणि आजोबांची तब्येत खूपच खराब झाली होती. आई बाबांचा बोलण्या वरून लक्षात येत होते की आजोबांची प्रकृती खूप खराब आहे. मला आजोबाना भेटून जवळपास १० महिने होत आले होते.
तो दिवस आला, दुसरे दिवशी सकाळी दि.१८ एप्रिल २००४ ला माझी IIT entrance परीक्षा होती आणि परीक्षेसाठी मी, बाबा, आई आणि दादा पुण्याला आलो होतो. Plan होता की परीक्षा झाली की मी आजोबाना भेटायला जायचे. मी परीक्षेसाठी शेवटची revision केली आणि झोपायची तयारी करू लगलो. तोच फोनची घंटी वाजली, बाबांनी फोन उचलला, शांतता असल्याने फोनवरून पलीकडचे बोललेही ऐकू येत होते. मला आवाज ऐकू आला “दादा गेले.….”
मी गच्चीवर पळालो, वर आकाशाकडे बघत नमस्कार केला. आजोबा गेले होते, एक पर्व संपले होते, तो नाजूक पण खंबीर आवाज परत ऐकू येणार नव्हता, परत कोणीच माझ्या बालिश विनोदांवर एवढे पोटातून हसणार नव्हते, परत एव्हढ्या प्रेमाने मला सुयोगराव कोणीच बोलावणार नव्हते, परत देशपांडे गल्लीत तेव्हढ्या अभिमानाने दादांचा नातू म्हणून जाता येणार नव्हते, परत त्या आवाजात वैजापूरच्या ओसरीवर देवे आणि मंत्रपुष्पांजली दुमदुमणार नव्हती, सर्वाना अभिमान असलेल्या त्या वाड्यात परत दसरा आणि दिवाळी होणार नव्हती, ते दरारायुक्त प्रेम मिळणार नव्हते. माझे आजोबा गेले होते…
मी गच्चीवरून खाली आलो. मला काहीच कळत नव्हते आणि ५ मिनिटात आई-बाबा वैजापूरसाठी निघाले. मला बाबांशी बोलायचे धारिष्ट्य होत नव्हते. आईने मला बाजूला घेतले आणि सांगितले, परीक्षा नीट दे, आजोबांचे आशीर्वाद आहेत तुला, त्यांना फार आनंद झाला असता तू IIT ला गेला आहेस हे बघून. आई, बाबा, दादा १० मिनिटात निघून गेले. कसाबसा पलंगावर पडून मी झोपण्याचा प्रयत्न करू लागलो, सारखा आजोबांचा तो तेजस्वी हसरा चेहरा डोळ्यासमोर येत होता. त्यांच्या आवाजातील ते
“यो अपामायातन वेदा । आयतनवान भवति।।” कानात ऐकू येत होते. जीवनातली सर्वात कठीण रात्र. सकाळ झाली, मला आजोबांची प्रचंड आठवण येत होती, आणि २ तासात माझी परीक्षा होती. माहित नाही का पण त्या क्षणी एक आनंदाचा प्रसंग आठवला. १९९७ साली असाच एक फोन आला होता, आजोबा सोफ्यावर बसलेले होते. फोन माझ्या शाळेतून होता, मला एक scholarship मिळाली होती. मी आनंदाने उड्या मारायला लागलो. yes yes म्हणत मी आजोबांच्या पाया पडलो आणि आजोबांनी मात्र पाठीवरचा हात उचलला नव्हता. मी हळूच वर पहिले, आजोबा म्हणाले इथे बसा सुयोगराव — नीट ऐका, एक सुभाषित सांगतो —
“उदये सविता रक्तो, रक्त:श्चास्तमये तथा | सम्पत्तौ च विपत्तौ च महतामेकरूपता ||”
ज्या प्रमाणे उदय आणि अस्त, दोन्ही वेळेस सुर्य तेवढाच लाल आणि तेजस्वी असतो, त्या प्रमाणे थोर व्यक्तीची वृत्ती सुखात आणि संकटात समानच असते.
scholarship मिळाल्याबद्दल अभिनंदन तुमचे, पण एवढा आनंद करू नये, आयुष्यात यश आणि अपयश दोन्हीही शांततेने आणि समान पद्धतीनेच झेलता आले पहिजे सुयोगराव. ७ वर्षानंतर आज तो संकटाचा, दुखाचा दिवस आला होता. कदाचित १९९७ च्या त्या दिवशी मला ते हेच समजावीत होते, कदाचित त्यांना त्यांचा शेवट माहित होता, कदाचित ह्या प्रसंगाची आठवण करून देताना आजही ते कुठून तरी मला धीर देत होते, आशीर्वाद देत होते, कदचित……पण आजोबा फक्त २४ तास थांबले असते तर मी त्यांना बघू शकलो असतो, शेवटचा स्पर्श करू शकलो असतो. काही गोष्टी कधीच कळत नाहीत. देवभेटीला आतुर झालेल्या प्रभाकराने देह आर्पिला होता, कोणाचीही वाट न बघता. अगदी त्यांनी रचलेल्या भजनासारखा…
प्रभाकराने देह आर्पिला । देवा तुजला, दयाळा, देवा तुजला ।।
आठवणी:
माझ्या आजोबासोबतच्या सर्वात प्रेमळ आठवणी ह्या शाळेतून १२:३० वा आल्यानंतर त्यांच्या सोबत घालविलेला एक तास. ते औरंगाबादला आले की मग मी शाळेतून आल्यावर आम्ही सोबत गरम गरम जेवण करायचो आणि पहिला अर्धा तास हा माझ्या बोलण्याचा असायचा. मी शाळेतील विनोद सांगायचो आणि आजोबा अगदी मनातून (बेंबीच्या देठापासून) हसायचे. “कुठून आणता हो सुयोगराव तुम्ही हे विनोद?”. हासताना त्यांना कधी कधी ठस्का लागायचा, पाणी पिणे झाले कि ते परत माझ्याकडे बघायचे — “थांबले का तुम्ही?” ही ती नजर. मग हाक मारायचे “जयश्री, स्वयंपाक खूप छान झाला आहे ग ”

मग मला सांगायचे “ब्राह्मणाने गरम भातावर तूप हे घेतलेच पाहिजे, मुंज झाली आहे न तुमची? तूप टाकून भात खावा मग.” ते सोबत असले की मी तूप घ्यायचो, आपोशन घालायचो, ते बघायचे आणि हसायचे, ढोंगीपणा फार लवकर पकडीत होते ते, वकीलच ते!
जेवणानंतर अर्धा तास ही पर्वणीच असायची. आजोबा पुराण, पेशवे, गुरूचरित्र, पंचतंत्र, महाभारत ह्यातील कुठली तरी एक सुंदर गोष्ट किंवा उपनिषदातील तत्वज्ञान सांगायचे. त्यांचे कथाकथन अप्रतिम होते, श्रोते (मी, संदीप दादा, आज्जी आणि आई ) अगदी खिळून बसायचो. नेहमी त्यांच्या गोष्टीत काहीतरी शिकण्यासारखे असायचे. छोटी गोष्ट असली तर मग प्रश्नोत्तरासाठी वेळ मिळायचा. मग माझा रपाटा सुरु व्हायचा — आजोबा, देशपांडेचा इतिहास सांगा, आपला वाडा कोणी आणि कसा बांधला ते सांगा, तुमच्या हिमालयातील प्रवासाच्या गोष्टी सांगा, आपण कुठलचे?दत्त म्हणजे काय? जर का दत्तगुरु हे अत्री ऋषींचे पुत्र तर मग आपले गोत्र वसिष्ठ का? तुम्ही देव पाहिला आहे का? तुमचा सगळ्यात आवडता देव दत्त की महादेव? आणि सर्वात महत्वाचा प्रश्न -
आजोबा देव असतो का, आणि जर देव नसेल तर आपण पूजा का करतो ? त्यांनी होकारार्थी अथवा नकारार्थी उत्तर दिले नाही. पण त्यांच्या नातवाने विचारलेला प्रश्न ते असा बिनउत्तराचा ते जावू देणार नव्हते. ते म्हणाले मी नंतर सांगतो —
मी लहान असताना आईला खूप त्रास द्यायचो, त्यांनी दुसरे दिवशी ते पहिले आणि मला म्हणाले — सुयोगराव, तुमच्याकडे १० मिनिटे वेळ असेल तर मी कालच्या प्रश्नांचे उत्तर देतो. आजोबा काही तरी सांगणार हे बघून मी पटकन ऐकायला बसलो — माझे शंका निरसन होणार होते, आजोबा बोलतात त्यावर माझा पूर्ण विश्वास होता आणि आज त्यांचे उत्तर ठरविणार होते की मी देवावर विश्वास ठेवला पाहिजे का नाही. ते म्हणाले —
“देव आहे का नाही हा प्रश्न लहान मुलांना पडणारच, आणि देव काही सगळी कडे जावू शकत नाही, म्हणूनच देवाने प्रत्येक घरात पोहोचण्यासाठी आई निर्माण केली आहे!”
काय वाक्य होते ते!! वकील नाही तर एक प्रेमळ आजोबा व एक प्रेमळ सासरे म्हणून त्यांनी ह्या एका वाक्यात बरेच काही साधले होते. ते असेच बोलायचे, जे वर्षानुवर्षे तुम्ही विसरू शकणार नाहीत.

दुसरी आठवण ही थोडी खासगी आहे. वैजापूरला सर्वजन सांगायचे की तुझे आजोबा फार कडक आहेत रे बाबा! असतील ही, पण एक नातू म्हणून मी त्यांचे वेगळेच प्रेम पहिले आहे. आम्ही लहान असताना बरेचदा शनिवार, रविवार वैजापूरला जायचो. आई-बाबा आजोबाना bread आवडते आणि वैजापूरला मिळत नाही म्हणून क्रांतीचौकातील आरे च्या दूध van मध्ये सकाळी ५:३० वाजता वैजापूरला निघायच्या आधी जावून bread आणायचे. ६:३०-७:०० ची बस घेवून आम्ही ९:०० पर्यंत वैजापूरला पोहोचायचो. आम्ही वैजापूरला पोहोचायच्या आधी आजोबांची पूजा, वैशुदेव झालेला असायचा व ते त्यांच्या खुर्चीत बसून पेपर वाचीत बसलेले असायचे. वैजापूरला गेले की तो क्रम ठरलेला असायचा, आज्जी दारात दृष्ट काढणार, मग हौदातून पाण्याने हात पाय धुवून आधी देवघरात पाया पडायचे, मग आजोबांच्या पाया पडायचे. माझ्या आई-बाबांवर त्यांचे अपार आणि वेगळेच प्रेम होते. कसा आहेस अनू? काम कसे चालू आहे? थोडे बोलणे झाले आणि बाबा पायापडून आत गेले की आजोबा हळूच उजव्या हाताने त्यांच्या डाव्या बाजूच्या धोतराचा एक पदर वर करायचे आणि बाबांना बघून डोळ्यात आलेले अश्रू पुसायचे. एक खंबीर पितामह असा हळवा होताना मी बरेच वेळा पहिले आहे. आम्ही वैजापूरहून निघालो की बाहेरच्या ओट्यावर दत्तमंदिराकडे चेहरा करून आम्ही अगदी दिसेनासे होईपर्यंत आम्हाला बघत राहीचे. आम्ही मागे वळून टाटा करायचो, ४-५ वेळा! आता तो ओटा त्या पावलांसाठी सतत आतूर असेल.
“अनू” म्हणायचे ते बाबांना. बाबा “अनू” आणि मी मात्र “सुयोगराव”!
वर्ष २०१०, आम्ही ठाण्याला आणि मी अमेरीकेला स्थलांतरित झालो होतो परंतू औरंगाबाद मध्ये भरपूर नातेवाईक असल्याने अजूनही औरंगाबादला नेहमी जाणे होते. मी ठाण्याहून जनशताप्दी मध्ये बसलो, हातात पुस्तक होते, ३ तास गेले आणि नाशिकला बरेच लोक चढले-उतरले. माझ्या बाजूला एक पन्नाशीतला माणूस बसला. मला औरंगाबादला पोहचण्याची ओढ होतीच परंतु मध्ये रोटेगाव येणार होते, तिथेच उतरावे लागायचे वैजापूरला जाण्यासाठी. ट्रेन थांबली, मी खाली उतरलो, माझे गाव होते ते. उगीचच वैजापूरच्या दिशेने बघितले, वाडा दिसेल ही वेडी आशा. २ मिनिटामध्ये गाडी परत सुरु झाली. चाय — चाय चा आवाज पूर्ण डब्ब्यात येवू लागला. तोच तो बाजूचा माणूस मला विचारु लागला —
- कोण तू ?
- मी मनात विचार केला, एका अनोळखी माणसासाठी मी फक्त एक सहप्रवासी, मी सुयोग , अजून काय सांगावे त्यांना?
- मी तुझे पुस्तकावरील नाव वाचले, तू सुयोग अनिल देशपांडे, बरोबर ? कुठलचा?
- औरंगाबाद, पण मुळचा वैजापूर
- अविनाश देशपांडेचा कोण तू ?
- मी त्यांचा पुतण्या
- सख्खा?
- हो, सख्खा.
- म्हणझे तू प्रभाकर देशपांडेचा नातू ?
- आता मी ही थोडा आश्चर्यचकित झालो होतो, हो मी त्यांचा नातू, तुम्ही पण वैजापूरचे का, तुम्ही आमच्या नात्यातले का?
- नाही, मी औरंगाबाद उच्च न्यायालयात वकील आहे.
- आजोबांसोबत काम केले होते का तुम्ही?
- नाही रे, मी त्यांच्यापेक्षा ३०-४० वर्षे छोटा. काम नाही केले पण नाव खूप ऐकले आहे तुझ्या आजोबांचे.
- खरच? कशे काय?
- अरे त्यांचे नाव आजही बार कॊन्सिल मध्ये घेतले जाते, खूप तत्वनिष्ठ वकील होते ते. असे म्हणतात की त्यांचे प्रतिस्पर्धी त्यांचे नाव ऐकूनच थोडा धीर खचायाचे.
विचार केला की वाटते, आज नोकरी सोडल्यावर एका महिन्यात लोक आपल्याला विसरतात, असे काय केले असावे जेणेकरून ३० वर्षानंतर देखील लोक त्यांचे नाव आदराने घेतात. ती देशपांडे पिढीच वेगळी होती काय?
आजोबांची स्मरणशक्ती देखील प्रचंड दांडगी होती. हरिद्वार ऋषिकेशला त्यांनी अगदी कुठल्या हॉटेल (चोटीवाला) मध्ये जेवण करा हे देखील सांगितले होते. गणपतीपुळेला जायच्या आधी सागितले होते की तिथलचा समुद्र अचानकच खोल होतो, आई बाबांचा हात सोडायचा नाही, समुद्रात आत जायचे नाही. गोकर्णला गणपतीच्या डोक्यावर हात लावून पहा तिथेच रावणाने गणपतीच्या डोक्यात पाण्याने भरलेला घडा मारला होता — आणि मग ती घडा मारलेली गोष्टही सागितली.
आज दहा वर्षांनी डॉ. प्रभुणे ह्यांनी घेतलेल्या मुलाखती मुळे आजोबांचा आवाज ऐकायला मिळाला. परत खूप काम करण्याचा उत्साह आला, ते वाक्य ऐकले —
“मेहेनत करत राहायची, कधीही हिम्मत हरायची नाही”

५ वर्षापूर्वीची गोष्ट आहे, मी रायगड पाहायला गेलो होतो, गड पाहून थक्क झालो आणि मनात एक विचार आला. त्या विचाराने, त्या कल्पनेने अंगावर रोमांच उभा राहिला — गड तर सुंदर आहेच पण ज्या वेळेस शिवराय ह्या गडावर राज्य करीत होते, मावळे इथे फिरत होते, पोवाडे इथे गायले जात होते, रात्री रोषणाई होत होती त्या वेळेस काय वेगळीच शान असेलना ह्या गडाची!! रायगडचा वास्तू मी पहिला पण ती शिवरायांची शान परत येणार नाही.
परंतु मला अभिमान आहे की मी आपल्या वाड्याचा तो थाट पहिला आहे. त्या वास्तूत मी भजने आणि काकड आरती ऐकली आहे. त्या वास्तूत पाडव्याला होणारा कुळाचार मी पहिला आहे, देवघरात बसून मी सानेवर चंदन उघाळले आहे, माझ्या पूर्वजांनी ज्या आसनावर बसून पूजा केली असेल त्याच आसनावर बसून मी देवाला गंध लाविले आहे, दिव्यावर धरून विळीच्या पातीवर बनविलेले काजळ मी डोळ्यात लाविले आहे, आतली खोली धान्याने ओथंबून वाहताना मी पहिली आहे, वैशुदेवासाठी सकाळी सकाळी शिजलेल्या गरम भाताचा सुगंध मी घेतला आहे, त्या वास्तूत होणारे अन्नदान मी पाहिले आहे, अन्नदान होताना पूर्ण ओसरीवर ब्राह्मण त्रिसुपर्णचा घोष करताना मी ऐकले आहेत, स्वतः बनविलेले तोरण मी वाड्यावर लाविले आहे, मंत्रपुष्पांजली व वेद्घोशाने दुमदुमणारी ओसरी मी अनुभवली आहे.
पुढच्या पिढीसाठी मात्र आता वाडा रायगड झाला आहे. भव्य वास्तू आहे पण शिवराय मात्र नाहीत…..