अष्टांगिक मार्ग

१. सम्यक दृष्टी– अविद्येचा विनाश हाच सम्यक दृष्टीचा उद्देश आहे. ती मिथ्या दृष्टीची विरोधीनी आहे.

१. बुध्दीने कोणतीही गोष्ट योग्य अयोग्य मानणे

२. कर्मकांड आणि क्रियाकलाप याना व्यर्थ समजणे

३. शस्त्रांचा अयोग्य उपयोग मिथ्या आहे असे समजणे

४. मिथ्या विश्वासापासून मुक्ती, प्रकृतीच्या नियमांविरुध्द एखादी गोष्ट घडू शकते असे न मानणे

५. कपोलकल्पित गोष्टी ज्यांचा यथार्थतेशी आणि अनुभवांशी संबंध नाही, अशा गोष्टींवर विश्वास न ठेवणे

६. माणसाचे मन स्वतंत्र आणि विचार स्वातंत्य राखणे.

७. दुराचरणाला दुराचरण समजणे

८. सदाचरणाला सदाचरण समजणे

९. लोभ, मोह, द्वेष यांना दुराचरणाचे मूळ समजणे

१०. अलोभ, अमोह, अद्वेष ह्यांना सदाचरणाचे मूळ समजणे

११. दु:ख, दु:खसमुदाय, दु:खनिरोध आणि दु:खाचा निरोध करणारा मार्ग ह्या सर्वांना
 समजून घेणे

१२. दहा चित्तबंधनापासून मुक्त होण्याचा प्रयत्न करणे

१३. मनात आत्म्याला स्थान न देणे

१४. कोणत्याही दृष्टीला चिकटून न राहणे

१५. प्रतीत्य समुत्पाद म्हणजे काय ह्याचे सत्यज्ञान होणे

२. सम्यक संकल्प-

संकल्प म्हणजे दृढ विचार. मनुष्याच्या मनात संकल्प-विकल्पांचा(अस्थिर विचार) उदय होणे स्वाभाविक आहे. परंतु संकल्प विकल्पांचे ’सम्यक’ होणे नितांत आवश्यक आहे. ज्या संकल्पाच्या योगाने आत्महिताबरोबरच परहितही साधले जाते, त्याला ‘सम्यक संकल्प’ म्हणतात.

प्रत्येक माणसाला काही ध्येये, आकांक्षा आणि महत्त्वाकांक्षा असतात. अशी ध्येये, आकांक्षा आणि महत्त्वाकांक्षा ही उदात्त आणि प्रशंसनिय असावी. ती शुद्र आणि अयोग्य नसावी. हा ‘सम्यक संकल्पा’ चा आशय आहे.

३. सम्यक वाणी-

१. माणसाने जे सत्य असेल तेच बोलावे

२. असत्य बोलू नये.

३. माणसाने दुस~याविषयी वाईट बोलू नये.

४. माणसाने दुस~याची निंदानालस्ती करण्यापासून परावृत्त व्हावे.

५. माणसाने आपल्या लोकांविषयी रागाची किंवा शिवीगाळीची भाषा वापरु नये

६. माणसाने सर्वांशी आपुलकीने व सौजन्याने बोलावे.

७. माणसाने अर्थहीन मूर्खपणाची बडबड करु नये. त्याचे बोलणे समंजसपणाचे व मुद्देसूद असावे.

४. सम्यक कर्मांत-

साधारणत: सम्यक कृती ही पंचशीलावर आधारित आहे. ही बुध्दधम्माची प्राथमिक तत्त्वे आहेत.

१. हत्या न करणे, प्राणीमात्रावर दया करणे.

२. कांही न स्विकारणे, परोपकार व औदार्य आचरणात आणणे.

३. संवेदनाचा गैरवापर नसावा, शुध्द आचरण व आत्म संयम असावे.

४. असत्य व कठोर वाचा याचा उपयोग करु नये, प्रामाणिकपणा, सचोटी व वक्तव्यापूर्वी वैचारिकता यांचे आचरण असावे.

५. मद्यपान करु नये जे अनियंत्रित वर्तनास प्रेरित करते, आत्मसंयमन व विचारपूर्वक आचरण असावे.

उच्च जीवनमानासाठी या पांच तत्वांचे आचरण आवश्यक आहे. जो याप्रमाणे मार्गक्रमण करेल, कृती करेल, तो इतरांनाही त्रासदायक नाही व स्तत:साठी सुध्दा.

५. सम्यक आजिविका-

सम्यक आजिविका ज्या व्यवसायापासून समाजाला उपद्रव होणार नाही अशा घटकांशी संबंधित आहे. उपद्रवी व्यवहार पाच प्रकारचे आहेत ते सामान्य व्यक्तीने टाळले पाहिजेत. शस्त्रांचा व्यापार, जे व्यक्तीला कमीपणा प्राप्त करुन देतात असे व्यवहार, मद्य व्यवहार, विषारी घटकाचा व्यवहार व्यक्तीने टाळावेत आणि पैसे व्याजाने देऊन जास्त मिळकत प्राप्त करणेसुध्दा टाळावे.

६. सम्यक व्यायाम- आपणास निरनिराळ्या उद्देशांची प्राप्ती करण्यासाठी नाना प्रकारचे प्रयत्न करावे लागतात. परंतु सर्वश्रेष्ठ प्रयत्न त्यांनाच म्हणावे की ज्यामुळे आपले चारित्र्य घडविले जाते.

१. कोणत्याही अकुशल प्रवृत्ती आपल्या चारित्र्याचे अंग बनू नयेत.

२. यदाकदाचित चारित्र्यात काही अकुशल प्रवृत्ती असल्याच तर त्यांचा नाश व्हावा.

३. आपल्यातील कुशल प्रवृत्ती कधीही नाश पावू नयेत.

४. कुशल प्रवृत्ती वृध्दिंगत व्हाव्यात याकरिता सतत प्रयत्नशील असणे, ह्यालाच सम्यक व्यायाम म्हणतात.

७. सम्यक स्मृती- स्मृती म्हणजे सतत जागरुकता, उठताबसता, चालताफिरता, खातापीता, लहानमोठे काम करीत असतांना, करणा~याचे त्याच्याकडे संपूर्ण लक्ष असायला पाहिजे. त्याने अन्यमनस्क भावाने कोणतेही काम न करता जागरुकतेने करायला पाहिजे; ह्यालाच ‘सम्यक स्मृती’ म्हणतात.

पक्की आठवण ठेवणे व पुण्य धम्माचा स्वीकार करणे म्हणजेच स्मृती होय. कोणते कुशल व कोणते अकुशल, कोणते दोषयुक्त व कोणते दोषरहित, कोणते सेवनीय व कोणते असेवनीय ह्याची बरोबर आठवण ठेवून पुण्य धम्म तेवढेच स्वीकारणे म्हणजेच स्मृती होय.

८.सम्यक समाधी- कुशल कार्यात चित्ताची एकाग्रता होणे, म्हणजेच सम्यक समाधी होय. समाधी शब्दाचे अनेक अर्थ प्रचलित आहेत. जसे श्‍वासोच्छवास रोकून धरणे, काही दिवस किंवा तासाकरिता जिवंतपणी स्वत:ला जमिनीत गाडून घेणे, श्‍वासोच्छवास चालू असला तरी जागृतीविहीन होणे, प्राणांत होणे इत्यादिंनाही ’समाधी’ म्हणतात. परंतु अशा समाधीशी ‘सम्यक समाधीचा’ काहीच सबंध नाही. कोणत्याही एका चांगल्या विषयावर चित्ताला एकाग्र करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे सम्यक समाधी; स्वभावत: मन (चित्त) चंचल आहे. यास्तव त्याला एकाग्र-चित्त करणे म्हणजेच समाधी होय.