दश पारमिता

१. शील- शील म्हणजे नीतिमत्ता. अकुशलापासून अलिप्‍त व कुशल करण्याची प्रवृत्ती बळावणे. शील म्हणजे पापभीरुता.

२. दान- दुस~यांच्या कल्याणाकरीता आपली संपत्ती, रक्त, शरीराचे अवयव, एवढेच नव्हे तर आपल्या प्राणाचेही बलिदान करणे म्हणजे दान.

३. उपेक्षा- उपेक्षा म्हणजे औदासीन्याहून निराळी अशी अलिप्‍तता, अनासक्ती. फलप्राप्तीने विचलीत न होणे. परंतु निरपेक्षतेने सतत प्रयत्न करीत राहणे.

४. नैष्क्रम्य- नैष्क्रम्य म्हणजे ऎहिक सुखाचा त्याग.

५. वीर्य- वीर्य म्हणजे योग्य (सम्यक) प्रयत्न. हाती घेतलेले काम यत्किंचितही माघार न घेता अंगी असलेल्या सर्व सामर्थ्यानिशी पूर्ण करणे.

६. शांती- शांती म्हणजे क्षमाशीलता. द्वेषाने द्वेषाला उत्तर न देणे हे याचे सार होय. कारण द्वेषाने द्वेष शमत नाही. तो फक्त क्षमाशीलतेनेच शांत होऊ शकतो.

७. सत्य- सत्य म्हणजे खरे. माणसाने कधीही खोटे बोलता कामा नये. त्याचे भाषण हे सत्यच असले पाहिजे. ते सत्याखेरीज दुसरे काहीही असता कामा नये.

८. अधिष्ठान- अधिष्ठान म्हणजे ध्येय गाठण्याचा दृढ निश्‍चय.

९. करुणा- करुणा म्हणजे सर्व मानवाविषयीची प्रेमपूर्ण दयाशीलता.

१०. मैत्री- मैत्री म्हणजे सर्व प्राण्यांविषयी-मित्राविषयीच नव्हे तर शत्रूविषयीदेखील, मनुष्यप्राण्याविषयीच नव्हे तर सर्व जीवमात्राविषयी बंधुभाव बाळगणे.