धम्म म्हणजे भारतीय संविधानाचे प्राणतत्त्व

डॉ. यशवंत मनोहर | साभार — लोकराज्य

बुध्दाचा धम्म हा आदर्श समाजाचेच संविधान होय आणि भारतीय संविधान म्हणजे आदर्श समाजाचा धम्मच होय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर केवळ कायद्याचे तज्ञच नव्हते, जगातील संविधानाचे अभ्यासक होते. भारतीय समाज संस्थेचे आणि या समाजसंस्थेला आधारभूत ठरलेल्या तत्त्वज्ञान परंपरांचेही ते अभ्यासक होते. भारतीय समाजातील सामाजिक, राजकीय, आर्थिक अन्यायाचे चित्र त्यांनी स्पष्ट करुन घेतले होते. या सर्व प्रचंड अभ्यासामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भारतीय समाजक्रांती संबंधीची भूमिका पक्की झाली होती. भारतीय संविधानाच्या निर्मितीच्या काळात त्यांची प्रज्ञा एका परिणत अवस्थेला पोचली होती. भारतीय समाजात मूलगामी परिवर्तन घडून यावे; हा समाज विज्ञाननिष्ठ, इहवादी आणि कणावदी व्हावा, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ठामपणे वाटत होते.

याच काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा बुध्द धम्माचा अभ्यास पुर्ण होत आला होता. बुध्दाच्या धम्मात त्यांना आदर्श भारतीय समाजाचे प्रारुप दिसले होते. त्यांच्या संपूर्ण चिंतनप्रक्रियेवर धम्माचा प्रभाव याही आधीपासूनच पडायला लागलेला होता. एकेकाळी भारत कधीतरी बौध्दमय होता. पण या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संपूर्ण मनच बुध्दमय झाले होते. त्यांचे संपूर्ण भावविश्वच धम्माने व्यापले होते.

१९४६ साली त्यांनी मुंबईत सिध्दार्थ महाविद्यालयाची स्थापना केली. महाविद्यालयाचे सिध्दार्थ नाव ठेवण्यामागील त्यांचा उद्देश स्पष्ट होता.पुढे १९५० साली औरंगाबादेला त्यांनी मिलींद महाविद्यालयाची स्थापना केली आणि औरंगाबादच्या मिलींदच्या शैक्षणिक परिसराला त्यांनी नागसेन वन हे नाव दिले.

१९५१ मध्ये बुध्द आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ लिहीण्याचा विचार त्यांच्या मनात आला.

या सर्व घटितांचा अर्थ असा की या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भावविश्वात आणि विचारविश्वात बुध्द पक्का स्थानापन्न झाला होता. याच काळात म्हणजे १९४६ पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाला आपल्या जिवनदृष्टीचा आशय आणि दिशा देत होते.

या वेळच्या त्यांच्या धम्ममनस्कतेच्या मुद्रा एकूणच संविधानाच्या वैचारिक जडणघडणीवर उमटणे साहजिकच होते.

धम्माच्या इतिहासात आजवर तीन प्रमुख महानायक झालेले आहेत. बुध्द म्हणजे धम्माचा संस्थापक महानायक आहे. अशोक ह दुसरा महानायक आहे. आणि त्यांच्याच कर्तृत्वामुळे भारत बौध्दमय झाला होता. या देशाच्या सांस्कृतिक इतिहासातल्या काही थोड्यागोष्टी कोणत्याही वैचारिक वादळामध्ये उरतीलच. त्यात एक नाव अशोकाचे असेल. भारतीय मानवतेचा इतिहास या विशेषनामाला मुजरा करुनच पुढे जाईल. त्यात मला शंका वाटत नाही. अशोक चक्र भारताच्या राष्टध्वजावर आहे. या चक्राला सत्य धर्माचे आणि शांततापूर्ण परिवर्तनाचे प्रतिक मानले जाते.

आणि २६ जानेवारी १९५० रोजी भारताने सारनाथमधील अशोक स्थंभाचे शीर्ष आपले राष्ट्रचिन्ह म्हणून स्वीकारले आहे. हा स्थंभ अशोकाने मृगदाय वन येथे उभारला होता. इथे बुध्दाला मानव कल्याणाच्या तत्वज्ञाची प्राप्ती झाली होती. आणि इथेच त्याचे पहिले धम्म व्याख्यानही झाले होते.

या राष्ट्रचिन्हावर सत्यमेव जयते असे नमूद करून भारताने सत्याची महत्ता मान्य केली आहे. या राष्ट्रचिन्हातील सिंहाच्या पायाशी अशोक चक्र आहे. हे राष्ट्रचिन्ह संविधानाच्या मुखपृष्टावरही आणि अशोक धम्माच्या शीर्षक पृष्टावरही आहे. आणि अशोक धम्म्माच्या इतिहासातील महानायक होता. राष्ट्राने अशोकाच्या स्वीकाराने धम्माचाच अवलंब केला आहे. धम्माचीच बांधीलकी पत्करलेली आहे. याप्रकारे संविधानाच्या देहावरही धम्मप्रतीक आहे आणि संविधानाच्या अंतरंगातही धम्मच आहे. म्हणूनच धम्म हा भारतीय संविधानाचा प्राण आहे असे म्हणायला हवे.

धम्म हे इहवादी तत्त्वज्ञान आहे. बुध्दिवाद हा त्याचा अर्थ आहे. विज्ञानदृष्टी ही बुध्दाच्या धम्माची विचार करण्याची पध्दती आहे. सर्वच सतत बदलत राहते. हा धम्माचा गतीवादी वा प्रगतीवादी दृष्टीकोण आहे. जात, वर्ण, वर्ग वा लिंग असा कोणताही भेद धम्माला मान्य नाही. एक जाती-वर्णविहीन समाज, स्त्रि-पुरुष समतेवर अधिष्टत असलेला समाज हा धम्माचा आदर्श आहे. बुध्द हे सर्व प्रकारच्या विषमतांच्या आणि अंधश्रध्दांच्या विरुध्द सुरु झालेले आंदोलन होते. बुध्दाने निब्बाणाची कल्पना मांडली ही कल्पना आदर्श मानवी संबंधांचीच कल्पना आहे. बुध्दीवादी माणसाने करुणामय वृत्तीने केलेले आचरण म्हणजे निब्बाण. निब्बाण ही संपुर्ण समाजाचीच जीवनशैली व्हावी या साठी बुध्द प्रयत्न करीत होता. प्रतीत्यसमुद्पाद हा बुध्दाच्या विज्ञानदृष्टीचा पुरावा आहे. संपुर्ण समाजाचे एक नवे मन, संपुर्ण जीवनाचे एक नवे मन हे बुध्दाचे द्येय होते. हा खरे म्हणजे संपुर्णत: मानवी प्रतिष्ठेच्या प्रस्थापनेचाच प्रस्ताव होता.

संविधान सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाचे शिल्पकार या नात्याने २५ नोव्हेंबर १९४९ रोजी समारोपाचे भाषण केले या भाषणात त्यांनी बौध्द भिक्षुंच्या संघातील लोकशाहीचा निर्देश केला आहे. त्यांनी म्हटले होते, “बौध्द भिक्खुसंघाचे परिशिलन केल्यास हे स्पष्ट दिसुन येते की भारतात नुसती पार्लमेंटच होती असे नव्हे, तर आधुनिक पध्दतिचे पार्लमेंटरी नियमही त्यांना पुर्ण अवगत होते. पार्लमेंटात कोणी कोठे बसावे, ठराव कसे आणावे, कोरंम किती असावा, पक्षप्रमुख कोणास मानावे, गुप्त मतदान कसे करावे, अविश्वासाचा ठराव कसा संमत करावा. वगैरेसंबधी बौध्द भिक्षुनी आपल्या संघात नियम केले होते. हे पार्लमेंटरी नियम गौतम बुध्द फक्त भिक्षु संघासच लागु करीत होते हे खरे असले तरी, बुध्दाने ते नियम तत्काळीन चालत असलेल्या राज्य पध्दतीतुन घेतले असावेत.” याचा अर्थ भारतात पूर्वी लोकशाही होती. इथे त्या काळात प्रजासत्ताक राज्ये होती, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांगतात आणि १९५० साली भारताने स्वीकारलेल्या आणि संविधानात अंतर्भुत असलेल्या लोकशाहीचे नाते ते एका अर्थाने धम्माशी जोडतात.

एवढेच नव्हे तर संविधानाच्या उद्देशिकेमध्ये ज्या स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या मुल्यत्रयींच्या ध्येय म्हणुन निर्देश आहे. ती मुल्ये आपण फ्रेंच राज्यक्रांतीतून घेतली नसून आपण ती बुध्दाच्या धम्मातुन घेतलली आहेत, अस डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांगतात. याचा अर्थ संविधानाचा सर्व वैचारिक गाभा आपणाला धम्मात दिसतो. धम्माचे आणि संविधानाचे ध्येय एकच आहे. धम्माला हवा असलेला माणूस आणि संविधानाला हवा असलेला माणूस सारखाच आहे. बुध्दाला हवे त्या लोककल्याणकारी समाजाचे रुप आणि संविधानाला आभिप्रेत असलेल्या समाजाचे रुप यात कुठेही तफावत नाही.

संविधानतील मुलभुत कर्तव्य आणि मार्गदर्शक तत्वे या भागातील संपूर्ण आशयावर धम्माचा प्रभाव पडलेला आहे. भारतीय संविधानाची उद्देशिका ही एखाद्या सुंदर कवितेसारखी आहे. सर्व देशाने व्यक्त केलेला संकल्प या उद्दीशिकेची विज्ञानदृष्टी आहे. या पायाभुत तत्त्वावर सामाजिक, आर्थिक आणि नैतिक न्यायाने आणि स्वातंत्र्य, समता, बंधुत्वानेयुक्त अशी समाज रचना हे संविधानाचे सामाजिक धेय आहे. या उद्देशिकेत एका आदर्श समाजाचे प्रारुप संक्षेपाने आलेले आहे. संविधान कोणताही भेद मानत नाही. ( कलम :१५,) संविधानाने अस्पृश्यता नष्ट करुन टाकली आहे.(७), संविधान एकरुप समान नागरी संहितेचा पुरस्कार करते.(४४), संविधान मादक पेयांचा निषेध करते.(४७), दुर्बल घटकांचे हित संविधानाला महत्वाचे वाटते. (४६), हिंसाचाराचा संविधान त्याग करते(५१:झ), विज्ञानदृष्टी, मानावतावादक, शोधकबुध्दी आणि सुधारणावादाचा पुरस्कार.(५१:ज) संविधान करते. धार्मिक, भाषिक व प्रादेशिक किंवा वर्गीय भेदाच्या पलिकडे जाऊन भारतातील सर्व जनतेमध्ये सामंजस्य व बंधुभाव वाढीला लावण्याची आणि स्त्रियांना प्रतिष्टेला उणेपणा आणणा~या प्रथांचा त्याग करण्याची भुमिका संविधान स्पष्टपणे मांडते. संविधानच्या सर्वच मुल्यदृष्टीतुन धम्मच बोलतो आहे, असे म्हणता येईल.

धम्म हा क्रातीचा कार्यक्रम आहे आणि क्रांती समाजातील नव्वद टक्के लोकांची गरज असते. संविधान हा क्रांतीचा कार्यक्रम आहे. आणि क्रांती ही समाजातील नव्वद टक्के लोकांची गरज असते. विषमतेमुळे ज्यांचे हित होते ते लोक समाजात फार कमी असतात. हे फार कमी लोकच क्रांतीला विरोध करतात, याचाच अर्थ नव्वद टक्के लोकांच्या हिताला विरोध करतात. धम्म आणि संविधान या दहा टक्के अंगुलीमालांना नव्वद टक्के लोकांच्या हिताशी जोडण्याचा निर्धार करतात.

याचा अर्थ धम्मात भारतीय लोकांच्या ईच्छा आकांक्षांची अभिव्यक्ती आहे. इ.स. पुर्व काळात लोकांच्या सामाजिक न्यायाच्या तहान भूकेतुन धम्म साकार झाला. भारतीय संविधानातही या सर्व सामाजिक न्यायाला पारख्या झालेल्या विराट जनसमुहाच्या आशा आकांक्षा प्रकट झालेल्या आहेत.

याचा अर्थ भारतीय संविधानाला आपले आदर्श, आपली नैतिक मूल्ये परदेशातून आयात करण्याची गरज भासली नाही. सामाजिक न्याय, आर्थिक न्याय तद्वतच राजकीय न्याय अशा सर्वच न्यायांची एक परंपरा भारतात आहे. ही समृध्द परंपरा बुध्दाची आहे. बुध्दाच्या धम्माची आहे. संविधानाने सर्व प्रकारची नैतिक पोषक द्रव्ये भारतातील बुध्द धम्मातुन घेतलेली आहेत. नैतिक मूल्यांच्या दृष्टीने संविधानाला असा देशी संदर्भ आहे.

सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक न्याय हा ज्या संविधानाचा ध्येयवाद असतो, त्याला धम्माशी नाते जोडावेच लागते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे भारतीय संविधानाने धम्माचा आशय, नैतिक आशय घेतला. तो आशय असा गहन, असा अपरिहार्य आणि कल्याणकारी आहे, की त्याच्या वाट्याला संविधानाच्या प्राणाचीच भूमिका आली. या प्राणामुळे संविधान जिवंतही झाले आणि सर्वच लोकांच्या कल्याणाचे सुंदर अभिवचनही झाले.