प्रतीक व प्रतिमेतील बौध्दधर्म

डॉ.र.रा.बोरकर | सौजन्य: लोकराज्य

बौध्द धर्म, हा जैन धर्म धर्माप्रमाणे वेदप्रामाण्यावर मुळीच विश्वास न ठेवणारा प्रमुख नास्तिक धर्म होय. या धर्माची मुहूर्तमेढ शाक्यकुलोत्पन्न गौतम बुध्दाने सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी वाराणसी जवळ सारनाथ येथे रोवली. त्यानंतर हा धर्म भारतभर व भारताबाहेर पसरला. बुध्द स्वत: मूर्तिपूजा विरोधक होते. ईश्वराच्या अस्तित्वाचा त्याने कधीच पाठपुरावा केला नाही. त्याचे म्हणणे होते की, “ तुम्ही स्वत:चे दीपक स्वत:च व्हा, आणि स्वत:लाच शरण जा.” असा त्याचा उद्घोष असे. त्यामुळे प्रतिमेला व तिच्या पूजेला स्थान नव्हते.

बुध्दाच्या महापरिनिवार्णानंतर (सुमारे इ.स.पू.४८३) मगधाचा राजा अजातशत्रू याच्यावेळी बौध्दांची प्रथम सभा(संगीती) भरली व बौध्द वाङमयाला दृढ रुप प्राप्त झाले. दुसरी सभा वैशालीस रेवंत भिक्षूच्या अध्यक्षतेखाली घेतली गेली. बौध्दाची तिसरी संगीती मौर्य सम्राट अशोक यांनी भरविली. येथे जुन्या मताचा पुन्हा विजय झाला. चौथी आणि महत्त्वाची बौध्द संगीती कुषाण राजा कनिष्क याचे काळात काश्मिरमधील कुंडलवन येथे झाली. ह्या सभेचा वसुमित्र हा अध्यक्ष होता. त्यावेळी थेरवादाचे पारडे उलटले व स्पष्टपणे बौध्द धर्म दोन भागात विभक्त झाले. थेरवादाला ’हीनयान’ म्हणू लागले तर सुधारणा वादी बौध्दांस ’महायानी’ म्हणू लागले. ह्यानंतर बौध्दांचा तिसरा पंथ निर्माण झाला, त्यास ’वज्रयान’ म्हणू लागले. ह्या पंथातील लोक तंत्र, मंत्र, हठयोगावर विश्वास ठेवणारे होते.

प्रतीक रुपात बुध्दाचे पूजन करण्याचे विधान बौध्द धर्मात पूर्वीपासूनच होते, पण बुध्दाची मूर्ती घडविण्याची आज्ञा नव्हती. म्हणजेच ह्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात येतो असा की, बौध्द धर्माला सुध्दा हीनयान काळात पूजनाचे महत्त्व पूर्वीपासूनच मान्य होते. परंतु मूर्ती ऎवजी प्रतीक पूजनास महत्त्व होते.

बौध्द प्रतीके

बौध्द धर्माच्या स्थापनेपासून बुध्दाची मूर्ती प्रत्यक्षात येण्याचे दरम्यान सुमारे सहाशे वर्षाचा काळ गेला. या काळात बौध्दांच्या आराधनेचे मुख्य केंद्र ’बुध्द’ तर होतेच, पण निर्वाण प्राप्त झालेल्या निराकाराला पुन्हा साकार करुन प्रत्यक्ष समोर उभे करण्याची कल्पना बळावली नव्हती. पण त्याच बरोबर निराकाराची शून्यात कल्पना करुन त्याची आराधना करणे शक्य नव्हते. साहजिकच बुध्दाकरिता प्रतीकाचा शोध सुरु झाला.

बुध्दाचे प्रतिनिधित्व करण्याकरिता समोर येऊ पाहाणारी प्रतीके शक्य तितकी ’ बुध्दाच्या जवळची’ हवी होती. अर्थात प्रत्यक्ष शरीर किंवा शरीराचे पंचभौतिक अवशेष अथवा अवशेषाची स्थापना केलेले स्थान यापेक्षा जवळचे काय असणार? या दृष्टीने ’स्तूप’ हे बुध्दाचे सर्वोत्तम प्रतीक होऊ शकत होते व ते झालेही. पण स्तूपाचा संबंध बुध्दाच्या निर्वाणाशी होता. साहजिक भाविक मनाला तितकासा सुखकर नव्हता. म्हणून बुध्दाच्या जीवनाशी संबंधित असलेल्या वस्तू व विशिष्ट घटनांचे स्मरण देणार्‍या वस्तू बुध्दाची उत्तम प्रतीके बनली. एकदा प्रतीके ठरल्यानंतर मग बुध्दाची उपासना, बुध्दाच्या सामर्थ्याची कल्पना, बुध्द चरित्राचे कलेत अंकन वगैरे गोष्टी सोप्या झाल्या. भरहूत आणि सांचीच्या स्तूपांवर जेथे बुध्द कथांचे चित्रण आहे, ती स्थळे बारकाईने पाहिल्यास हे चटकन लक्षात येईल की, गोष्टीची मांडणी करत असताना जेथे बुध्दाच्या अंकनाची गरज भासत असे, तेथे बुध्दाचे कोणते तरी प्रतीक आणून ठेवत. बुध्द मूर्ती अस्तित्वात येईपर्यंत सर्वत्र हीच पध्दत होती. याकाळात मान्यता पावलेली बुध्द प्रतीके पुढील प्रमाणे होती- (१) पांढरा हत्ती (२) कमळ (३) घोडा (४)बोधीवृक्ष (५) वज्रासन (६) गंधकुटी (७)भिक्षापात्र (८) प्रभामंडल (९) धर्मचक्र (१०) पदचिन्हे ११) त्रिरत्न (१२) स्तूप

अशोकाचा बौध्द धर्मास राजाश्रय

चंद्रगुप्त मौर्याचा नातू अशोक याने बौध्द धर्माचा स्वीकार करुन त्या धर्माच्या प्रसाराला हरप्रकारे सहाय्य केले. त्याच्या आश्रयाने या धर्मपंथीयाच्या हरतर्‍हेच्या वास्तू उभ्या राहिल्या. या वास्तू चित्रे व मूर्ती यांनी सुशोभित करण्यात आल्या, पण बुध्दास प्रतीक रुपातच दाखविले आहे. पूर्वी पेक्षा निराळाच आशय असणारा एक कलाप्रवाह उत्पन्न झाला. नव्या पंथाच्या गरजा भागविण्यासाठी नवनवे मार्ग चोखाळण्यास प्रारंभ झाला. योगायोगाने काही नवे मार्ग व तंत्रे ठाउक असणारे कलाकार व शिल्पी, अलेक्झांडर याने इराणच्या अकेमिनियन साम्राज्याचा नाश केल्यानंतर अकेमिनियननी बाळगलेल्या कलाकारांची व शिल्पींची वाताहत झाली व त्यातील काही काही गुणी कलाकार व पंडित पूर्वेकडे वळले व त्यांनी मगधचा आश्रय घेतला असावा, असे मौर्यकालीन कलेवरुन दिसून येते.

बुध्द प्रतिमेचे आगमन

इसवी सनाच्या सुरुवातीपर्यंत तरी प्रतीक पूजेला अधिक महत्त्व होते. परंतु त्यानंतर प्रत्यक्ष मूर्तीचा अभाव तीव्रतेने जाणवू लागला. सुधारणावादी महायानी बौध्दांना आपल्याकडील अभाव दूर करणे इष्ट वाटले. महायानी बुध्दमूर्ती घडविण्याच्या मागे लागले. मूर्ती कशी घडवावी, तिचे रुप, ध्यान कसे असावे या विषयीही त्यांनी खूप विचार केला, त्याविषयी काही नियमही बनवून ते ’साधनमाला’ ग्रंथात नमूद करुन ठेवले.

अग्निपुराणात बुध्दमूर्तीचे वर्णन असे- गौर वर्ण, पद्मासनात बसलेला, एक वरद मुद्रेत, दुसरा हात अभय मुद्रेत, कान लांब अगदी गालांना टेकणारे आणि मिखावर शांत भाव.

बुध्द मूर्तीचे दोन प्रकार आढळतात, एक म्हणजे बोधी प्राप्त होण्यापूर्वीचा, बोधिसत्व गौतम आणि दुसरा बुध्द गौतम.

महायान पंथीयांत बुध्दाची मूर्ती घडविण्याची इच्छाशक्ती बळावली असली , तरी जुन्या विचारधारेला डावलून कोणतेही नवे क्रांतिकारी परिवर्तन करावयाचे असल्यास केवळ धार्मिक आचार्य नैतिक बळावर त्यात बदल करु शकत नव्हते. महासांघिक बौध्दांना सत्तेचा पाठिंबा कुषाण राजा कनिष्क (इ.स. १ ते २ शतक) यांच्या कडून मिळाला. कनिष्काने जेव्हा इतर प्रभावशाली देवतांप्रमाणे आपल्या नाण्यावर प्रथमच बुध्दालाही स्थान देण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी बुध्द प्रतीमेचा अभाव तीव्रतर रुपात जाणवला असला पाहिजे. राजाज्ञेचे पाठबळ मिळताच महासांघिक बौध्दांच्या प्रेरणेने कुषाण राजाच्या उत्तर व दक्षिणेतील गांधार व मथुरा कलाशैलीतील पंडित बुध्द प्रतिमा निर्माण करण्यास पुढे सरसावले व दोन्ही कलेत बौध्द प्रतिमा अस्तित्वात आली.

कनिष्काच्या बहुसंख्य नाण्यांवर ’शावनानो शाओ कनेष्को कोशानो’ हा शक भाषेतील लेख ग्रीक लिपित असतो. या प्रकारच्या नाण्यांवरील भागात बाजूवर बुध्दाची उभी आकृती, त्याचे मागे प्रभावली, बुध्दाचे अंगावरील वस्त्र ग्रीक पध्दतीचे आहे. ग्रीक भाषेत इजऊऊज असे त्याचे नाव लिहिलेले असते. निर्विवाद अशी नाण्यांवरील बुध्दाची ही अति प्राचीन आकृती होय आणि प्रतिकानंतरच्या बुध्द प्रतिमेला पूजन्याचा हा एक प्रथम प्रयास होय.

बुध्दाची प्रथम मूर्ती ’बोधिसत्व’ या नावाखाली मथुरेच्या कलाकारांनी घडविली असे समजण्याकडे सध्या विद्वानांचा कल आहे. सारनाथ(वाराणसी) येथे भिक्षुपात्र याने बोधिसत्व नाव असलेली विशाल बुध्द प्रतिमा कनिष्काच्या तिसर्‍या राज्य संवत्सरात प्रतिष्ठित केली. सुरुवातीच्या बुध्द प्रतिमांना बोधिसत्व असे संबोधित केल्यामुळे सुधारणावादी बौध्दांनी एकाच दगडाने दोन पक्षी मारले. जुन्या मताप्रमाणे बुध्दाला साकार रुप तर दिले नाहीच, पण भक्ती करण्याकरिता बोधिसत्व या गोड नावाखाली बुध्दाचे साकार प्रतीक लोकांसमोर उभे करुन दिले. बुध्द हे बुध्दत्व प्राप्त करण्यापूर्वी बोधिसत्व होते या न्यायाने.

महाराष्ट्रात बौध्द धर्माचा प्रवेश आणि पुरावशेष

संपूर्ण महाराष्ट्र बौध्द धर्माशी संबंधित पुरावशेष जसे प्राचीन गुंफा, विहार, मूर्तिशिल्प इत्यादी सर्वत्र कोरलेली दिसतात. प्राचीन गुंफाच्या स्थापत्यावरुन आणि अन्य पुरावशेष साधनांवरुन महाराष्ट्रात बौध्द धर्माचा प्रवेश इ.स. पूर्व २-३ र्‍या शतकाच्या सुमारास झाला असे दिसते. महाराष्ट्रात बौध्द भिक्षुंच्या निवासाकरीता अनेक विहारे कोरली गेली. त्या सोबतच अनेक प्रार्थनास्थळे, म्हणजेच चैत्यगृहे, स्तूप आणि बौध्द प्रतिमा कोरल्या गेल्या असल्याचे पुरावे मिळतात. या संबंधीचे पुरावे विदर्भात पौनी(भंडारा), अडम, मनसर(नागपूर), भद्रावती(चंद्रपूर), वाशीम(वाशीम) आणि पातुर(अकोला) तसेच मराठवाड्यातील अजंठा आणि वेरुळ लेण्या जगप्रसिध्द आहेतच. याशिवाय नाशिक, भाजे, कार्ले, बेडसे, कान्हेरी, आणि अन्य ठिकाणच्या लेण्या प्रसिध्द आहेत. कोकणात खेड, चिपळूण, पाले, दाभोळ, सोपारा, चौल रेड्डी आणि अन्यत्र स्थळी हीनयान व महायान पंथाचे निदर्शक पुरावे दिसतात. याशिवाय पन्हाळेकाजी(रत्नागिरी) येथील काही लेण्यात वज्रयान पंथाची निदर्शक शिल्पे सुध्दा बघावयास मिळतात.

ह्यात महत्त्वाची बाब उपरोक्त वर्णन केलेल्या शैलगृहांवरुन(गुंफा) असे लक्षात येते की, ह्यातील बहुतांश शैलगृहे ही प्राचीन व्यापारिक मार्गावर कोरली गेली आहेत. त्याअर्थी या शैलगृहांचा वापर व्यापार्‍यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सुध्दा महत्त्वपूर्ण असावा.

महाराष्ट्रात बौध्द धर्माच्या हीनयान, महायान पंथासोबत इ.स. ९-१० च्या शतकाच्या उत्तरार्धात वज्रयान पंथाचा सुध्दा उदय होऊन, येथे तिन्ही पंथांचा प्रसार व प्रचार झाला, असे येथील लेण्यांवरुन व तेथील शिल्पांवरुन दिसते.

सम्राट अशोकाचे महाराष्ट्रावर साम्राज्य

महाराष्ट्रात मिळालेल्या अशोककालीन शिलालेखांवरुन त्याचे साम्राज्य महाराष्ट्रावर होते असे दिसते. इ.स.पूर्व २४६ च्या सुमारास सम्राट अशोकाने बुध्द धर्माचा स्वीकार करुन त्याचा प्रसार संपूर्ण भारतभर करण्याच्या प्रयत्नास सुरवात केली. त्याने योन नावाच्या(बॅक्ट्रीयन) धर्मरक्षितास अपरांताकरिता(कोकणाकरिता) बौध्द धर्माच्या प्रसाराकरीता पाठविले होते. असा उल्लेख महावंश आणि दीपवंश यात मिळतो. अपरांताची राजधानी सोपारा(सुपार्क) येथे होती. तेथे बौध्द धर्माची बैठक होती. आणि तेथूनच बौध्द सिध्दांताचा प्रसार संपूर्ण महाराष्ट्रभर केला जात असे. इ.स. पूर्व २-३ र्‍या शतकात बौध्द धर्माची स्थिती अगदी प्रगती पथावर होती, हे महाराष्ट्रभर मिळणार्‍या बौध्द पुरावशेषांवरुन स्पष्ट होते. याच काळात कोकणात इजिप्त व युरोप बरोबर व्यापारिक संबंध वाढले होते आणि त्याच माध्यमातून बौध्द धर्माच्या उन्नतीस व प्रसारास अधिक चालना मिळाली. फाहियान(इ.स. पूर्व ४२०) कोकणाविषयी उल्लेख करतात की, बौध्द धर्माची प्रार्थना स्थळे, भिक्षुंकरिता निवासस्थळे, सह्याद्रीच्या
 पर्वत रांगेत कोरली गेली होती. आजही कोकणपट्टीत आणि त्यालगतच्या परिसरात बौध्द धर्माच्या संबंधातील , इ.स. पूर्व दुसर्‍या शतकापासून ते इ.स. आठव्या-नवव्या शतकापर्यंतचे, पुरावशेष मिळतात.

विदर्भात बौध्द अवशेष

विदर्भात पौनी येथील जगन्नात टेकडीवर इ.स. १९६९-७० साली झालेल्या पुरातत्वीय उत्खननात विटात बांधकाम केलेला स्तूप मिळालेला आहे. स्तुपाचा व्यास ४२ मीटर असून घूमट पेटिका पध्दतीने बांधला आहे. स्तुपाभोवती ९ मीटर रुंदीचा प्रदक्षिणा पथ, भोवती वेदिका आणि चारही बाजूस प्रवेशद्वारे होती. हा स्तूप जगप्रसिध्द सांची येथील स्तुपापेक्षाही आकाराने मोठा असून त्यांच्या तोरणावर शुंगकालीन शिल्पे कोरली आहेत. येथील स्तूप आणि कलवशेषांवरुन प्राचीन कालीन पौनी हे विदर्भातील हीनयान पंथीय बौध्द मताचे मोठे केंद्र होते, असे हमखास सांगता येते.

याशिवाय अडम आणि मनसर(नागपूर) येथेही स्तुपाचे अवशेष मिळाले आहेत.

चिनी प्रवासी ह्युएनत्संग यांच्या मतानुसार भांदक म्हणजे भद्रावती येथे एक प्राचीन संघाराम व एक अशोक कालीन स्तूप होता. संघाराम म्हणजे भद्रावती येथील विंध्यासन लेणी होय. त्यात स्तूप कोरले होते. परंतु कालपरत्वे महायान काळात या लेण्याचा विस्तार करुन या हीनयान लेण्याचे परिवर्तन महायान लेण्यात होऊन त्यात भगवान बुध्दाच्या भव्यदिव्य मूर्ती कोरण्यात आल्यात.

अशा प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रात इ.स. पूर्व २-३ र्‍या शतकापासून ते इ.स. च्या २-३ शतकापर्यंतची हीनयान पंथाची निर्देशक प्रतीके आणि इ.स. ४-५ व्या शतकापासून इ.स.८-९ व्या शतकापर्यंतच्या प्रतिमा आणि अन्य बौध्द कलावशेष संपूर्ण महाराष्ट्रात बांद्यापासून चांद्यापर्यंत मिळतात. तसेच इ.स. ९ व्या शतकानंतर वज्रयान या पंथाचे सुध्दा बौध्द पुरावशेष मिळतात.