बौध्द जीवनमार्ग

१. शुभ कर्मे करीत राहणे, अशुभ कर्मात सहयोग न होणे, कोणतेही पापकर्म न करणे हा बौध्द जीवनमार्ग होय.

२. लोभ व तृष्णा यांच्या आहारी न जाणे हा बौध्द जीवनमार्ग होय. लोभ व तृष्णा ह्यांच्यापासून दु:ख व भय उत्पन्न होतात. जो लोभमुक्त व तृष्णामुक्त असतो, त्याला दु:ख नसते व भयही नसते.

३. कोणालाही क्लेश न देणे व दुस~यासंबंधी द्वेषभावना न बाळगणे हा बौध्द जीवनमार्ग होय. जर माणसाने निरुपद्रवी, शुध्द व निष्पाप मनुष्याला उपद्रव दिला, तर ज्याप्रमाणे वा~यावर फेकलेली धूळ फेकणा~यावरच येऊन पडते, त्याचप्रमाणे त्या माणसाला त्या उपद्रवाचा परिणाम भोगावा लागतो.

४. क्रोध न करणे, शत्रुता विसरुन जाणे आणि आपल्या शत्रूंनाही मैत्रीभावाने जिंकणे हा बौध्द जीवनमार्ग होय.

५. मनुष्याने अक्रोधाने क्रोधाला जिंकावे, दुराचाराला सदाचाराने जिंकावे, लोभ्याला उदारतेने जिंकावे आणि खोटे बोलणा~याला सत्यभाषणाने जिंकावे. वैराने वैर कधीही शांत होत नाही. अवैरानेच ते शांत होते, हा सनातन धम्म आहे.

६. कामाग्नीसारखा अग्नी नाही, द्वेषासारखे दुर्दैव नाही, उपादान स्कंधासारखे दु:ख नाही, लोभासारखा पूर नाही आणि निर्वाणापेक्षा मोठे सुख नाही.

७. मन माणसाला जसे घडविते, मनुष्य तसाच होतो. सन्मार्गाने पुढे जावयाचे मनाला शिकविणे, हे पुण्यमार्गातील पहिले पाऊल होय, अशी बौध्द जीवनमार्गाची मुख्य शिकवण आहे.

८. पापापासून दूर राहावे, पुण्य करीत राहावे, स्वत:चे विचार शुध्द ठेवावेत, अशी भगवान बुध्दांची शिकवण आहे.

९. जर स्वत:ला अहंभाव असेल तर मनुष्याने त्या अहंभावावर विजय मिळविण्याचा प्रयत्न करावा. म्हणजेच आत्मविजयी होण्यास प्रयत्नशील असावे. हा बौध्द जीवनमार्ग होय. मनुष्य हाच स्वत:चा स्वामी आहे. जेव्हा तो स्वत:ला संयमी बनवितो, तेव्हा तो दुर्लभ स्वामित्वाला प्राप्‍त करतो.

१०. मनुष्य स्वत: केलेल्या पापाबद्दल स्वत:च भुर्दंड भरतो व तो स्वत:ला स्वत:च पापापासून शुध्द करु शकतो. तेथे दुसरा कोणी येत नाही. तो निश्‍चितपणे स्वत:च स्वत:चा संरक्षक आहे. त्याचे संरक्षण दुसरा कोण करणार? जो स्वत:च स्वत:चे संरक्षण करतो, त्याला स्वत:सारखा दुसरा संरक्षक मिळणे दुर्लभ आहे.

११. न्यायी होणे आणि सत्संगती धरणे, हा बौध्द जीवनमार्ग होय. पापी व नीच पुरुषाची संगत करु नये. सदाचारी व श्रेष्ठ पुरुषांनाच आपला मित्र बनवावे. जर माणसाला बुध्दिमान, दूरदृष्टी, शहाणा, धैर्यवान, संयमी साथी लाभला नाही तर जसा एखादा राजा जिंकलेला प्रदेश मागे सोडून एकटाच पुढे जातो, त्याप्रमाणे त्याने आपला जीवनपथ जंगलातील गजराजाप्रमाणे एकट्यानेच आक्रमावा.

१२. जगात मातृत्व, मितृत्व आणि श्रमणत्व सुखकर आहेत. म्हणून मनुष्याने प्रज्ञावान, बुध्दिमान, शहाण्या, क्षमाशील, धर्मधर व श्रेष्ठ व्यक्तीच्या मार्गाने जावे. जसा अविचाराई माणसांमध्ये विवेकशील, निद्रिस्थांत जागृत, त्याचप्रमाणे शहाणा मनुष्य मूर्खांना मागे सारुन पुढे सरत असतो.

१३. प्रत्येक कार्य करताना सावधान राहणे, विवेक राखणे, अप्रमादी व उत्साही राहाणे हा बौध्द जीवनमार्ग आहे.

१४. ज्याप्रमाणे व्यवस्थित शाकारलेल्या घरात पावसाचे पाणी गळू शकत नाही त्याचप्रमाणे चिंतनयुक्त मनात विकार प्रवेश करु शकत नाही. क्षुब्ध झालेल्या गजाला अंकुशाने माहूत जसे आपल्या ताब्यात ठेवतो, तसे चित्ताला ताब्यात ठेवून त्यावर स्वामित्व गाजवावे. वाईट मार्गाकडे वळलेले मन शत्रूपेक्षाही आपले अधिक अहित करते. आईबाप व आप्‍तेष्ट जेवढे हित करु शकतील त्याहूनही अधिक हित सन्मार्गाकडे वळलेले चित्त करीत असते.

१५. अप्रमादी जेव्हा प्रमादाला जिंकतो, तेव्हा तो शोकमुक्त होतो. म्हणून प्रमाद करु नये. काम-भोगापासून दूर राहावे. अप्रमादी मनुष्यच ध्यानलाभ करतो. अप्रमाद अमर असतो. परंतु प्रमाद म्हणजे जणू मृत्यूची पायरीच! प्रमाद एक कलंक आहे, सतत प्रयत्नशील राहून व सम्यक दृष्टीने चिंतन करुन प्रमादरुपी विषारी बाणाला बाहेर काढून फेकून द्यावे. जो अप्रमादी व जागरुक आहे, स्मृतिमान आहे, सुविचारी आहे, संयमी आहे, विवेकी आहे अशा पुरुषाचे यश सारखे वाढतच असते.

१६. दारिद्र्य हे दु:खाचे मूळ होय. परंतु दारिद्र्यनाशाने सुख लाभेलच असे नाही. सुख उच्च राहाणीवर अवलंबून नसते. शुध्द आचरण हाच सुखाचा मूलमंत्र आहे, हाच बौध्द जीवनमार्ग आहे.

१७. भूक सर्वात मोठा रोग, आरोग्य सर्वात मोठा लाभ, संतोष सर्वात मोठे धन, विश्वास सर्वात श्रेष्ठ नातेवाईक आणि निर्वाण सर्वात मोठे सुख होय.

१८. धर्माचे दान सर्वात श्रेष्ठ दान व धर्माचे माधुर्य सर्वात श्रेष्ठ माधुर्य होय. क्रोधयुक्त वाणी दु:खद असते. आघात केल्यास प्रत्याघात होईल. स्वतंत्रता, उदारता,
 सदिच्छा व निस्वार्थपरायणता ही जीवनाला तितकीच आवश्यक आहेत जितकी रथाच्या चाकाला खीळ. हा बौध्द जीवनमार्ग होय.

१९. सर्वच प्रकारचे असत्य भाषण टाळावे. तथागत जसे बोलतात तसे वागतात; जसे वागतात तसे बोलतात. कारण की, ते यथाभाषी तथाकारी आणि यथाकारी तथाभाषी आहेत. हा बौध्द जीवनमार्ग होय.

२०. सम्यक मार्गाचे अनुसरण करावे. तो बहुजन सुखासाठी आहे. सन्मार्गाचे अनुसरण करणे, बौध्द जीवनमार्ग होय.

२१. आर्य अष्टांगिक मार्ग हा सर्वश्रेष्ठ मार्ग असून, तथागत हे केवळ पथप्रदर्शक आहेत. स्वत:च्या उन्नतीचा प्रयत्न ज्याचा त्याने स्वत:च करावयाचा असतो, अप्रमाद निर्वाणाचा मार्ग होय, व प्रमाद मृत्यूचा मार्ग होय. अप्रमादी अमर असतात व प्रमादी मृतवत.

२२. जे सत्याला सत्य व असत्याला असत्य म्हणून जाणतात, त्यांना सम्यक दृष्टीसंपन्न म्हणावे. त्यांनाच सत्याचा लाभ होतो. सन्मार्गगामी बनावे. सन्मार्गगामी लोक इहलोकी आणि इतर सर्व लोकी सुखी होतात.