बौध्द धम्म अजूनही व्यवहार्य आहे काय?

– डॉ. के. श्री. धम्मानंद(मलेशिया)

Photo courtesy: Unknown | Source: Facebook.com

आपण बौद्ध धम्म मुळातून व्यवस्थित समजून घेतला तर बौध्द धम्म अजूनही व्यवहार्य आहे काय? हा प्रश्नच आपल्याला पडणार नाही. बौद्ध धम्म या शब्दाचा वेगवेगळ्या प्रकारे अर्थ लावला जाऊ शकतो. जगातल्या वेगवेगळ्या प्रदेशात बौद्ध धम्म वेगवेगळ्या प्रकारे आचरला जातो. हेही खरे आहे की बौध्द धम्माच्या नावाखाली अनेक श्रध्दा आणि आचारविचार बाळगले जात आहेत. त्या प्रदेशाच्या भौगोलिक रचनेप्रमाणे आणि सामाजिक परिस्थितीप्रमाणे हे आचारविचार बदलतात. त्यामुळे काहीवेळा ते रीतिरिवाज काही बुद्धिवादी लोकांना अर्थपूर्ण वाटत नसतील. असे घडण्याचे कारणही आपण समजून घेतले पाहिजे. काही वेळा बौध्द धम्माच्या अनुयायांनी त्या त्या वेळेच्या गरजेप्रमाणे बुध्दाच्या उपदेशातील समजण्याला थोड्या कठीण असलेल्या गोष्टी सर्वसामान्य लोकांना समजाव्यात म्हणून आणि त्या आचरणात आणाव्यात म्हणून काही वर्तणुकीचे नमुने तयार करुन दिले असावेत.

तरीही सर्वसाधारणपणे याचा अर्थ असा लावता येईल की बौध्द धम्माच्या जगभरातील आचारविचारांतून एकसारखेपणा नाही. म्हणजे जो आचारविचार एका विशिष्ट प्रदेशाच्या सांस्कृतिक पर्यावरणात योग्य वाटेल तो दुसर्‍या प्रदेशाच्या सांस्कृतिक वातावरणात योग्य वाटणार नाही. अशा प्रकारच्या विशिष्ट आचारविचारांचा उगम त्या त्या प्रदेशातील समाजगटांच्या इतिहासाशी निगडीत असावा आणि म्हणूनच त्यांच्या संदर्भाप्रमाणे उचित असावेत. बौध्द धम्म हा खूप सहनशील असल्यामुळे त्याच्या आचरणाविषयी एकाच परंपरेचा हट्ट धरत नाही. इतकेच नव्हे तर त्या त्या समाजाच्या दृष्टीने उचित व्यवहाराला प्रोत्साहन देतो. परंतु स्वत: बुध्दाने कधीही अनुचित प्रकाराच्या आचारविचारांना प्रोत्साहन दिले नाही. त्याचप्रमाणे बौध्द धम्माचा अर्थ असा धम्म जो सदाचारी मार्गाने किंवा प्रतिष्टित मार्गाने जीवन जगायला शिकवतो असा घेतला तर तो कधीही आणि जगातील कोणत्याही प्रदेशात आचरण्यासाठी व्यवहार्य आहे. म्हणून आम्ही बौध्दधम्मीय वरवरच्या शारीरिक उपचारांना फारसे महत्व देत नाही. तर आम्ही व्यक्‍ती आणि समष्टी म्हणून देखील अशी समृध्द आत्मिक प्रवृत्ती धारण करतो की जिच्यामुळे आमच्या वर्तणुकीवर सदाचाराचे नियंत्रण ठेवू शकतो.

गैरसमजुती:

बुध्दाने ’धम्माच्या माध्यमा’तून जे जीवनविषयक सत्य सांगितले ते चिरकालीन सत्य आहे. म्हणूनच बुध्दाने त्यांच्या अनेक प्रवचनांतून जी उदात्त शिकवण दिली तिच्यात काहीही बदल करण्याची किंवा काळानुसार सुधारणा करण्याची गरज नाही. ही गोष्ट अनेक लोकांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे वेगवेगळ्य़ा लोकांनी बुध्दाचे विचार आपापल्या पध्दतीने मांडण्याचा प्रयत्‍न केला आहे. त्यातून विविध प्रकारची भाष्ये निर्माण झाली. अशा चुकीच्या समजातून निर्माण झालेल्या टीकाटिपण्णीवर विसंबून बौध्द धम्म व्यवहार्य नाही असे समजणे योग्य नाही. या चुकीच्या समजुतीबद्दलचे अज्ञान आणि वैचारिक गोंधळ यातून निर्माण झाल्या आहेत. आज आपण आपल्या तथाकथित आधुनिक जीवनात अशी गुंतागुंतीची जीवनशैली स्वीकारली आहे की ज्यामुळे धम्माची उदात्त तत्त्वे अंमलात आणणे आपल्याला कठीण वाटते. बुध्दाने सांगितलेली शिकवण न समजल्यामुळे आणि ती तत्त्वे आधुनिक जीवनशैलीतही कशी योग्य रीतीने वापरता येतील ते नीट समजून न घेतल्यामुळे आपल्याला बौध्द धम्म आजच्या जीवनाच्या संदर्भात आचरणीय नाही असे वाटते. बुध्दाला या समस्येची कल्पना होती. म्हणूनच त्यांनी वारंवार सांगितले आहे की कोणीही माझ्या विचारांची अंमलबजावणी केवळ अंधश्रध्देतून किंवा अंधविश्वासाने करु नये. उलट ते नेहमी असे सांगत आले की माझ्या विचारांबद्दल तुम्हाला काही शंका असतील तर अवश्य विचारा आणि तुमच्या शंकांचे निरसन झाल्याशिवाय माझे विचार स्वीकारु नका. त्यांना याचा पूर्ण विश्वास होता की माणसाला एकदा का खर्‍या सत्याची जाणीव झाली की त्याच्या मनात कोणतीही शंका शिल्लक राहत नाही. मग त्या माणसाच्या वृत्तीत स्वत:चे व्यवहारज्ञान आणि शहाणपण वापरण्याचा आत्मविश्वास निर्माण होतो. अशा विवेकपूर्ण माणसांना मग बुध्दाने सांगितलेल्या विचारांतील मर्म जाणून घेण्याची क्षमता प्राप्‍त होते. कारण बुध्दाने अतिशय बुध्दिवादी पध्दतीने परीक्षण करुन आणि शंका-कुशंकांचे समाधानकारक उत्तर शोधत आपले विचार निश्चित केले आहेत. म्हणूनच आपण केवळ टीका न करता बौध्द धम्म शांत चित्ताने नीट समजून घेतला पाहिजे.

मानवी दुर्बलतेवरील इलाज:

जर कोणी असे म्हणत असेल की बुध्दाची शिकवण व्यवहार्य नाही तर त्याचा अर्थ बुध्दाच्या शिकवणुकीत काही चुकीचे आहे असा घेता येणार नाही. किंबहुना असे म्हणणार्‍या व्यक्‍तीच्या मानसिकतेत किंवा जीवनशैलीत काहीतरी चूक आहे असाच त्याचा खरा अर्थ असतो. असे दिसून येईल की भौतिक सुखाच्या मागे लागून त्या व्यक्‍तीने नैतिकता आणि स्वयंशिस्त या तत्वावर आधारलेल्या धार्मिक जीवनशैलीकडे दुर्लक्ष केले असेल. म्हणूनच त्या व्यक्‍तीला बुध्दाचा उपदेश तिच्या स्वार्थी आणि लोभी वृत्तीमुळे व्यवहार्य नाही असे वाटते. एखाद्या व्यक्‍तीच्या असंस्कृत सवयीपेक्षा धार्मिक तत्त्वे ही खूप वेगळी असतात. धार्मिक तत्त्वे माणसाच्या बेशिस्त वर्तणुकीला मान्यता देत नाहीत म्हणून ती तत्त्वे व्यवहार्यच नाहीत असे मानणे चुकीचे आहे. मनाच्या चंचलतेवर नियंत्रण ठेवावे किंवा उदात्त जीवन जगण्यासाठी जाणीव समृद्ध करावी असे सांगितले तर ते अव्यवहार्य आहे असे मानणे योग्य नाही. जर आपण खूप आजारी असू आणि डॉक्टरांनी खूप कडू असलेले औषध घ्यायला सांगितले तर ते औषध योग्य नाही असे आपण म्हणू शकत नाही. कारण आपल्या आजाराच्या स्वरुपाप्रमाणे डॉक्टरांनी औषध दिलेले असते. त्याचप्रमाणे बुध्दाने अनुभवले होते की या जगात वेगवेगेळ्या मानसिकतेची, वेगवेगळ्य़ चारित्र्याची, वेगवेगळ्या विचार पध्दतीची माणसे आहेत आणि त्यांच्यात अनेक प्रकारचे दोषही आहेत. म्हणूनच बुध्दाने सांगितले की उपदेश हा सर्व मानवी दोषांवर इलाज किंवा औषध आहे असेच आपण मानले पाहिजे. आपण प्रत्यक्षात ती तत्त्वे आचरणात आणायला सुरुवात करतो तेव्हा त्यांच्या उपयुक्‍ततेची आपल्याला कल्पना येत नाही. असं का होत? कारण तुम्ही ती आचरणात आणायला सुरुवात करता तेव्हा तुम्हाला तुमच्यावर काही अनुशासनाची बंधने घालून घ्यावी लागतात. तेव्हा तुम्हाला वाटते की यात काही मजा नाही. बहुतेक लोकांना असे वाटते की त्यांना जे काही करावयाचे आहे त्यांत त्यांना मजा वाटली पाहिजे. मग ते वर्तन धर्माच्या संबधात असो अथवा अन्य विषयाच्या संबंधात असो. धार्मिक आचरणात त्यांना अपेक्षित असलेले शारीरिक सुख मिळू शकत नाही म्हणून ते धर्मापासून दूर राहणे पसंत करतात आणि स्वत:ला विचारस्वातंत्र्याचे समर्थक म्हणवून घेतात. ही अत्यंत लंगडी सबब आहे. स्वत:तील कमतरता मान्य करण्याचे सोडून ते धर्माचरण अव्यवहार्य आहे, कालबाह्य झाले आहे किंवा आधुनिक समाजजीवनात उपयुक्‍त नाही असे म्हणून धर्मावरच दोषारोप करतात.

माझे मत असे आहे की खरे विचारस्वातंत्र्य असलेले लोक फक्‍त वेड्यांच्या इस्पितळातच असू शकतात. कारण ते लोक त्यांना वाटेल तसे व वाटेल तेव्हा वागू शकतात. ते वेडे लोक त्यांच्या मर्जीप्रमाणे वागतात आणि त्यांना समाजाच्या भल्याबुर्‍याशी काही देणेघेणे नसते. या कारणामुळे त्या स्वत:त विचाराच्या लोकांना बंदिस्त जागेत ठेवलेले असते. याचा अर्थ असा की जे लोक स्वत:ला विचारस्वातंत्र्याचे समर्थक म्हणवतात ते प्रत्यक्षात वास्तवापासून दूर पळत असतात. जेव्हा जे योग्य वाटेल त्याप्रमाणे वागणे पसंत करुन ते कोणत्याही मुद्द्यावर निश्चित स्वरुपाची भूमिका स्वीकारत नाहीत. अशा लोकांनी हे जाणून घेतले पाहिजे की बौध्द ही एक अशा प्रकारची जीवनशैली आहे की जी निष्ठा, विवेकवाद अशा अनेक शिस्तबध्द अनुशासनावर आधारलेली आहे. अशा सर्व सदाचाराच्या घटकांना एकत्र आणून त्या जीवनशैलीला जे नाव दिले जाते त्यालाच बौध्द धम्म म्हणतात. म्हणूनच बौध्द धम्म जगातील एक श्रेष्ठ धम्म आहे.

या आणि प्रत्यक्ष पाहा:

’धम्म’ या शब्दाचे न्याय, सदाचरण, लोकोत्तर घटना, उदात्त जीवन, मुक्‍ती वगैरे अनेक अर्थ संभवतात. त्यामुळे आपण या शब्दाचे स्पष्टीकरण वेगवेगळ्या प्रकारे देऊ शकतो. बुध्दाने आपल्याला ’धम्म’ सांगितला, परंतु आपण तो आंधळेपणाने स्वीकारु नये असेही ते सांगत. इतर काही धर्मांच्या अनुयायांना जर विचारलं की तुमच्या धर्मातील अमुक एका कर्मकांडाचे कारण काय आहे? तर ते सांगतात की ते तसे आमच्या धार्मिक पोथीत सांगितले आहे म्हणून आम्ही तसे वागतो. ते असेही सांगतात की, ते त्यांच्या धर्मगुरंची तशीच शिकवण आहे व त्यांच्या आईवडिलांनी त्यांना नि:शंकपणे तसे वागायला सांगितले आहे. तसेच त्यांच्या धर्माची परंपरा असेच सांगते.

बुध्दाने त्यांच्या उपदेशाबद्दल असे म्हटले आहे की “Ehi Passiko’ म्हणजे या आणि प्रत्यक्ष प्रत्यय घ्या. त्यांनी कधीही कोणाला या आणि माझ्यावर विश्वास ठेवा असे सांगितले नाही. तसेच त्यांनी कोणालाही या आणि माझ्या उपदेशाचा स्वीकार करा असा आदेशही दिला नाही. त्यांच्या उपदेशाची सुरुवातच त्यांनी स्वत: प्रत्यक्ष घ्या, खात्री करा आणि मगच स्वीकारा अशी केली. ते सांगत या, स्वत: प्रत्यय घ्या, चौकशी करा, तुम्ही तुमचे व्यावहारिक शहाणपण वापरा तसेच तुम्ही तुमची बुध्दी वापरा आणि माझा उपदेश तपासून पाहा, तावूनसुलाखून घ्या व मगच स्वीकारा. एखाद्या गोष्टीची योग्यायोग्यता तपासून पाहण्याइतकी विचार करण्याची पात्रता तुमच्यापाशी नाही असे मुळीच समजू नका. धर्मोपदेशक हे श्रेष्ठ व्यक्‍ती आहेत म्हणून त्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट साहजिकच योग्य असली पाहिजे असे मानू नका. अगदी प्रत्यक्ष धार्मिक पोथीत लिहीले असले तरी कोणतेही धार्मिक तत्त्व बरोबरच आहे असे समजणे योग्य नाही. कारण त्या तत्वामागील धार्मिक संदर्भ आणि धार्मिक मूल्य समजून घेतल्याशिवाय ते तत्त्व स्वीकारुन काहीच लाभ होणार नाही. तुम्ही तुमचे व्यवहारज्ञान वापरलेच पाहिजे. सामान्य माणसांची विवेकबुध्दी आणि तिचा व्यवहारात योग्य वापर करण्याची त्यांची पात्रता याची बुध्दाने योग्य ती भलावण केली आहे. म्हणूनच स्वतंत्रपणे विचार करुन व केवळ धार्मिक पोथीपुराणे अथवा उपदेश यावर अवलंबून न राहता निर्णय घेण्याच्या सामान्य माणसांच्या क्षमतेवर बुध्द विश्वास ठेवतो.

त्यात काही बदल करण्याची गरज आहे का?

जेव्हा आपण स्वतंत्र विचार करुन आणि तर्कशुध्द पध्दतीने एखादी गोष्ट आपल्यासाठी योग्य आहे की अयोग्य आहे, तिच्यात तथ्य आहे की नाही, ती व्यवहार्य आहे की नाही असा सारासार विचार करुन तपासून घेतो व ती सर्वार्थाने योग्य आहे असे आपल्याला पटते तेव्हाच ती आपण स्वीकारावी. नाहीतर जुन्यावरील श्रध्दा ही केवळ अंधश्रध्दा ठरेल. कारण ती तुम्ही त्यातील योग्यता न समजावून घेता स्वीकारलेली असेल. आत्मप्रत्यय- एखाद्या गोष्टीची स्वत: खात्री करुन घेऊन मगच ती स्वीकारणे. हा बौध्द धर्माचा स्वभाव आहे. म्हणूनच बौध्द धम्म कोणत्याही काळात व्यवहार्य राहिला आहे. तुम्ही तुमच्या भौतिक गरजांनुसार बौध्द धम्माची नैतिक मूल्ये बदलू शकत नाही. जरी बुध्दाने ही नैतिक जीवन मूल्ये २५०० वर्षापूर्वी उपदेशिली असली तरी आजदेखील कोणी ती आजच्या मानवी जीवनाच्या संदर्भात अव्यवहार्य आहेत किंवा वस्तुस्थितीला धरुन नाहीत असे दाखवून देऊ शकेल काय? त्यांनी आपल्याला जगण्याची काही विधायक मूल्ये व नियम पाळून जीवनात नैतिकता आणण्याचा उपदेश केला. आपल्या वर्तणुकीमध्ये नैतिकतेचा अंगिकार करुनच आपण बौध्द धम्म आचरणात आणू शकतो. ’नैतिकता’ या शब्दाचा अर्थ आपण स्वैरपणे घेता कामा नये. कारण मानवी विकासाच्या दरम्यान माणसांनी ’नीती’ आणि ’सदाचार’ म्हणून अनेक कायदे व रीतिरिवाज निर्माण केले आहेत परंतु काळ आणि समाज यानुसार माणसांनी निर्माण केलेले नीतीचे आणि सदाचाराचे कायदे बदलून राहतात. उदा. काही विशिष्ट प्रदेशात आणि समाजात काही विशिष्ट रीतिरिवाज आणि नैतिकतेचे नियम अनुकरणीय असत नाही. वेगवेगळ्या प्रदेशातील लोकांनी वेगवेगळी नैतिक मूल्ये स्वीकारलेली असतात. परंतु जर आपण बुध्दाने प्रतिपादन केलेली नैतिक मूल्ये तर्कशुध्द पध्दतीने तपासून पाहिली तर ती सदासर्वकाळ संयुक्‍तिक का आहेत हे लक्षात येईल. ते नैसर्गिक नीतिनियम आहेत. म्हणूनच ते जगन्मान्य आहेत. कारण ते बुध्दाने मानवी वर्तणुकीचा व जीवनाचा सखोल अभ्यास करुन ते नीट जाणून घेऊन बनवलेले आहेत. जर आपण प्रामाणिकपणातून इमानेइतबारे, दयाशील राहून व दुसर्‍यांना कोणतेही अपाय पोचणार नाहीत याची दक्षता बाळगून जगण्याची शैली आत्मसात केली, जर आपण चिकाटी, सहनशीलता, औदार्य, अनुकंपा, समजूतदारपणा असे सद्‍गुण आपल्या वर्तणुकीत अंगीकारले तर आपले जगणे बुध्दाने सांगितलेल्या नैतिकतेशी अनुरुप आहे असे समजावे. आता आपणच विचार करुन ठरवावे की बुध्दाने सांगितलेल्या या जीवनशैलीत काही बदल करण्याची आजदेखील गरज आहे काय? म्हणूनच बुध्द आत्मविश्वासाने सांगतात की मी जो धम्म सांगितला आहे तो या जगात सदासर्वकाळ अनुकरणीय असाच राहील. हा धम्म काही नवीन नाही. ही शिकवण काही नवीन नाही. कारण अभिजात धम्म हा आज, उद्या आणी अनंत काळपर्यंत व्यवहार्य आणि उपयुक्‍त असाच असतो. जो मानव धम्म इतर प्रज्ञावंत महामानवांनी पूर्वी सांगितला तोच धम्म बुध्दाने सर्वार्थाने समजून घेऊन पुन्हा सोप्या शब्दांत आपल्याला सांगितला आहे. ’धम्म’ म्हणजे तरी काय? धम्म म्हणजे वैश्विक पातळीवरचे सर्वत्र लागू असलेले निसर्गनियम. हे सार्वत्रिक नियम नेहमीच अस्तित्वात असतात. परंतु आपण आपल्या अज्ञानीपणामुळे ते जाणून घेऊ शकत नाही व ते आचरणात आणत नाही. सत्य असं आहे की हे धार्मिक नियम आपण आपल्या अज्ञानामुळे नाकारले तरी ते वास्तवात अस्तित्वात असतातच. खरं तर या विश्वात अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या मानवी जीवनाला लाभदायक आहेत. परंतु आजपर्यंत त्याचा शोध लागलेला नाही. तुलनाच करायची झाली तर वैज्ञानिकांनी फारच थोड्या वास्तवाचा शोध लावला आहे. या माहाकाय विश्वाचा फारच लहान भाग त्यांना समजला आहे. परंतु बुध्दाच्या प्रज्ञेला निसर्गाच्या गुढतेचा, निसर्गाच्या स्वभावाचा, वैश्विक मनाच्या स्वरुपाचा, ऊर्जेच्या अस्तित्वाचा शोध लागला होता व त्याचा त्यांना प्रत्ययही आला होता.

या वैश्विक सत्याचा मानवी जीवनात पुन:पुन्हा प्रत्यय कसा येतो ते बुध्द आपल्याला समजावून सांगतात. बुध्दाच्या उपदेशाची नैसर्गिक घडणही अशी आहे. म्हणूनच त्यांनी आपल्याला चार मूलभूत सत्यांचे स्वरुप विशद करुन सांगितले.

चार प्रकारचे मूलभूत सत्य:

१) दु:ख किंवा असमाधान, २) दु:ख निर्माण होण्याचे मुळ कारण, ३) दु:ख निवारण करण्याचा उपाय, ४) असा मार्ग ज्यामुळे दु:ख कायमचे दूर होईल.

तसं म्हटलं तर अनेक सत्य असू शकतात. ती समजून घेतल्याने दु:ख निवारण होत नाही. परंतु बुध्दाने सांगितलेले सत्याचे चार प्रकार जाणून घेतले तर आपण ज्ञानी बनतो. वरील चार प्रकारची सत्ये आपण नीट जाणून घेतली तर आपल्याला मानसिक आणि शारीरिक दु:खापासून स्वत:ची सुटका करुन घेता येते. बौध्द धम्माचे हेच तर ध्येय आहे. या जगात जगत असताना पदोपदी प्रत्येक गोष्टीत आपल्याला असमाधानाचा अथवा दु:खाचा अनुभव येत असतो. वियोग, मानसिक आणि शारीरिक वेदना, संघर्ष, नैराश्य, विवाद अशा अनेक प्रकारे त्या अनुभवांचे वर्णन केले जाते. वर उल्लेख केलेल्या पहिल्या सत्याचे हे असे स्वरुप असते. या जगात अशी एखादी व्यक्‍ती असेल काय की जिला या सत्याचा अनुभव आलेला नाही?

दुसरं सत्य म्हणजे दु:ख निर्माण होण्याचे मूळ कारण. दु:खाचे किंवा अतृप्‍तीचे कारण काय बरे असू शकेल? अनेक धर्मांच्या शिकवणूकीत हे कारण शोधण्याचा प्रयत्न झालेला आढळत नाही. बहुतेक धर्म दु:खाचे कारण बाह्यजगात आहे असे सांगतात. परंतु बुध्दाला त्यांच्या प्रज्ञेच्या द्वारे हे कळून चुकले की दु:खाचे कारण अन्य काही नसून ते माणसाच्या मनातच आहे. भौतिक गोष्टींबद्दल आपल्या मनात निर्माण होणारी लालसा, त्यांच्यात होणारी आपल्या मनाची गुंतवणूक, भौतिक सुखांबद्दल आपल्या मनात होणारी उत्कट इच्छा अथवा हाव, तसेच स्वत:चे अस्तित्व व त्यावर असलेले आपले अतीव प्रेम हेच दु:ख निर्माण होण्याचे मुख्य व मुलभूत कारण आहे. या व्यतिरिक्‍त मानवी दु:खाचे दुसरे कोणतेही कारण असू शकत नाही. आपण जीवन जगण्याच्या प्रक्रियेमध्ये किंवा इंद्रियसुखाच्या लालसेची तृप्‍ती करण्यासाठी अनेक चुकीच्या गोष्टी करत असतो. हे सत्यदेखील कोणीही नाकारु शकत नाही. मग आपण बाह्य जगाला दोष कसा देऊ शकतो? आणि मग केवळ एक बौध्द धम्मच जर मानवी दु:खाचं मूळ कारण स्पष्ट करुन सांगत असेल आणि त्याचबरोबर दु:खामुळे होणार्‍या मानवी दुर्दशेवर उपाय सुचवत असेल तर तो बौध्द धम्म अव्यवहार्य आहे असे आपण कसे म्हणू शकतो?

धर्म म्हणजे काय?

मनुष्यमात्राला त्यांच्या अस्तित्वाविषयी सत्य समजून घेऊन, ज्ञान प्राप्‍त करुन तसेच शहाणपण आणि विवेकबुध्दी जागृत करुन, उदात्त प्रकारचे जीवन जगण्याची संधी मिळवून जीवनातील सर्व अस्वस्थता आणि दु:ख मुळातून नाहीसे करण्याची जर कोणती व्यवहार्य पध्दती उपलब्ध असेल तर त्या पध्दतीला धर्म असे नाव द्यावे. बुध्दाने ’धम्म’ या शब्दाची हीच व्याख्या केली आहे. म्हणून धम्माचे वर्णन आपण मानवाचे दु:ख दूर करणारी पध्दती किंवा मार्ग असे करु शकतो. ह्या मार्गाला आपण आठपदरी मार्ग आसेही म्हणू शकतो. आपल्याला नेहमी अनेक गोष्टी करावयाच्या असतात. आपण काही केवळ मंदिरात जाऊन प्रार्थना करत नाही. आपल्याला नेहमीच वाईट कृत्यापासून परावृत्त करुन चांगले कृत्य करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. अशा पध्दतीने आपल्याला अधिक उन्नत स्वरुपाचे जीवन जगण्यासाठी सक्षम केले जाते. म्हणून या पध्दतीला ’उदात्त’ मार्ग असे म्हटले जाते. सर्वांत प्रथम आपण योग्य पध्दतीने विचार करायला शिकले पाहिजे.

योग्य समज:

वर उल्लेख केलेल्या चार मूलभूत सत्यांचा (तत्त्वांचा) अर्थ नीट समजून घेतला पाहिजे. धम्मासाठी असो अथवा अन्य कोणत्याही हेतूसाठी असो, सर्वप्रथम आपल्याला योग्य तर्‍हेने विचार करण्याची पध्दत विकसित केली पाहिजे. कारण एखाद्या गोष्टीविषयीची आपली समजूत बरोबर नसेल तर अंतिम उद्दिष्ट साध्य होऊ शकत नाही. बुध्दाने समाजाला दु:ख कसे दूर करावे हे सांगण्यासाठी प्रयाण करण्यासाठी त्यांनी योग्य विचार करण्याची पध्दत समजावून सांगितली. आपल्याला विचार करण्यासाठी निसर्गाने मन दिलेले आहे. पण आपण ती ऊर्जा निरर्थक विचार करण्यात फुकट दवडतो. आपण ती ऊर्जा दुसर्‍यांना मदत करण्यासाठी, स्वत:चा विकास करण्यासाठी, अधिक ज्ञान प्राप्‍त करण्यासाठी, अधिक शहाणपण शिकण्यासाठी तसेच आपल्यापुढे वर्तमानकाळात उभे असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी वापरु शकतो. आपण बहुतेक वेळा आपल्या कार्यात असफल होतो कारण आपण आपली खूपशी मूल्यवान ऊर्जा अनावश्यक गोष्टींत खर्च करतो.

योग्य विचार:

विघातक विचार दूर सारुन चांगले उपयुक्‍त विचार करण्यासाठी बौध्दिक शक्‍ती वापरणे म्हणजे योग्य विचार करणे. आपण आपल्या मनाचे व्यापार नीट समजून घेतले पाहिजेत. प्रत्येकजण दुसर्‍याच्या मनाचा व्यापार समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो, पण असे थोडेच लोक असतात की जे स्वत:च्या मनाची कार्यपध्दती समजून घेण्याचा प्रयत्न करतात. या वाईट प्रवृत्ती स्वत:साठी खूप अडचणी निर्माण करतात, त्यातून आपल्या हातून चुका घडतात तसेच दुसर्‍यांना पण त्रासदायक ठरतात. म्हणून या वाईट प्रवृत्तींवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यांना दाबून टाकण्याचा प्रयत्न करा. परंतु सर्वात उत्तम म्हणजे त्यांना दूर सारून त्या ठिकाणी अधिक चांगल्या प्रवृत्ती निर्माण करा. तरच तुम्ही या दुष्ट प्रवृत्तींचा नाश करु शकाल. योग्य विचार करण्याचा हाच मार्ग आहे. जीवनात यशस्वी होण्यासाठी स्वत:ची विचारशक्‍ती वापरण्याचा हाच मार्ग आहे. एकदा का आपण आपल्या मनावर नियंत्रण मिळवून मन एकाग्र करायला शिकलो की मग आपण सर्व अडचणींना हसत सामोरे जाऊ शकतो कारण आपल्याकडे संकटावर मात करण्यासाठी खूप ऊर्जा शिल्लक राहते. अशा अवस्थेत कोणीही आपल्याला पाहू शकत नाही. कोणीही आपल्याला क्षुब्ध करु शकत नाही. कोणी आपल्याला त्रास देऊ शकत नाही. कारण आपल्याकडे खूप ऊर्जा शिल्लक असते आणि म्हणून आपल्याला कशाचीच भीती वाटत नाही. मग आपल्यात कोणत्याही प्रश्नाला तोंड देण्याचा आत्मविश्वास निर्माण होतो. म्हणूनच आपण तिरस्कार दूर सारून करुणा निर्माण करण्यासाठी योग्य विचार करण्याची सवय लावून घ्यावी व मनसोक्‍त ऊर्जा जतन करुन ठेवावी. आपण मनात नेहमी चांगले विचार आणावेत ज्यायोगे आपण भौतिक गोष्टींपासून अलिप्‍तता प्राप्‍त करुन घेऊ शकू. त्यामुळे प्रत्येक प्रश्नाकडे वस्तुनिष्ट दृष्टीने बघू शकू व भावनेच्या आहारी गेल्यामुळे फुकट जाणारी आपली ऊर्जा वाचू शकेल.

योग्य संभाषण:

बोलताना काही वेळा आपण असे शब्द वापरतो की ज्यामुळे दुसर्‍यांना दु:ख होते. आपण विचार न करता जे बोलतो त्यामुळे अडचणी निर्माण होतात. बरेच वेळा आपण आपले विचार व्यक्‍त करण्यासाठी योग्य शब्द न निवडताच बोलत असतो. आपण आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवायला शिकले पाहिजे. बेजबाबदार बोलणे टाळायचे असेल तर आपण आपली जाणीव आणि ज्ञान वाढवले पाहिजे. काहीही बोलण्यापूर्वी आपण नीट विचार केला पाहिजे. आपण तपासून पाहिले पाहिजे की जे शब्द मी वापरु इच्छितो ते वाईट, कटू किंवा निरर्थक नाहीत ना? चुकीचे बोलल्यामुळे समाजात आपल्याविषयी वाईट मत तयार होते.

योग्य कृती:

आपण कोणतीही कृती करताना स्वार्थी असू नये किंवा केवळ स्वत:चाच विचार करु नये. इतरांच्या भल्याचा विचार करणे हेदेखील एखाद्या कृत्यामुळे चूक घडणार असेल, कोणाला दु:ख होणार असेल किंवा कोणाचे नुकसान होणार असेल ते कृत्य आपण टाळले पाहिजे. आपली प्रत्येक कृती ही स्वत:ला आणि इतरांना लाभदायी असली पाहिजे किंवा ती स्वत:साठी नसली तरी इतरांसाठी लाभदायी असली पाहिजे. बुध्द सांगतो की, ’शहाणपणाने वागा’ आपण इतरांना मदत तर केलीच पाहिजे, पण त्याचबरोबर स्वत:चेही कल्याण करण्याचे भान ठेवले पाहिजे. अविचाराने व्यवहार करु नका. व्यवहारात शहाणपण वापरा. आपल्या वागण्याने सर्व सबंधित घटकांना लाभ होईल असे वागा. तुमच्या वर्तणुकीत वर उल्लेख केलेल्या पाच मूलभूत तत्त्वांकडे किंवा मूल्यांकडे दुर्लक्ष होणार नाही याची दक्षता बाळगा.

योग्य उपजीविका:

आपल्याला उदरनिर्वाहासाठी पैसा कमवावा लागतो. आपण नोकरी करतो किंवा व्यवसाय करतो. आपण जे काम करतो ते आपल्या सद्‍सद्‍ विवेक बुध्दीला स्मरुन योग्य असले पाहिजे. काही लोक लांडीलबाडी करुन, दुसर्‍यांची फसवणूक करुन किंवा दुसर्‍याचे नुकसान करुन धंदा करतात. अशा प्रकारे पैसा मिळवून काही लोक श्रीमंत होत असतील पण असले जगणे सन्माननीय आहे काय? नक्कीच नाही. आपण जे काही करतो ते रास्त, सभ्यतेला धरुन आणि न्याय्य असले पाहिजे. आपण उदरनिर्वाहासाठी जी काही पध्दत वापरु तिच्यामुळे कोणत्याही प्राण्याची हत्या होता कामा नये, विस्थापन होता कामा नये तसेच मादक द्रव्यांची विक्री, विषारी पदार्थांची विक्री किंवा प्राणघातक शस्त्रांची विक्री होता कामा नये.

योग्य प्रयत्‍न:

आपण आपली शारिरीक आणि मानसिक ऊर्जा शहाणपणाने वापरली पाहिजे. आपल्या क्षमता आपण इतरांच्या सांस्कृतिक, आत्मिक आणि धार्मिक विकासासाठी वापरल्या पाहिजे. आपण आपल्या मनाला चांगलेपणाने, प्रामाणिकपणाने, दयाशील वृत्तीने आणि न्यायाने वागण्याचे शिक्षण दिले पाहिजे. आपली ऊर्जा चांगले विचार विकसित करण्यासाठी व सर्व दुष्ट गोष्टींपासून दूर राहण्यासाठी वापरली पाहिजे.

योग्य जाणीव:

कोणतेही कार्य करताना आपले मन नेहमी सतर्क असले पाहिजे. काहीही बोलताना आपण सावध असले पाहिजे. आपण मन कधीही विचलीत होऊ देता कामा नये. कोणतेही काम करताना आपण ते मन लावून आणि नीट समजून घेऊन केले पाहिजे. असे वागल्यानेच आपण आपले काम अधिक कार्यक्षमतेने करु शकू. आपण आपल्या दैंनंदिन जीवनातील सर्व व्यवहारांची ही मनाची तन्मयता ठेवली पाहिजे.

शेवटची पायरी:

एकाग्रता किंवा मानसिक सुसंस्कार आपण आपल्या मनाला सुयोग्य प्रशिक्षण दिलेले नसते. म्हणूनच आपल्याकडून चुका घडतात आणि आपण काळजीत पडतो. आपण आपल्या मानसिक शक्‍तीने संवर्धन करुन प्रशिक्षित केले पाहिजे. मन खूप सशक्‍त परंतु त्याचबरोबर ताब्यात ठेवायला खूप कठीण आहे. खूप अनावर आहे. आपण संवर्धित केलेली मनाचीच ऊर्जा वापरुन त्याला नियंत्रीत करु शकतो. एकदा का आपण मनावर नियंत्रण प्रस्थापित केले की मग आपण एक विश्वासू समजूतदार, दयाळू, न्यायी आणि सदाचारी माणूस बनु शकतो. परंतु ही प्रक्रिया खूप कठीण आहे. जगात खूफ कमी लोकांना स्व:ताच्या मनाला योग्य रीतीने प्रशिक्षित करणे जमले आहे. म्हणूनच जगात अविश्वासू, दुष्ट, कपटी आणी स्वार्थी लोकच अधिक दिसतात. जर माणसांची मने सुसंस्कृत बनली तर या जगात प्रत्येक माणसाला शांतीने जगता येईल. जगातील प्रश्न हे माणसांची मने सुसंस्कृत नसल्यामुळे व अधिकाधिक स्वार्थाची लालसा धरल्यामुळे निर्माण झाले आहेत. जेव्हा माणसांची मने सुसंस्कृत करुन त्यांच्यातील या दुष्ट प्रवृत्ती दूर केल्या जातील तेव्हाच या जगात शांतता आणि सुख नांदू शकेल.

आता ठरवा बौध्द धम्म व्यवहार्य आहे की नाही?

हाच तो आठ कलमी, विधायक मार्ग जो बुध्दाने मानवाला चांगले धार्मिक जीवन जगता यावे म्हणून विशद करुन सांगितला आहे. ही एक अशी जीवनपध्दती आहे की जी केवळ श्रध्देवर अवलंबून नाही तर अतिशय व्यवहार्य आहे. आपण जर वर सांगितल्याप्रमाणे पायरीपायरीने जगण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला अतिशय आश्चर्यकारक आणि आनंददायी अनुभव येईल. मग आपणच ठरवू शकतो की ही जीवनपध्दती चांगली आहे की वाईट आहे? म्हणूनच बुध्द म्हणतो की बौध्द धम्म हा कालातीत आहे. ही जीवनपध्दती आपण केव्हाही, कुठेही आणि कोणत्याही समाजात आचरणात आणू शकतो. बुध्दाने किती सोप्या पध्दतीने हा धम्म समजावून सांगितला आहे ते समजून घ्या. कोणीतरी शहाणा माणूस हा मार्ग व्यवहार्य आहे असे म्हणू शकेल काय? आपण या धम्माचे आचरण करण्याचे ठरवले की समजून येईल की असे वागणे इतके सोपे नाही. त्यासाठी खूप इच्छाशक्‍तीची गरज आहे. कठोर मनोनिग्रहाची आवश्यकता आहे. परंतु लक्षात घ्या की हा मार्ग विधायक आणि कल्याणकारी आहे. म्हणूनच व्यवहार्य आहे. त्याचबरोबर आपण हे देखील समजून घेतले पाहिजे की आज आपण ज्या वर्तमानकाळात जगत आहोत ते जग खूप नीतिभ्रष्ट झालेले आहे आणि म्हणूनच विधायक मार्गावर चालताना खूप अडचणींचा सामना करावा लागेल. आपण ज्यावेळी सद्‍गुणांचा संचय करुन विधायक जगण्याचा प्रयत्न करतो तेव्हा अनेक दुष्ट, लबाड आणि स्वार्थी लोक आपली मानहानी करुन आपल्याला मूर्ख ठरवण्याचा प्रयत्न करतात. लक्षात ठेवा की कपटी माणसे हुशार असतात. वर्तमान तथाकथित आधुनिक समाजाचे सुस्वरुप असे आहे की आपल्याला विधायक धार्मिक जीवन जगण्याचे खूप अडथळे येतील. बुध्दाने अतिशय स्पष्टपणे व सोप्या शब्दात विश्वाचे स्वरुप समजावून सांगितले आहे. आपल्या अस्तित्वाचा खरा अर्थ समजेल अशा गोष्टी त्यांनी आपल्यापुढे स्पष्टपणे मांडल्या आहेत. केवळ त्यांनीच आपल्याला जगातील अनिश्चितता, दु:ख आणि दुर्दशा यांच्यावर मात करुन शाश्वत सुख आणि शांती प्राप्‍त करुन विधायक जगण्याचा मार्ग दाखवला आहे.