३. भगवान बुध्दाचे पहिले प्रवचन-विशुध्दी मार्ग

PC
Buddhism
Published in
2 min readJul 26, 2016

१. परिव्राजकांनी नंतर भगवान बुध्दाला आपला धम्म समजावून सांगण्याची प्रार्थना केली.

२. भगवान बुध्दाने त्यांची विनंती आनंदाने मान्य केली.

३. त्याने पहिल्या प्रथम त्यांना विशुध्दी मार्ग समजवून सांगितला.

४. त्याने परिव्राजकांना सांगितले की, ज्याला चांगला मनुष्य होण्याची इच्छा आहे त्याने जीवनाची तत्वे म्हणून काही तत्वे पाळली पाहिजेत, ही विशुध्दी मार्गाची शिकवण आहे.

५. “माझ्या विशुध्दीच्या मार्गानुसार चांगल्या जीवनाची पाच तत्वे आहेत: (१) कोणत्याही प्राण्यांची हिंसा न करणे व त्याला इजा न करणे., (२) चोरी न करणे अर्थात दुस~याच्या मालकीची वस्तू न बळकावणे, (३) व्यभिचार न करने (४)असत्य न बोलणे, (५) मादक पेय ग्रहण न करणे. “

६. “माझे असे म्हणणे आहे की, प्रत्येक माणसाने ही तत्वे मान्य करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण, प्रत्येक मनुष्य जे जे काही करतो त्याचे मूल्यमापन करण्यासाठी त्याच्यापाशी काही एक परिमापन असले पाहिजे की ज्याच्यामुळे तो आपल्या चांगल्या अथवा वाईट वर्तणुकीचे मोजमाप करु शकेल. आणि माझ्या शिकवणूकीप्रमाणे हीच पाच तत्वे किंवा शीले माणसाच्या चांगल्या अथवा वाईट कृतीचे मोजमाप करण्याचा मापदंड आहे.”

७. “जगात सर्वत्र पतित लोक असतात. परंतु पतितांचे दोन वर्ग असतात. ज्यांच्यासमोर काही आदर्श आहे असे पतित आणि ज्यांच्यासमोर कोणताच आदर्श नाही असे पतित.”

८. “ज्यांच्यासमोर कोणताच आदर्श नाही, अशा पतिताला आपण पतित आहोत हेच कळत नाही. त्यामुळे तो नेहमीच पतित राहतो. या उलट ज्याच्यासमोर एखादा आदर्श आहे, असा पतित आपल्या पतितावस्थेतून वर येण्यासाठी प्रयत्न करीत असतो. का? याचे उत्तर असे की, आपण पतित आहोत हे त्याला माहित असते. “

९. “मनुष्याचे जीवन नियमित करण्यासाठी त्याच्यासमोर एखादा आदर्श असणे आणि कोणताच आदर्श नसणे याच्यातील हा फरक आहे. महत्त्वाची गोष्ट माणसाचा अध:पात ही नसून त्या अवस्थेत मुक्त होण्याच्या आदर्शाचा अभाव हीच होय.”

१०. “परिव्राजक, तुम्ही विचाराल की, जीवनाचा आदर्श म्हणून मान्य करण्यास हीच तत्वे योग्य का?”

११. “या प्रश्नाचे उत्तर तुम्हांला स्वत:लाच सापडेल, जर तुम्ही स्वत:लाच असा प्रश्न केलात की, ही तत्वे व्यक्तीच्या हितासाठी आहेत काय? किंवा ती सामाजिक हित साधणारी आहेत काय?”

१२. “जर या प्रश्नांना तुमची उत्तरे होकाराथी असतील तर माझ्या विशुध्दी मार्गाची तत्वे, जीवनाचा खरा आदर्श म्हणून मान्यता मिळविण्यास लायक आहेत, हेच त्यावरुन सिध्द होईल.”

Source: The Buddha and His Dhamma | Author: Dr. B. R. Ambedkar

--

--