४. भगवान बुध्दाचे पहिले प्रवचन (चालू)

अष्टांगिक मार्ग किंवा सदाचाराचा मार्ग

PC
Buddhism
4 min readJul 28, 2016

--

१. नंतर भगवान बुध्दाने परिव्राजकांना अष्टांगिक मार्गाविषयी प्रवचन दिले. भगवान बुध्दाने सांगितले की, अष्टांगिक मार्गाचे घटक आहेत.

२. अष्टांगिक मार्गाचे सर्वात पहिले महत्त्वाचे अंग सम्मा दिठ्ठि (सम्यक दृष्टी). याच्या स्पष्टीकरणाने भगवान बुध्दाने प्रवचनास सुरुवात केली.

३. सम्यक दृष्टीचे महत्त्व समजण्याकरिता भगवान बुध्द परिव्राजकांना म्हणाला-

४. “परिव्राजक हो, जग ही एक अंधारकोठडी असून मनुष्य हा तिच्यातील एक कैदी आहे, हे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे.”

५. “ही अंधारकोठडी गडद अंधाराने भरलेली आहे. अंधार इतका आहे की, कैद्याला क्वचितच काही दिसू शकते. कैद्याला आपण कैदी आहोत हेही कळत नाही.”

६. “ दीर्घकाल अंधारात राहिल्यामुळे मनुष्य केवळ आंधळा होऊन राहिलेला आहे. इतकेच नाही तर ज्याला प्रकाश म्हणतात अशी एखादी वस्तू अस्तित्वात असू शकते याबद्दल त्याला शंका वाटते.”

७. “मन हे एक असे साधन आहे की, ज्याच्यामुळे मनुष्याला प्रकाश मिळू शकतो.”

८. “तथापि, या अंधार कोठडीतील कैद्याच्या मनाची अशी अवस्था नाही की त्याचे मन हे या बाबतीत एक साधन ठरेल.”

९.” त्याच्या मनाची अवस्था त्यांना केवळ दृष्टी असल्यामुळे, अंधारासारखी एक वस्तू अस्तित्वात आहे हे, दाखविण्यापुरता अगदी थोडा प्रकाशच आत येवू देते.”

१०. “अशा प्रकारे त्यांचे आकलन शक्ती स्वभावात:च सदोष असते.”

११. “परंतु, परिव्राजकहो, या कैद्याची स्थिती जितकी दिसते दिसते तितकी निरशाजनक नाही हे लक्षात घ्या.”

१२. “कारण, माणसात इच्छाशक्ती या नावाची एक शक्ती असते. जेव्हा योग्य हेतू निर्माण होतात तेव्हा या इच्छाशक्तीला जागृत करता येते व तिला गती देता येते.”

१३. “कोणत्या दिशेने इच्छाशक्तीला गती द्यावे हे पाहण्याइतकाही जरी माणसाला प्रकाश मिळाला तर तो मनुष्य अशा प्रकारे आपल्या इच्छा शक्तीला गतिमान करु शकेल. की शेवटी त्यांची इच्छा शक्ती त्याला बंधमुक्त करील.”

१४. “अशा प्रकारे मनुष्य जरी बंधनात असला तरी तो बंधमुक्त होऊ शकेल. शेवटी स्वातंत्र्याकडे नेणारी पावले टाकण्यास तो कोणत्याही क्षणी सुरुवात करील.”

१५.”आपणाला पाहिजे त्या दिशेने जाण्यासाठी आपल्या मनाला आपण वळण लावू शकतो, हे याचे कारण होय. मन हेच आपल्याला जीवनाच्या कारागृहात बंदिवान करीत असते. आणि तेच आपल्याला तेथे डांबून ठेवते.”

१६. “पण मन जी गोष्ट निर्माण करते ती ते नष्ठही करु शकते जर मनाने माणसाला बंधनात टाकले असेल तर तेच मन योग्य दिशेने वळविल्यास त्याला बंधमुक्तही करु शकते.”

१७.” सम्यक दृष्टी जे करु शकते ते हेच होय.”

१८. “सम्यक दॄष्टीचा अंतिम उद्देश काय आहे? “ परिव्राजकांनी विचारले, भगवान बुध्दानी उत्तर दिले, “अविद्येचा विनाश हाच सम्यक दृष्टीचा उद्देश आहे. सम्यक दृष्टी ही मिथ्या दृष्टीच्या अगदी उलट आहे.”

१९. “मनुष्याला दु:खाचे अस्तित्व आणि दु:ख निरोधाचा उपाय ही उदात्त सत्ये न समजणे म्हणजेच अविद्या होय.”

२०.” सम्यक दृष्टीचा हेतू माणसाने कर्मकांडाच्या विधिंना व्यर्थ समजणे आणि शास्त्राच्या पावित्र्यावरील मैथ्या विश्वास टाकून देणे हा आहे.”

२१. “सम्यक दृष्टी करीता माणसाने अद्‍भूत कल्पनांचा त्याग केला पाहिजे. निसर्ग नियमा विरुध्द कोणतिही गोष्टी होऊ शकते ही गोष्ट मानसाने मानता कामा नये.”

२२.” ज्या सिध्दांतांना वास्तवतेचा किंवा अनुभवाचा आधार नाही व ते केवळ काल्पनिक अनुमाने आहेत ते सिध्दांतच सम्यक दृष्टीसाठी त्याज्य आहेत.”

२३.” स्वातंत्र मन आणि स्वतंत्र विचार हे सम्यक दृष्टीसाठी आवश्यक आहेत.”

२४. प्रत्येक माणसाला काही ध्येये, आकांक्षा आणि महत्त्वाकांक्षा असतात. अशी ध्येये, आकांक्षा आणि महत्त्वांकांक्षा ही उदात्त आणि प्रशंसनिय असावी ती शुद्र आणि अयोग्य नसावी. हा सम्यक संकल्पाचा आशय आहे.”

२५. “ सम्यक वाचा पुढील शिकवण देते-

(१) माणसाने जे सत्य असेल तेच बोलावे.

(२) असत्य बोलू नये.

(३) माणसाने दुस~याविषयी वाईट बोलू नये.

(४) माणसाने दुस~याची निंदा नालस्ती करण्यापासून परावृत्त व्हावे.

(५) माणसाने आपल्या लोकांविषयी रागाची किंवा शिविगाळीची भाषा वापरु नये.

(६) माणसाणे सर्वांशी आपुलकीने व सौजन्याने बोलावे.

(७) माणसाने अर्थहीन मुर्खपणाची बडबड करु नये. त्याचे बोलणे समंजस पणाचे व मुद्देसूद असावे..

२६. मी सांगितल्या प्रमाणे सम्यक वाचेचे हे कोणाच्या भितीमुळे किंवा पश्चातापाने होता कामा नये. सम्यक वाचेमुळे काय तोटा होईल किंवा आपल्या कृतीविषयी आपल्या वरिष्ठाला काय वातेल याचा सम्यक वाचेशी यत्किचिंतही संबंध असता नये.

२७. वरिष्ठाची आज्ञा किंवा वैयक्तिक फायदा हे सम्यक वाचेचे प्रमाण नाही.

२८. सम्यक कर्मांत हे योग्य वर्तनाची शिकवण देते. दुस~याच्या भावना आणि त्यांचे हक्क याचा मान राखून प्रत्येक कृती करावी अशी याची शिकवण आहे.

२९. सम्यक कर्मांताचे प्रमाण कोणते? जिवनाच्या मुलभूत नियमांशी सुसंगत असे वर्तन हे त्याचे प्रमाण होय.

३०. एखाद्याचे वर्तन ज्या वेळी या नियमांशी सुसंगत असते त्यावेळी ते सम्यक कर्मांताशी सुसंगत आहे असे समजावे.

३१. प्रत्येक व्यक्तीला चरितार्थ चालवावयाचा असतो परंतु चरितार्थाचे अनेक मार्ग आहेत. काही वाईट आहेत काही चांगले आहेत. ज्यांच्या मुळे इतरांची हाई होते किंवा इतरांच्यावर अन्याय होतो ते वाईट मार्ग होत. दुस~यांची हानी किंवा त्याच्यावर अन्याय न करता जगण्यापुरते मिळवण्याचे जे मार्ग ते चांगले होत. याला सम्यक आजिविका म्हणतात.

३२. सम्यक व्यायाम म्हणजे अविद्या नष्ट करण्याचा प्राथमिक प्रयत्न होय. अविद्या नष्ट करने म्हणजे या दु:खदायक कारागृहातून बाहेर जाण्याचा दारापर्यंत पोइहोचून पुढील मार्ग मोकळा करणे होय.

३३. सम्यक व्यायामाचे चार हेतू असतात.

३४. अष्टांग मार्गाशी विरोधी अशा चित्तवृत्तीचा प्रतिरोध करणे हा एक हेतू होय.

३५. अशा प्रकारच्या ज्या चित्त वृत्ती ज्या अगोदरच उत्पन्न झाल्या असतील तर त्या दाबून टकाणे हा दुसरा हेतू होय.

३६. अष्टांग मार्गाला आवश्यक अशा चित्तवृत्ती उत्पन्न करण्यास माणसाला सहाय्यक करणे हा तिसरा हेतू होय.

३७. अशा प्रकारच्या ज्या चित्त वृत्ती अगोदरच अस्तित्वात आल्या असतील त्याची वाढ आणि विकास करणे हा चवथा हेतू होय.

३८. सम्यक स्मृतीला जागरुकपणा व विचारीपणा याची आवश्यकता असते. मनाची सतत जागृती हा त्याचा अर्थ होय. दुष्ठ वासनांवर मनाचा पहारा ठेवणे हे सम्यक स्मृतीचे दुसरे नाव होय.

३९. परिव्राजकहो, सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजिविका, सम्यक व्यायाम आणि सम्यक स्मृती प्राप्त करुन घेण्याचा प्रयत्न करणा~या माणसाच्या मार्गावर पाच अडथळे किंवा बंधने असतात.

४०. लोभ, द्वेष, आळस व सुस्ती, संशय आणि अनिश्चय हे ते पाच अडथळे होत. म्हणून हे अडथळे दूर करणे आवश्यक आहे. हे अडथळे म्हणजे बंधनेच होत. आणि ते दूर करण्याचा मार्ग समाधी हा होय. परंतु परिव्राजकहो, सम्यक समाधी म्हणजे समाधी नव्हे हे लक्षात घ्या हे तिचे स्वरुप अगदी स्वरुप निराळे आहेत.

४१. समाधी म्हणजे केवळ चित्ताची एकाग्रता. वरील पाच अडथळ्यांना अटकाव करणा~या स्वयंप्रेरित अशा ध्यानावस्थांच्या मार्गावर ती आपल्याला नेते यात शंका नाही.

४२. परंतु या ध्यानाच्या अवस्था तात्पुरत्या असतात. त्यामुळे अडथळ्यांना केलेला अटकाव हा देखील तात्पुरताच ठरतो. मनाला स्थायी स्वरुपाचे वळण लावणे हे आवश्यक आहे. अशा प्रकारेच कायम स्वरुपाचे वळण केवळ सम्यक समधीनेच लावता येईल.

४३समधीमुळे अडथळ्यांना फक्त तात्पुरता अटकाव होतो. म्हणून ती केवळ नकारात्मक स्थिती होय. तिच्यात मनाला वळण लावले जात नाही, सम्यक समाधी ही वास्तवात्मक असते. ती मनाला एकाग्रतेचे आणि एकाग्रतेच्या काळात कुशल कर्माचा विचार करण्याचे शिक्षण देते. आनि त्याला अनुसरूनच अडथळ्यामुले निर्माण होणा~या अकुशल कर्माकडे आकर्षित होण्याची मनाची प्रवृत्ती ही ती नष्ठ करते.

४४. सम्यक समाधी मनाला चांगल्या गोष्टीचा विचार करण्याची व चांगल्या गोष्टीचाच नेहमी विचार करण्याची सवय लावते. सम्यक समाधी चांगल्या कृती करण्यास आवश्यक अशीच प्रेरणा मनामध्ये निर्माण करीत असते.

Source: The Buddha and His Dhamma | Author: Dr. B. R. Ambedkar

--

--