६. भगवान बुध्दाचे पहिले प्रवचन (पूर्ण)

PC
Buddhism
Published in
3 min readJul 30, 2016

१. बुध्दाने आपला धम्म आणि त्यातील विषय समजावून सांगितल्यावर परिव्राजकांना विचारले.

२. “व्यक्तिगत शुध्दी हा जगातील चांगल्या गोष्टींचा पाया नाही काय?” त्यांनी उत्तर दिले, “ आपण म्हणता ते बरोबर आहे.”

३. नंतर बुध्दाने विचारले, “लोभ, क्रोध, अज्ञान, प्राणहत्या, चौर्य, व्यभिचार आणि खोटे बोलणे यामुळे व्यक्तिगत शुध्दीचा पाया ढासळत नाही काय? या वाईट गोष्टीवर ताबा ठेवता यावा म्हणून व्यक्तिगत शुध्दीकरिता चारित्र्याचे सामर्थ्य वाढविणे आवश्यक नाही काय? माणसांमध्ये जर व्यक्तिगत शुध्दी नसेल तर तो चांगल्या गोष्टी करण्यास साधनभूत कसा होऊ शकेल?” आणि परिव्राजकांनी उत्तर दिले, “आपण म्हणता तसेच आहे.”

४. “आणखी असे की, दुस~यांना गुलाम करण्यात किंवा त्यांच्यावर सत्ता गालविण्यात लोकांना हरकत का वाटत नाही? दुस~याचे जीवन दु:खी करण्यात त्यांना काही का वाटत नाही? माणसे एकमेकांशी सदचाराने वागत नाहीत हेच त्याचे कारण नव्हे काय?” आणि परिव्राजक उत्तरले, “बरोबर आहे.”

५. “जर प्रत्येकाने अष्टांग मार्गाचा — सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक आजीविका, सम्यक कर्मांत, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी यांचा थोडक्यात सदाचार मार्गाचा अवलंब केला तर एक माणूस दुस~या माणसावर करीत असलेला अन्याय आणि अमानुषपणा दूर होणारा नाही काय?” त्यावर ते म्हणाले, “होय.”

६. शील किंवा सदगुणाच्या मार्गाचा उल्लेख करुन बुध्दाने विचारले, “गरजू आणि गरीब लोकांचे दु:ख नाहीसे करण्यासाठी आणि सर्व लोकांचे कल्याण करण्यासाठी दान आवश्यक दान आवश्यक नाही काय? जेथे दारिद्र्य आणि दु:ख आहे तेथे तेथे लक्ष पुरवून ते दुर करण्यासाठी करुणा आवश्यक नाही काय? नि:स्वार्थपणे करावयाच्या कार्यासाठी निष्काम भावाची आवश्यकता नाही काय? वैयक्तिक लाभ होत नसला तरीही सतत प्रयत्नशील राहण्यासाठी उपेक्षा आवश्यक नाही काय?”

७. “माणसावर प्रेम करणे आवश्यक नाही काय?” आणि ते म्हणाले, “होय.”

८. “याच्याही पुढे जाउन मी म्हणतो, केवळ प्रेम करणे पुरेसे नाही. खरी आवश्यकता आहे ती मैत्रीची. ती प्रेमापेक्षा जास्त व्यापक आहे. केवळ मानवाविषयीच नव्हे तर सर्व प्राणिमात्राविषयी बंधुभाव वाटणे हा मैत्रीचा अर्थ आहे. ती मानवापुरती मर्यादित नाही. अशा प्रकारची मैत्री आवश्यक नाही काय? आपले मन नि:पक्षपाती, मोकळे, प्रत्येकावर प्रेम करणारे आणि कुणाचाही द्वेष न करणारे असे असावे म्हणून आपणा स्वत:ला जो आनंद हवा असतो तोच आनंद सर्व प्राणिमात्रांना मैत्रीखेरीज यापेक्षा दुस~या कशाने मिळू शकेल.”

९. ते सर्व म्हणाले, “होय.”

१०. “परंतु या सर्व सदगुणांच्या आचरणास प्रज्ञेची-बुध्दीची-जोड दिली पाहिजे.”

११. बुध्दाने विचारले, “प्रज्ञा आवश्यक नाही का?” परिव्राजकांनी काहीच उत्तर दिले नाही. आपल्या प्रश्नाचे उत्तर देणे त्यांना भाग पाडण्यासाठी भगवान बुध्द पुढे म्हणाले, “दुष्कर्म न करणे, वाईटाचा विचार न करणे, उपजीविकेसाठी कुमार्गाचा अवलंब न करणे आणि जे वाईट आहे किंवा दुस~याला दु:ख देणारे आहे असे काहीही न बोलणे हे चांगल्या माणसांच्या अंगचे गुण होत. “ परिव्राजक म्हणाले, “होय, ते बरोबर आहे.”

१२. “परंतु आंधळेपणाने सत्कृत्य करणे हे उचित आहे काय?” भगवान बुध्दाने विचारले, “मी म्हणतो “नाही” हे पुरेसे नाही.” भगवान बुध्द परिव्राजकांस पुढे म्हणाले, “ हेच जर पुरेसे होते, तर तान्हे मुल नेहमीच चांगली कृत्ये करते असे म्हणावे लागेल. कारण, कारण तान्ह्या मुलाला शरीर म्हणजे काय हे कळत नसते. पाय झाडण्याखेरीज ते आपल्या शरीराने दुसरे कोणतेही वाईट कृत्य करु शकणार नाही. बोलणे म्हणजे काय हे त्याला कळत नाही. त्या अर्थी रडण्यापलीकडे अधिक वाईट असे ते काही बोलूच शकणार नाही. आनंदाने किंकाळ्या मारण्यापलीकडे विचार म्हणजे काय हे त्याला कळत नाही. उपजीविका म्हणजे काय हे त्याला कळत नाही. त्या अर्थी आईचे स्तन चोखण्यापलीकडे जगण्याचा दुसरा कोणताही वाईट मार्ग ते अवलंबू शकणार नाही.”

१३. “प्रज्ञेच्या कसोटीला सदगुण मार्ग उतरला पाहिजे. म्हणून समज आणि बुध्दी हेच प्रज्ञेचे दुसरे नाव आहे.”

१४. “प्रज्ञा पारमिता ही इतकी महत्त्वाची व आवश्यक का आहे याचे दुसरेही एक कारण आहे. दान आवश्यक आहे. परंतु प्रज्ञेशिवाय दानाचा दुष्परिणाम होऊ शकतो. करुणेची आवश्यकता आहे. परंतु प्रज्ञेशिवाय करुणेचा परिणाम वाईट गोष्टींना आधार देण्यात होण्याचा संभव आहे. पारमितेची प्रत्येक कृती ही प्रज्ञा पारमिताच्या कसोटीला उतरली पाहिजे. शहाणपणा हे प्रज्ञा पारमिताचे दुसरे नाव आहे.”

१५. “माझे म्हणणे असे की, अकुशल कर्म कोणते आणि ते कसे घडून येते याचे ज्ञान आणि जाणीव असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे अकुशल कर्म कोणते आणि कुशल कर्म कोणते याचे देखील ज्ञान आणि जाणिव असली पाहिजे. अशा ज्ञानाशिवाय कृती चांगली असूनही खरा चांगुलपणा असू शकणार नाही. म्हणूनच मी म्हणतो की, प्रज्ञा हा एक आवश्यक असा सदगुण आहे.”

१६. नंतर परिव्राजकांना पुढील प्रमाणे आदेश देउन भगवान बुध्दाने आपले प्रवचन संपविले.

१७. “माझा धम्म निराशावादी आहे असे तुम्ही म्हणण्याचा संभव आहे. कारण तो दु:खाच्या अस्तित्वाकडे मानवजातीचे लक्ष वेधितो. मी असे सांगतो की, माझ्या धम्माविषयीचा हा दृष्टीकोन चुकीचा ठरेल.”

१८. “माझा धम्म दु:खाचे अस्तित्व मान्य करतो यात शंका नाही. परंतु दु:खाचे निरसन करण्यावरही तो तितकाच जोर देतो हे विसरु नका. “

१९. “माझ्या धम्मामध्ये मानवी जीवनाचा उद्देश आणि आशा या दोहोंचाही अंतर्भाव आहे.”

२०. “माझ्या धम्माचा हेतू अविद्या नष्ट करणे हा आहे. अविद्या म्हणजे दु:खाच्या अस्तित्वाविषयीचे अज्ञान होय.”

२१. “त्यात आशा आहे. कारण मानवी दु:खाचा अंत करण्याचा मार्ग तो दाखवितो.”

२२. तुम्हाला हे म्हणणे मान्य आहे की नाही? आणि परिव्राजक म्हणाले, “होय, आम्हाला मान्य आहे.”

Source: The Buddha and His Dhamma | Author: Dr. B. R. Ambedkar

--

--