७. परिव्राजकांची प्रतिक्रिया

PC
Buddhism
Published in
2 min readJul 31, 2016

१. हा खरोखरच एक नवीन धम्म आहे याची परिव्राजकांना ताबडतोब जाणीव झाली. जीवनाच्या प्रश्नाकडे पाहण्याच्या या नव्या दृष्टीने त्यांच्यावर इतका परिणाम झाला की, ते एकमताने म्हणाले, “जगाच्या इतिहासात आजपर्यंत मानवी दु:खाचे अस्तित्व मान्य करणे हाच धर्माचा खरा पाया आहे हे कोणत्याही धर्मसंस्थापकाने संगितलेले नाही.”

२. “जगाच्या इतिहासात कोणत्याही धर्मसंस्थापकाने दु:खाचा परिहार करणे हा धर्माचा खरा उद्देश आहे हे सांगितले नाही.”

३. जगाच्या इतिहासात यापूर्वी मूलत:च इतका सरळ आणि साधा अदभुतता आणि अतिमानुषी शक्तीपासून इतका मुक्त, आत्मा, ईश्वर आणि मरणोत्तर जीवन यावरील श्रध्देपासून इतका स्वतंत्र, इतकेच नव्हे तर अशा श्रध्देला विरोध असणारा मुक्तीचा मार्ग कधीही पुढे मांडण्यात आला नाही!”

४. “जगाच्या इतिहासात यापूर्वी कुणीही अशा धर्माची योजना पुढे मांडली नाही की, ज्यामध्ये दैवी साक्षात्काराला थारा नाही आणि ज्याच्या आज्ञा ह्या ईश्वराच्या आज्ञा नसून त्या माणसाच्या सामाजिक गरजांच्या चिकित्सेपोटी निर्माण झालेल्या आहेत!”

५. “जगाच्या इतिहासात मोक्ष हे असे सुखाचे वरदान आहे की, जे माणसाने स्वप्रयत्नाने व सदाचाराने वागून याच जन्मात आणि याच पृथ्वीतलावर राहून प्राप्त करावयाचे असते, हा मोक्षाचा अर्थ यापूर्वी कुणीही सांगितला नाही!”

६. भगवान बुध्दाच्या नव्या धम्माचे प्रवचन ऎकल्यावर परिव्राजकांनी अशा भावना व्यक्त केल्या.

७. जो अत्युच्च नैतिक भावनेने प्रेरित झालेला आहे आणि जो आपल्या काळातील बौध्दीक ज्ञानात तज्ञ आहे, जो एक नव्या विचारांचा प्रणेता आहे. याच जगात, याच जीवनात आत्मविकास व आत्मसंयमन यांच्या योगाने आंतरिक ~हदयपरिवर्तनाने मुक्ती मिळू शकते, हे आपले तत्व विरोधी प्रवृत्तीची जाणीव असूनही बुध्दीपुरस्सर पुढे मांडण्याचे ज्याच्यात धर्य आहे अशा भगवान बुध्दाच्या रुपाने एक समाजसुधारक लाभला आहे असे त्यांना वाटले.

८. भगवान बुध्दविषयी त्यांचा आदर इतका अमर्याद झाला की, ते त्यास ताबडतोब शरण गेले आणि आपले शिष्य म्हणून आपला स्वीकार करावा अशी त्यांनी त्यास विनंती केली.

९. “एहि भिक्खवे” (भिक्खूंनो, या) हा मंत्र उच्चारुन भगवान बुध्दाने त्यांना आपल्या धम्मात प्रविष्ट करुन घेतले. ते पंचवर्गीय भिक्खू म्हणून पुढे ओळखले जाउ लागले.

Source: The Buddha and His Dhamma | Author: Dr. B. R. Ambedkar

--

--