कवडसे: एक नवी सुरुवात

Swati Dole-Dixit
Kavadse
Published in
3 min readJul 27, 2020

उन्हाने आणलेली

सावलीने विणलेली

आयष्याने जाणलेली

ही छाया-प्रकाशी रेखाचित्रे!

नमस्कार!

मनातले काही कवडसे ओंजळीत घेत, सगळ्यांशी संवाद साधायचा हा पहिलाच प्रयत्न. मी प्राध्यापिका स्वाती आनंद दीक्षित. माझे मूळ गाव जुन्नर तालुक्यातील नारायणगाव. आता मात्र पुणेकर आहे. भूगोल आणि पर्यावरण हे माझे जिव्हाळ्याचे विषय. पुणे येथे पर्यावरण उणे असले तरी हीच पर्यावरण प्रेमींची मांदियाळी सुद्धा आहे. त्यातील कित्येक गुरूंकडून थोडेफार शिकण्याचा प्रयत्न केला. प्रयत्न- प्रयोग केले, आणि थोडा अनुभव घेतल्यावर मग तुम्हालाही काही सांगावसं वाटलं.

काय असेल या ब्लॉग वर?

घर- स्वयंपाकघर…पर्यावरण संवर्धनाचे माहेरघर

आपल्या प्रत्येकाला पर्यावरणासाठी काहीतरी करावस वाटतं, तसे मलाही. विशेषतः भूगोल आणि पर्यावरण शिकवताना एक शिक्षक म्हणून तर जास्तच. पण घर, नोकरी व इतर जबाबदाऱ्या सांभाळून हे कसे साध्य व्हावे? मग निघून गेलेल्या आई, आजी, पणजी ते फुले, पाने, फळे, बाग, स्वयंपाकघरातील अगदी लिंबू- मीठा पासून सगळेच आणि या क्षेत्रातले तज्ञ अशा अनेक गुरूंनी शाश्वत मार्ग दाखवला, एक बीजमंत्र दिला की “पर्यावरण संवर्धनाची सुरुवात ही घरापासूनच होते”, अर्थात “घर हीच पर्यावरणाची मुख्य शुद्धीकरण यंत्रणा आहे.”

जवळपास तीन वर्षे काही यशस्वी प्रयोग केल्यावर या ब्लॉग मध्ये पर्यावरणीय प्रश्नांवर माझ्या परीने शोधलेली उत्तरे तुम्हाला सांगायला मला आवडतील. Toxin-free lifestyle अर्थात विषमुक्त जीवनशैली साधे-सोपे- घरच्याघरी केलेले प्रयोग करून सहजसाध्य होऊ शकते.

माझ्या घरातला वारसा

त्याचप्रमाणे १५०-२०० वर्ष्यांपुर्वीच्या अनेक अँटिक वस्तूंचा वारसा आम्हाला मिळालेला आहे. त्या जुन्या, पारंपरिक, जतन करून ठेवलेल्या ऐतिहासिक वस्तूंची सचित्र माहिती, व्हिडिओज हे सुद्धा माझ्या ब्लॉग वर येतील.

आकाशातलं हिरवं बेट

छत किंवा गच्चीवर फुलवलेल्या, इवल्याश्या शेतीचे काही जमलेले तर कित्येक फसलेले प्रयोग, त्याचे फोटोज, तज्ज्ञांचे व्हिडिओज तुम्हालाही नक्कीच आवडतील, प्रेरणाही देतील.

नदीला हृदयाशी जोडूया

नदी आणि आई दोन्ही आपल्या हृदयात सतत प्रवाहित असतात. नदी आधी समजून घ्यायला हवी तरच तिची आणि पर्यायाने आपलीही विकलं अवस्था आपल्या लक्षात येईल. अविरल-निर्मल नदी, तिच्या न संपणाऱ्या गोष्टी-गप्पा इथे रंगतील.

आणि कवडसे…अचानक आलेली उन्हाची तिरीप किंवा कधी दाटलेली सावलीची महिरप

अर्थात विविध विषयांवरील स्फुट लेख, काव्य. काही सगळ्यांच्या आवडीचे, उपयोगी व्हिडिओ सुद्धा!

तर खात्री आहे आपण बघाल, वाचाल, बदल सुचवाल…आणि हो, नक्कीच संवाद साधाल या पत्त्यावर: swatiadixit@gmail.com

धन्यवाद!

स्वाती

--

--