जादुई चिराग- रिठा!

Swati Dole-Dixit
Kavadse
Published in
8 min readAug 10, 2020

होय! यापुढील काळात विषयुक्त सफाई साधनांना पर्याय असणारा छोटा रिठा शेती, सफाई, औषधे, कारखाने, सौंदर्य प्रसाधने या क्षेत्रात अधिराज्य गाजवेल. या लेखातील रिठ्याची मुद्देसूद माहिती आणि रिठ्याचे घरगुती उपयोग आपल्याला विषमुक्त जीवनशैलीचा मार्ग दाखवतील.

लेखाच्या शेवटी रिठ्यापासून घरच्या घरी साबण, भांडी घासण्याची पावडर बनवण्याच्या रेसीपीजचे व्हिडिओज दिले आहेत. ते नक्की करून बघा, सोप आहे आणि स्वस्त पडते.

मंडलाकारं

सूर्य उगवला …आणखी एका दिवसाचे दान आपल्या पदरात पडले …

सूर्य मावळला …रात्र झाली …रात्र सरली…अंधार संपलाच नाही …दिवसही उगवला नाही.

म्हणजे दिवस- रात्रीचे वर्तुळ पूर्ण न होताच भरकटले तर?

चंद्र पृथ्वीभोवती, पृथ्वी सूर्याभोवती, आकाशगंगा कृष्णविवराच्या भोवती २० अब्ज वर्षांपासून भ्रमण करताहेत. चंद्र, पृथ्वी, आकाशगंगा आपापला मार्ग ठरवून सरळ रेषेत निघून गेले तर?

जीवन -मरणाचे चक्रही अनाहत…

जंगलात पानगळ होते…त्यातूनच नवजीवन साकारतं,

जीवनाने मागे फिरून मरणाकडे जायला हवे तरच पुन्हा नवे जीवन सुरु होईल ना?

यातले एकच सूत्र महत्वाचे…अनादी सुरुवात, मग शेवट …शेवटातून पुन्हा सुरुवात …

यांचा मार्ग हा नक्की वर्तुळाकार किंवा लंबवर्तुळाकार असतो.

चराचरातील सारे व्यापार वर्तुळाकार आहेत म्हणून ते शाश्वत आहेत.

याला पहिले किंवा शेवटचे टोक नाही, पुढे जात असतानाच हे मागेही फिरणं असत आणि मागे फिरण्यातच पुढचा प्रवास असतो या विश्वाचा…सूक्ष्माचा आणि स्थूलाचाही!

विश्वातील कोणतीही व्यवस्था असो…काहीही घेतले, वापरले की नंतर ‘इदं न मम्” म्हणून निसर्गाला परत दिले जाते. जमीन दिवसभर सूर्याकडून उष्णता घेते, दिवस सरताना हा उबदार लहरींचा नजराणा आकाशाला परत दिला जातो. पावसाचे पाणी पिऊन तृप्त धरा ते पाणी समुद्रापर्यंत आणि वाफेचे निःश्वास ढगांपर्यंत पोचवते, आणि हे विश्वाधारी जीवनचक्र अखंड चालू राहते.

या सगळ्यात माणसाचा प्रवास कसा चालू आहे?

माणूस तीरासारखा एका रेषेत, भयानक वेगाने “प्रगतीकडे” झेपावतो आहे. लक्ष फार दूरवरचे, म्हणूनच आजूबाजूच्या जगाचे, पर्यावरणाचे भान सुटलेले. अनेक प्रश्नांच्या गुंत्यात जखडून गेल्याने हात पाय आणि संवेदनाहीया जायबंदी झालेल्या. कोणतीही संसाधने ओरबाडताना, वापरताना ‘वर्तुळाकार’ या सूत्राचा विसर पडलेला आहे का आपल्याला?

सर्वात बुद्धिमान मानवाला निसर्गाकडून किती-काय घ्यायचं, निसर्गाची चक्राकार प्रणाली कशी काम करते हे माहित नाही की फक्त ‘स्वार्थचक्राशी’, स्वतःची सुख-धनरेषा ठळक करण्याशी तो बांधील आहे?

हो, आपल्याला चक्राकार विचार करायला हवाय. आपण वापरत असणारी प्रत्येक गोष्ट कुठून येते आणि वापरल्यावर त्याचा शेवट कसा -कुठे होतो? साधी घरातली सफाईची किंवा कोणतीही उत्पादने घ्या ना, त्यातील रसायने कुठून येतात? वापरल्यावर त्याचा परिणाम, कोणा कोणावर, कुठे, कसा, किती होतो?

रोजच्या वापरातली विषे निसर्गालाच नाही तर आपल्या आरोग्यालाही धोकादायक आहेत. माहिती आहे प्रत्येकाला, पण मग याला पर्याय काय आहेत?

आहेत …नक्की आहेत…निसर्गाने सगळे काही दिलंय…जे पूर्वजांनी ओळखलं…वापरलं आणि काळाच्या कसोटीवर खरेही उतरलं!

मग थोडे वळण घेऊन मागे बघू या का? विषमुक्त, निरामय जीवन पूर्वज कसे जगत होते?

थोडे मागे जाऊनच पुढची मोठी उडी घ्यावी लागेल ना पर्यावरणासाठी?

निसर्गचक्राचा समतोल नैसर्गिक गोष्टींनीच उत्तम राखता येईल. कसा? याचा धांडोळा घेत गेल्यावर एक जादुई चिराग अर्थात त्यासारखेच काम करणारे अद्भुत छोटेसे फळ भेटले … रिठा …जादुई रिठा! कशावरही घासा, स्वच्छ करा. निसर्गाने आपल्याला रसदार फळे, सुगंधित फुले, नाना तऱ्हेचे अन्न दिले आहे तशीच आपल्या स्वच्छतेचीही आयती सोय केली आहे, तिही विनासायास.

निसर्गाची कास धरुयात …आज रिठ्याच्याच गोष्टी करूयात!

रिठ्याची गोष्ट

आमच्या नारायणगावला मीना नदीतीरी असलेल्या माध्यमिक शाळेच्या प्रांगणात दोन पुरातन विशाल वटवृक्ष व्रतस्थ मुनींसारखे ध्यानस्थ बसलेले दिसतात. त्यांच्या समोर एकाच ओळीत रिठ्याच्या झाडांनी, शिष्यांच्या नम्रतेने, शिस्त पाळत छान रांग केली आहे, म्हणजेच हे मुद्दाम कोणीतरी लावलेत. या शाळेच्या परिसरात हे रिठे इथे काय करताहेत? बरीच झाडे पटांगणासाठी तोडली असणार मग रिठेच मुद्दाम का लावलेत? याचीही छोटी पण छान गोष्ट आहे.

ते वर्ष होते सन १९४४. जुन्नर तालुक्याच्या निसर्गसंपन्न, मात्र औपचारिक शिक्षणाचा गंध नसणाऱ्या परिसरात, गुरुवर्य रा. प. सबनीस या द्रष्ट्या ज्ञानऋषींनी “विद्यामंदिराची” स्थापना केली. मीना नदीकाठच्या उंचवट्यावरील जागेत, अगदी जेमतेम लोकसंख्या असणाऱ्या नारायणगाव आणि नंतर जुन्नरला शिक्षणाची तोंडओळख झाली. शाळा सुरु करताना ‘एकाग्रता यशोबीजं’ हा मंत्र देत, त्या ग्रामीण,आदिवासी परिसरातील गोरगरिबांची मुले इथेच गुरुकुल पद्धतीने राहून शिकतील असे स्वप्न त्यांनी पहिले होते. म्हणून शाळेचा श्री गणेशा करताना दूरदृष्टीने शाळेच्याच परिसरात रिठ्याची अनेक झाडे लावली, जी इथे राहणाऱ्या मुलांना कपडे, अंघोळ सफाई अश्या सर्व प्रकारच्या स्वच्छतेसाठी उपयोगी पडावीत. आजही ताठ मानेने उभी असलेली ही झाडे म्हणजे गुरुवर्यांनी रुजवलेली आत्मनिर्भरता, स्वावलंबन आणि पर्यावरण संवेदना यांची प्रतिकेच होत.

आज काळ बदललाय. बाजारू रासायनिक उत्पादनांनी जाहिरातींच्या आडून उच्छाद मांडलाय, नदी-नाले, सारे पर्यावरण आणि सकल जीवांचे आरोग्यही अक्षरशः नासले आणि मग आपण शोधायला लागलो विषमुक्त ऑरगॅनिक उत्पादने. अजूनही आपल्याला ‘त्या काळी साबण अस्तित्वात नसताना आपली आजी- पणजी, पूर्वज केस- कपडे कशाने बर धुवत असतील?’ असा प्रश्न अजिबात पडत नाही , कधी पडलाच तर ‘तो मागासलेला जुना काळ म्हणून त्याची दाखल घ्यायची गरजच नसते. गतकाळाची दारे किलकिली करून पहिली तरआपल्याला अनेक गोष्टी दिसतात, त्यातली एक म्हणजे “रिठा’. आज तसा दुर्लक्षलेला, ज्याच्यावाचून काहीच आडत नाही असा किरकोळ रिठा!

रिठ्याची कुळकथा

रिठ्याची कुळकथाही भारी छान आहे. हा आहे, ६०-७० वर्षांचे आयुर्मान लाभलेला,उष्ण कटिबंधातील एक पानगळी वृक्ष. Soapberry असेही त्याचे एक लाडके नाव. भारतात रिठ्याला वेगवेगळ्या प्रांतानुसार डोडो, डोडन, कनमाथाली अशीही नावे आहेत. तर जगात इतरत्र याला ‘ Washnut, Soapnuts, Washshells’ असेही म्हणतात. उन्हाळ्यात याला मोहोर येतो, पांढरट — हिरव्या फुलांनी झाडाची हिरवाई अधिकच गडद होते आणि मोठ्या बोराएव्हड्या फळांचे हिरवे -हिरवे घोस वाऱ्यावर हिंदोळे घेतात. थंडीची चाहूल लागताना रिठे सोनसळी पिवळे आणि नंतर तपकिरी होत जातात, हलक्या सुरकुत्या अंगावर दाटतात आणि ऐन हिवाळ्यात झाडाखाली तयार रिठ्याचा सडा पडतो.

रिठा हा नैसर्गिक, काळाच्या आणि शास्त्राच्याही कसोटीवर हजारो वर्षे उतरलेला नैसर्गिक साबण आहे. भरपूर फेस आणि मंद-मोहक सुगंध ही याची वैशिष्ट्ये आहेत. हठयोगाचे जनक ‘मच्छिन्द्रनाथ’ यांनी ९ व्या शतकात रिठ्याच्या झाडाखाली बसून साधना केली होती असे उल्लेख आहेत. इतकेच नाही तर इसवीसनपूर्व ५ -६ व्या शतकातील रिठे, साबण,आणि धोबी यांचे उल्लेख प्राचीन भारतीय साहित्यात विपुल आहेत. तसे भारतात रिठ्याचे अनेक प्रकार सर्वदूर मिळतात मात्र उत्तम प्रतीचे रिठे हे प्रामुख्याने उत्तर भारत आणि नेपाळमध्ये आहेत, त्यांचे शास्रीय नाव आहे Sapindus Morossi ही मोठ्या आकाराची रिठ्याची फळे आणि दक्षिण भारतातील छोटा रिठा आहे Sapindus Frifoliatus!

‘Sapindanceae’ कुटुंबातला हा सदस्य Sapindus म्हणूनही ओळखला जातो. त्यातल्या indus या शब्दामुळे शास्त्रज्ञांमध्ये भांडाभांडी सुरु झाली. ‘Indus’ नावावरून कोणी म्हणे याचे मूळ भारतीय तर कोणाला हा वेस्ट इंडिज वाला वाटला तर कोणी याच्या मूळ पुरुषाला नेटिव्ह अमेरिकेत नेऊन बसवलं.

रिठा दिसायला छोटा असला ना तरी त्याचे औषधी, कारखानदारी, शेती, प्रसाधने, बागा, सफाई उत्पादने या क्षेत्रात असंख्य उपयोग आहेत. याच्या अनेक प्रकारांपैकी १० जाती व्यावसायिक दृष्ट्या महत्वाच्या आहेत. नव्वद वर्षापर्यंत हे झाड फळे देते.

हजारो वर्षे जगभरात याचा वापर होत असे. मात्र आधुनिकीकरणाच्या पर्वात पाश्चात्यांनी याचा ‘इंडस्ट्रियल सोप’ म्हणून वापर केला, मूळचा हा “Laundry Soap’ किंवा धुण्याचा साबण आहे हे ते विसरले, ते विसरले म्हणून आपणही अर्थातच विसरलो!

या जादुई फळावर जगभरात, अनेक क्षेत्रांत संशोधन सुरु आहे. Horticulture (Horticulture & soapnut) या क्षेत्रात रिठ्याचा वापर भविष्यकाळात मोठ्या प्रमाणावर होणार आहे. रिठ्याच्या वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मांमुळे त्यावर शास्त्रीय संशोधन मोठ्या प्रमाणावर होत असून त्यावरचे अनेक शोधनिबंधही प्रसिद्ध झाले आहेत.

रिठ्यावर, त्याच्या गुणधर्मांवर, उपयोगितेवर गूगल बाबाच्या पोतडीत माहितीचा खजिना आहे. त्यातील निवडक गोष्टी मुद्देसूद स्वरूपात मांडते.

रिठ्याचे गुणधर्म

  • रिठा हा ‘all purpose cleaner; आहे. डोक्यावरच्या केसापासून, घर, टॉयलेट, कपडे, अंघोळ, औषधे इथपर्यंत सर्वांसाठी याचा उपयोग करता येतो. रिठा, शिकेकाई, व्हिनेगर, लिंबू घरात असेल तर इतर कोणत्याही साबणाची, स्वच्छतेची बाजारू आणि रसायने-युक्त उत्पादने विकत आणण्याची गरज नाही.
  • रिठ्याला ‘natural detergen’t अर्थात नैसर्गिक साबण असे सार्थ नाव आहे.
  • कोणतीही गुंतागुंतीची प्रक्रिया न करता, फक्त भिजवून सुवासिक फेस देणारा, रिठा हा उत्तम निर्मलक अर्थात साबण किंवा डिटर्जेन्ट आहे.
  • रिठा आख्खा, पावडर किंवा पातळ साबणाच्या स्वरूपात वापरता येतो.
  • रिठ्याचे बाहेरील आवरण म्हणजे ‘Pericarp’. (Pericarp of soapnut) यातच साबणाचे गुणधर्म असतात. यातील ‘सॅपोनीन’ (saponin of soapnut) हा घटक स्वच्छतेचे काम करतो.
  • रिठा फळात सरासरी १०.१ % हे सॅपोनीनचे प्रमाण असते ज्यावर रिठ्याची गुणवत्ता ठरते.
  • रिठ्याच्या बाहेरील आवरणाचे सरासरी वजन, एकूण वजनाच्या ५६ .५ % तर इतर भाग हा बियांचा असतो. बियांमध्ये स्वच्छतेचे गुणधर्म नसतात. परंतु बिया दंतवैद्यक क्षेत्रात व तेलासाठी अत्यंत उपयोगी आहेत.
  • रिठ्याच्या बियांचे तेल काढतात, बियांमध्ये २६ ते २७ % तेल असते.
  • रिठा (antibacterial, antimicrobial, antifungal properties of soapnut) प्रतिसूक्ष्म जैविक, बुरशी विरोधी, पृष्ठ प्रक्रियाकारी, पाण्याचे, मातीचे, पर्यायाने पर्यावरणातील प्रदूषण कमी करणारे असे बहुगुणी फळ आहे.
  • रिठा वापरल्या नंतरचे सांडपाणी, ओढे, नद्या प्रदूषित नव्हे तर स्वच्छ करते.
  • वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशात रिठ्याचे झाड सहज वाढते.

रिठ्याचे उपयोग

कपडे सफाई

  • रोजचे सर्व प्रकारचे कपडे धुण्यासाठी उदा. सुती, लोकर, कृत्रिम धाग्याचे, रेशमी याला रिठ्यासारखा उत्तम पर्याय नाही.
  • रिठा बाजारातील कोणत्याही पावडर साबणापेक्षा कमी नाही, उलट नैसर्गिक सुगंधाचा हा नैसर्गिक, पर्यावरणपूरक साबण वापरायला सोपा, तितकाच परिणामकारक आहे
  • कपड्यावरील अगदी कठीण, जसे रक्त व दारूचे डागही याने जातात.
  • रिठा कपड्यांचा नैसर्गिक रंग टिकवून ठेवतो, फिकट होऊ देत नाही, त्यामुळे जास्त काळ कपडे वापरता येतात.
  • फक्त १०० ग्रॅम रिठ्यापासून २. ५ लिटर पातळ साबण बनतो, त्यातील चार चमचे साबण बादलीभर धुण्यास पुरतो.
  • नैसर्गिक साबण असल्याने कपडे, केस, वस्तूंवर, भांड्यांवर कोणताही रासायनिक द्रव्याचा अंश राहत नाही, त्यामुळे त्वचेवरील ऍलर्जी, अन्नातील विषबाधा ई. चा धोका टळतो.
  • कपडे मुलायम आणि सुगंधित होतात.
  • आक्खा रिठा किमान सहा वेळा कपडे धुण्यासाठी वापरू शकतो.
  • कपडे धुतलेले पाणी बागेसाठी, झाडांसाठी, बाथरूम -संडास धुण्यासाठी उपयोगी.
  • रिठ्यात भिजवलेले कपडे धुण्यास कमी पाणी लागते.
  • फेस कमी येतो, त्यामुळे धुण्याचे मशीन सुरक्षित राहते.
  • वर्षभराची रिठ्याच्या पावडरची साठवण करून गरजेनुसार वापरता येते, ही नैसर्गिक पावडर बाजारू साबणापेक्षा स्वस्त पडते .

घरातील व वैयक्तिक सफाई

  • रिठ्याच्या पातळ साबणात घरचे किंवा विकतचे व्हिनेगर घातले तर कपड्यांबरोबर भांडी घासायला उपयोगी पडते.
  • रिठा द्रावण कपडे धुण्याच्या मशीनमध्ये व डिशवॉशर मध्ये घालता येते.
  • दागिने, काच , स्वयंपाकघर, पंखे, बाथरूम, दारे, टाईल्स किंवा कोणताही पृष्ठभाग याने स्वच्छ होतो.
  • रिठा स्वयंपाकघरात बहू उपयोगी आहे. ओटा, कपाटे जेवणाचे टेबल, फरशी, यावरील चिकटपणा सहज जातो. त्यात व्हिनेगर मिसळले तर माश्या, चिलटे यांचा प्रादुर्भाव रोखता येतो. हवेत स्प्रे करून तुम्ही फ्रेशनेस अनुभवू शकता.
  • लिंबू आणि रिठ्याची बारीक दळलेली पूड, खायचा सोडा व मीठ ही भांडी घासण्याची उत्तम पर्यावरण पूरक पावडर आहे.
  • अंघोळीसाठी रिठा पावडर किंवा द्रावण वापरा, ज्यामुळे त्वचेवर एक मुलायम आवरण तयार होऊन इन्फेकशन, संसर्गापासून बचाव होऊ शकतो.
  • शाम्पू, फेसवॉश अशी अनेक पर्यावरण पूरक उत्पादने रिठ्यापासून बनतात.
  • भाज्या- फळे रिठा द्रावणात १० मिनिटे बुडवून ठेवली तर त्यांच्या पृष्ठभागावरील ९५% रासायनिक अंश निघून जातो.
  • रिठा साबण पाणी घालून ते सौम्य द्रावण चारचाकी-दुचाकी गाड्या, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, आरसे सफाईसाठी वापराता येते.
  • बागेतली झाडावरील कीड, रोग (Aphids, blackfly) रिठा द्रावणाने आटोक्यात येतात.
  • फरशी पुसण्यासाठी पाण्यात मीठ, तुरटी बरोबर रिठा द्रावण घालावे.

औषधी उपयोग

  • आयुर्वेदात रिठ्याला मनाचे स्थान आहे. औषधे, मसाज, केसांच्या सफाईसाठी रिठ्याचा उपयोग होतो .
  • केसगळती, उवा, निस्तेज केस यावरही रिठा वापर हा उपाय करतात.
  • चीनमध्ये त्वचारोगावर तर ब्रह्मदेशात epilepsy (Epilepsy & soapnut) वर, तैवान मध्ये डोळ्यांच्या आरोग्यासाठी (Eye health & soapnut) रिठा वापरतात.
  • रिठा नैसर्गिक ‘exfoliant आहे, त्वचेवरील मृतपेशी नैसर्गिकपणे काढल्या जातात.
  • मशीनवर काम करणाऱ्या लोकांच्या हातावर तीव्र रासायनिक द्रावणामुळे चिरा पडतात. संशोधनाने सिद्ध झाले आहे की रिठ्याच्या वापराने दोन आठवड्यात त्यांचे हात अधिक स्वच्छ आणि मुलायम होतात.
  • Anti -gastric, anti-ulcer (Anti-gastric, anti-ulcer properties of soapnut) अश्या गुणधर्मामुळे रिठा liver (यकृत) विकारात वापरला जातो.
  • प्रजनन (reproduction & soapnut) विषयी औषधांमध्ये रिठ्याचा वापर होतो.

रिठ्याचे भाऊबंद

Longan (Dragon-Eye)/Australian Acacia

The Longan fruit

दक्षिण-पूर्व आशिया, अमेरिका आणि उष्णकटिबंधीय प्रदेशात ‘लॉंगन Longan detergent किंवा ‘ड्रॅगन आय’ Gragan Eye Tree हा वृक्ष ‘Ecological Detergent’ म्हणून ओळखला जातो कारण यातही saponin हे नैसर्गिक निर्मलक द्रव्य आहे .

  • लॉंगन या झाडाची पाने साबण तयार करण्यासाठी वापरतात.
  • लिचीसारखा धुरकट पांढरा गर आणि आत काळीभोर बी असल्याने याला ड्रॅगन -आय म्हणतात.
  • ‘ऑस्ट्रेलियन अकेशिया’ Saponin in Australian Acesia या झाडाच्या शेंगातही सॅपोनीन मुबलक प्रमाणात आढळते.
  • ही परदेशी झाडे सामाजिक वनीकरण प्रकल्पाच्या अंतर्गत भारतात मोठ्या भू-भागावर लावली गेली आहेत. त्याच्या शेंगा सर्वत्र विखुरलेल्या दिसतात. त्याचा उपयोग रिठ्याला पर्याय म्हणून नक्कीच करता येईल, अर्थात यावर संशोधन होणे गरजेचे आहे.
  • ARTI या संस्थेने काही वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियन अकेशिया या झाडाच्या शेंगांपासून शाम्पू, साबण वगरे उत्पादने तयार करण्याचे प्रशिक्षण दिले होते. पुढील फोटोत त्याची माहिती दिली आहे.

रिठ्याची कच्ची फळे … रिठ्याचे झाड… पिकलेली फळे … सुकलेले रिठे

आहेत इवले छोटे … पण काम किती मोठे!

काही उपयुक्त संदर्भ:

www.theearthofindia.com

http://soapnut.in/about-soapnut.html

--

--