आधार’ नसल्यास शाळेत प्रवेश नाकारता येणार नाही; युनिक आयडेंटिफिकेशन

आधार क्रमांक नसेल तर संस्था विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश नाकारू शकत नाहीत, असे युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने (यूआयडीएआय) म्हटले आहे. एखादी संस्था असा प्रवेश नाकारत असेल तर ते अवैध आहे, असे परिपत्रक राज्यांच्या सचिवांना पाठवण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांना आधारनोंदणी आणि अपडेटची सुविधा उपलब्ध करुन देणे ही शाळांची जबाबदारी आहे. त्याचबरोबर कोणत्याही विद्यार्थ्याला आधार नसल्यामुळे शाळा प्रवेश तसेच इतर सुविधा रोखता येणार नाही. त्यांनी आधार मिळवण्याचा अधिकार आहे, अशा प्रकारे कुठलीही सुविधा नाकारणे गैर असून आधारचा कायदाही याला परवानगी देत नाही, असे यूआयडीने स्पष्ट केले आहे.
शाळांच्या परिसरात आधार कार्ड काढण्यासाठी किंवा माहितीमध्ये सुधारणा करण्यासाठी विशेष मोहीम राबवली जावी, असेही परिपत्रकात नमूद आहे. यासाठी स्थानिक बँका, पोस्ट, शिक्षण संस्था आिण जिल्हा प्रशासनाशी समन्वय ठेवावा, असे यूआयडीएआयने म्हटले आहे.
विद्यार्थ्यांकडे आधार क्रमांक नसल्याने त्यांना प्रवेश रोखण्याबरोबरच विविध फायदे आणि सुविधाही रोखण्यात आल्याच्या घटना यापूर्वी समोर आल्या आहेत. याबाबत आलेल्या तक्रारींवर भाष्य करताना युआयडीने देशभरातील शाळांना या सूचना केल्या आहेत. विद्यार्थ्यांना आधार उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी शाळांचीच असल्याचेही यूआयडीने स्पष्ट केले आहे.
आधार कार्ड येईपर्यंत इतर पुरावे वापरा –
आधारअभावी विद्यार्थ्यांचा शिक्षण हक्क हिरावून घेता येणार नाही. कोणताही कायदा अशी परवानगी देत नाही. जोपर्यंत मुलांचा आधार क्रमांक मिळत नाही तोवर ओळखपत्र म्हणून इतर माध्यमांचा वापर करावा, असे यूआयडीएआयने म्हटले.

