गणपती विशेष फेऱ्यांचा विस्तार — कोकण रेल्वे
गणपतीसाठी रेल्वेच्या १३२ जादा फेऱ्या ५ सप्टेंबरपासून धावणार विशेष गाड्या

प्रवाशांची होणारी गैरसोय पाहता कोकण रेल्वेने १४ गणपती विशेष फेऱ्यांचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडय़ा सप्टेंबर महिन्याच्या तिसऱ्या व चौथ्या आठवडय़ापर्यंत धावू शकणार आहेत. यामध्ये लोकमान्य टिळक टर्मिनसह-सावंतवाडी रोड गाडीसह पनवेल-सावंतवाडी या गाडीचाही समावेश आहे.
कोकण आणि मध्य रेल्वेकडून दर वर्षी गणपतीसाठी नियमित धावणाऱ्या गाडय़ांव्यतिरिक्त विशेष गाडय़ाही सोडल्या जातात. गेल्या वर्षी साधारण २५० पर्यंत फेऱ्या सोडल्या होत्या. यंदाही अशाच प्रकारे नियोजन केले आहे. काही गाडय़ांची घोषणादेखील करण्यात आली आहे. मात्र प्रवाशांचा मिळणारा प्रतिसाद आणि त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी सोडण्यात येणाऱ्या विशेष फेऱ्यांची अंतिम तारीख आणखी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
अशा असणार आहेत रेल्वेच्या फेऱ्या –
मुंबई ते सावंतवाडी मार्गावर ४४ फेऱ्या चालवल्या जातील. ५ ते ३० सप्टेंबरमध्ये आठवड्यातील सहा दिवस (गुरुवार वगळता) धावतील. गाडी क्र. ०१००१ मुंबई ते सावंतवाडी दररोज रात्री १२.२० मिनिटांनी सुटून सावंतवाडीला दु. २.१० वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी गाडी क्र. ०१००२ सावंतवाडी ते मुंबई गाडी त्याच दिवशी दु. ३ वा. सुटून मुंबईला पहाटे ३.४० वा. पोहोचेल. गाडी क्र. ०१००७ मुंबई ते सावंतवाडी जादा फेऱ्या ६ ते २७पर्यंत दर गुरुवारी रात्री १२.२० वाजता सुटून सावंतवाडीस दु. २.१० वा. पोहोचतील.
परतीच्या प्रवासासाठी गाडी क्र. ०१००८ सावंतवाडी ते मुंबई गाडी गुरुवारी दु. ३ वाजता सुटून मुंबईला पहाटे ३.४० वाजता पोहोचेल. या गाडीला दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, वलिवडे, राजापूर, वैभववाडी, नांदगाव, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, झाराप स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे. मुंबई-रत्नागिरी-पनवेल गाडीच्या २२ फेऱ्या ५ ते १५ सप्टेंबरमध्ये चालतील. गाडी क्र.०१०३३ सीएसएमटी-रत्नागिरी गाडी स. ११.३० वाजता सुटून त्याच दिवशी रात्री १० वाजता पोहोचेल. परतीच्या मार्गावर गाडी क्र. ०१०३४ रत्नागिरी-पनवेल गाडी रात्री १०.५० वाजता सुटून पनवेलला दुसऱ्या दिवशी स. ७.०५ मिनिटांनी पोहोचेल. पनवेल-सावंतवाडी-मुंबई गाडीच्या २२ फेऱ्या ७ ते १७ सप्टेंबरमध्ये चालतील.
गाडी क्र. ०१०३५ पनवेल-सावंतवाडी गाडी. स. ७.५० वाजता सुटून त्याच दिवशी रात्री १० वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी गाडी क्र. ०१०३६ सावंतवाडी-मुंबई गाडी रात्री ११ वाजता सुटून सीएसएमटीला दुसऱ्या दिवशी दुपारी १२.२५ वाजता पोहोचेल. एलटीटी-रत्नागिरीमध्ये एसी डबल डेकर एक्स्प्रेसच्या ४ ते १८ सप्टेंबरमध्ये सहा फेऱ्या होतील. गाडी क्र.०११८७ एलटीटी-रत्नागिरी एसी डबल डेकर पहाटे ५.३३ वाजता सुटून रत्नागिरीला दुपारी २.३० वाजता पोहोचेल. गाडी क्र. ०११८८ रत्नागिरी-एलटीटी एसी डबल डेकर दु. ४.२० मिनिटांनी सुटून एलटीटीला रात्री १२.३० वाजता पोहोचेल. या गाडीला ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली, संगमेश्वर येथे स्थानकात थांबा देण्यात येणार आहे. रत्नागिरी ते पुणे, पनवेल ते रत्नागिरी आणि पुणे ते झाराप ते पुणे गाडय़ांचाही विस्तार करण्यात आला आहे.

