पालिका मुख्यालयाभोवती सुरक्षा कडे उभारणार!

Netive News Portal
marathi.netive.in
Published in
2 min readSep 28, 2019
पालिका मुख्यालयाभोवती सुरक्षा कडे उभारणार!

नवी मुंबई — माजी पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या काळात संपूर्ण मुख्यालय बॉम्बस्फोटाने उडवून देण्याची धमकी दिल्यानंतरही कोणतीही कायमस्वरूपी सुरक्षा यंत्रणा न उभारलेल्या नवी मुंबई पालिकेने आता बेलापूर येथील मुख्यालयाभोवती त्रिस्तरीय सुरक्षा यंत्रणा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी लवकरच सुरक्षायंत्रणा व विभाग अधिकाऱ्यांची एक बैठक आयोजित करण्यात येणार आहे.

मुख्यालय आवार, मुख्य प्रवेशद्वार आणि इतर दोन प्रवेशद्वारांवर सुरक्षा मंडळ व पालिकेचे काही सुरक्षा रक्षक तैनात आहेत. मुख्य प्रवेशद्वाराजवळ पालिकेत येणाऱ्या वाहनांचे क्रमांक नोंद करून ठेवणे, दुसऱ्या प्रवेशद्वाराजवळ पालिका अधिकारी व पदाधिकाऱ्यांचे दरवाजा उघडून आगत-स्वागत करणे आणि त्यांना नमस्कार करणे, तर तिसऱ्या प्रवेशद्वाराजवळ ठेवण्यात आलेला स्वयंचलित गतिरोधक उघडणे इतकीच कामे या सुरक्षा रक्षकांना देण्यात आलेली आहेत. मुख्यालय इमारतींची सुरक्षा यंत्रणा तशी वाऱ्यावर असल्याचे दिसून येते.

माजी पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अनेक धाडसी निर्णय घेतले होते. त्यात बेकायदेशीर बांधकामांवर धडक कारवाईचा बडगा उगारण्यात मोठा पुढाकार होता. त्यामुळे संतापलेल्या भूमाफियांनी मुख्यालय बॉम्बने उडवून देण्याचे पत्र पाठविले होते. त्यानंतर काही दिवस मुख्यालयाला पोलिसांचा बंदोबस्त देण्यात आला होता. दहा महिन्यात मुंढे यांची बदली झाली आणि ही सुरक्षा पुन्हा ऐरणीवर आली.

नव्याने पालिका आयुक्तपदाचा पदभार स्वीकारलेल्या अण्णासाहेब मिसाळ यांच्या ही ढिसाळ सुरक्षा लक्षात आली आहे. काही दुर्घटना घडल्यानंतर उपाययोजना करण्याऐवजी प्रतिबंधक उपाययोजना म्हणून मंत्रालय व मुंबई पालिकेच्या धर्तीवर नवी मुंबई पालिका मुख्यालयाची सुरक्षा यंत्रणा उभारण्यात येणार आहे.

मुख्य प्रवेशद्वारावर प्रत्येक वाहनाची तपासणी केली जाणार आहे. त्यानंतर दुसऱ्या इमारत प्रवेशद्वाराजवळ प्रत्येक व्यक्तीची लाय डिटेक्टरने अंगझडती घेतली जाणार आहे. सोबत असलेल्या पिशव्या ह्य़ा स्वयंचलित यंत्रणेमध्ये तपासणीसाठी टाकल्या जाणार आहेत. त्यानंतर त्या व्यक्तीला इमारतीत प्रवेश दिला जाणार आहे. नगरसेवक, अधिकारी व पत्रकारांना पालिकेची ओळखपत्रे दिली जाणार असल्याने त्यांनी ती दर्शनी भागात लटकवली अथवा दाखवली की त्यांचा प्रवेश सुकर होणार आहे. राज्याचे मंत्रालय आणि मुंबई पालिकेत अशाच प्रकारे सुरक्षा यंत्रणा उभारण्यात आली आहे. त्याच धर्तीवर ही यंत्रणा राहणार आहे.

नवी मुंबई पालिका मुख्यालयच नाही तर पालिकेच्या सर्व मालमत्तांचा सुरक्षा आढावा घेतला जाणार आहे. आयुक्त याबाबत सकारात्मक आहेत. सुरक्षा ही काळाची गरज असून प्रतिबंध म्हणून काही उपाययोजना हाती घेतल्या जाणार असून यावर येत्या ३ ऑक्टोबर रोजी सर्व विभाग अधिकाऱ्यांबरोबर एक प्राथमिक बैठक होणार आहे. –संध्या अंबादे, साहाय्यक आयुक्त (सुरक्षा) नवी मुंबई पालिका

--

--