पुण्यात पावसाचे थैमान; ९ जणांचा गेला बळी

Netive News Portal
marathi.netive.in
Published in
1 min readSep 26, 2019
बळी

पुणे — बुधवारी रात्री पावसाचा जोर वाढल्याने हाहा:कार उडाला असून अनेक रस्ते व वस्ते पाण्याखाली गेले आहेत. पावसामुळे घाबरलेल्या नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. आतापर्यंत रौद्र रूप धारण करत पावसाने एकूण ९ जणांचे बळी घेतल्याची माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त डी. वेंकटेशम यांनी दिली. रात्री अरण्येश्वर परिसरातील टांगेवाले कॉलनीत प्रथम पाच जणांचे मृतदेह आढळले. तर ३ ते ४ जण वाहून गेल्याची भीती व्यक्त होत होती. मात्र, मृतांचा आकडा ९ वर पोहोचला आहे. दरम्यान, कात्रज परिसरात नवीन बोगद्याजवळ महामार्गावर दरड कोसळल्यामुळे पुणे-बेंगळुरू महामार्गावरील वाहतूक ठप्प आहे.

रेसकोर्स जवळील चिमटा वस्ती भागात अनेक घरे पाण्याखाली गेली. याबाबत रात्री बाराच्या सुमारास लष्कराच्या दक्षिण कमांडला माहिती देण्यात आली. त्यानंतर जवानांनी तातडीने धाव घेत बचावकार्य सुरू केले. या भागातून ५०० नागरिकांना पाण्यातून सुरक्षितपणे बाहेर काढून जवळच्याच सेंट पॅट्रिक चर्च येथे आणण्यात आले आहे. दांडेकर वस्ती, आंबील ओढा परिसरातील घरांत पाणी शिरल्यामुळे तेथील रहिवाशांना राष्ट्र सेवा दलाच्या निळू फुले कला मंदिरात हलविण्यात आले आहे.

पुणे-सातारा मार्गावर वेळू गावच्या हद्दीत पूरसदृष्य स्थिती आहे. तिथे एक ओम्नी कार वाहून गेली असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पुरंदर तालुक्यात अतिवृष्टी झाली असून नाझरे धरणातून सुमारे दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली.

--

--