विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी राष्ट्रवादीची साथ सोडण्याचा निर्णय

Netive News Portal
marathi.netive.in
Published in
1 min readSep 13, 2019
विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी राष्ट्रवादीची साथ सोडण्याचा निर्णय

मुंबई — राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला लागलेली गळती सुरूच आहे. उदयनराजे भोसले यांनी भाजपामध्ये प्रवेश करण्याचे जाहीर केल्यानंतर विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी राष्ट्रवादीची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. फलटण येथील निवासस्थानी गुरुवार सायंकाळी झालेल्या बैठकीत त्यांनी राष्ट्रवादी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. रामराजे नाईक निंबाळकर शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत रामराजे आपला निर्णय जाहीर करणार आहेत.

फलटण येथे झालेल्या बैठकीला रामराजे, संजीवराजे, रघुनाथराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, सदस्य दत्ता अनपट, बाळासाहेब सोळस्कर, मंगेश धुमाळ यांच्यासह फलटण मतदार संघातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. गेल्या काही दिवसांपासून रामराजेंच्या पक्षांतराच्या चर्चा होत्या. अखेरीस गुरूवारी त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासारख्या दिग्गज नेत्याने पक्ष सोडण्याच्या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच अडचणीत आली आहे.

दरम्यान, गुरूवारी सातारा येथील खासदार उदयनराजे भोसले यांनीही राष्ट्रवादीला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एका दिवसांत राष्ट्रवादीला दोन मोठे धक्के बसल्याचे बोलले जात आहे. उदयनराजे भाजपात प्रवेश करणार आहेत. दिल्लीत पंतप्रधान मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत ते शनिवार १४ सप्टेंबर रोजी भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

--

--