स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या निमित्ताने मधुराणी गोखले प्रभुलकरशी साधलेला खास संवाद

Marathi PR
Marathi PR News
Published in
3 min readDec 21, 2019

स्टार प्रवाहवर २३ डिसेंबरपासून सायंकाळी ७.३० वाजता सुरु होणाऱ्या ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अरुंधतीची व्यक्तिरेखा साकारणार आहे अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर. आईच्या भावविश्वाचा शोध घेणाऱ्या या भूमिकेविषयी मधुराणी गोखले प्रभुलकर यांच्याशी साधलेला हा खास संवाद

आई कुठे काय करते या मालिकेविषयी काय सांगाल?

आई आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग. आई या शब्दाभोवतीच इतक्या भावभावना जोडलेल्या असतात. अगदी कवितेच्या माध्यमातून सांगायचं झालं तर मी म्हणेन, ‘तुझ्या पोटावरच्या माझ्या जन्मखुणा तू दाखवल्या नाहीस कधी मातृत्वाचे उपकार म्हणून, ठेवला नाहीस जमाखर्च पदारआडून दिलेल्या दानाचा आणि पदर मोडून दिलेल्या धनाचा,तुझ्या हातावर नाही आहेत आता खुणा मला न्हाऊ माखु घातल्याच्या, तुझ्या डोळ्यात नाही आहेत सुगावे माझ्या दुखण्या खुपण्यात रात्री जागल्याचे…इतकी कशी बेहिशेबी गं तू? मी मात्र तुला आणलेल्या औषधांचा हिशोब ठेवलाय काल डायरीत… सांग ना आई कसा उतराई होऊ सांगना आई तुझी आई कसा होऊ…’या ओळीच खरतर खूप काही सांगून जातात. आपल्यासाठी आयुष्यभर झटणाऱ्या आणि तरीही कायम दुर्लिक्षित राहणाऱ्या आईची गोष्ट म्हणजे ‘आई कुठे काय करते’ ही मालिका. या मालिकेचं वेगळेपण जसं नावात आहे तसंच सादरीकरणामध्येही आहे. प्रोमोपासून ते जपण्याचा आम्ही प्रयत्न केलाय. मालिका पहाताना हा वेगळेपणा तुम्हाला नक्कीच जाणवेल. अर्थातच याचं श्रेय जातं स्टार प्रवाह वाहिनी, निर्माते राजन शाही, दिग्दर्शक रवी करमरकर, आमची लेखिका रोहिणी निनावे आणि मालिकेच्या संपूर्ण टीमला.

या मालिकेच्या निमित्ताने तुमचं मालिका विश्वात कमबॅक होत आहे त्याविषयी…

खरंय जवळपास १० वर्षांनंतर मी मालिका करते आहे. अर्थातच १० वर्षांचा हा गॅप आईपणासाठीच घेतला होता. मला सहा वर्षांची मुलगी आहे. तिच्या जन्मानंतर तिला वेळ द्यायचं हे मी ठरवलं होतं आणि तिच्या संगोपनासाठी पूर्णपणे स्वत:ला झोकून दिलं. आई कुठे काय करते मालिकेचा विषय आणि त्याची मांडणी मला खूप आवडली आणि मालिका करण्याचा मी निर्णय घेतला.

मालिकेत तुम्ही साकारत असलेल्या भूमिकेविषयी काय सांगाल?

या मालिकेत मी अरुंधतीची भूमिका साकारते आहे. अरुंधती प्रचंड हळवी आहे. सर्वांवर भरभरुन प्रेम करणारी. माझा जन्म सर्वांना प्रेम देण्यासाठी झालाय, त्यामुळे मी चिडणार नाही कुणाच्याही बोलण्याचा त्रास करुन घेणार नाही असं तिने मनाशी पक्क ठरवलं आहे. तिचं समर्पण तिचा सोशिकपणा ही तिची शक्तीस्थानं आहेत. मनाने अतिशय निर्मळ आणि भाबडी असणाऱ्या या अरुंधतीत प्रत्येकजण आपली आई नक्कीच शोधेल. खास बात सांगायची म्हणजे मला आणि अरुंधतीला जोडणारा समान धागा म्हणजे गाण्याची आवड. मला गाण्याची आवड आहेच अरुंधतीलाही गाण्याची आवड आहे. त्यामुळे भूमिका साकारताना मी अरुंधतीत स्वत:ला शोधण्याचा प्रयत्न करते.

तुमच्या आईविषयी…

माझी आई हा माझ्या आयुष्याचा महत्त्वपूर्ण भाग आहे. माझी आई शास्त्रीय संगीत गायिका आहे. पण आपल्या कलेला नेहमीच दुय्यम स्थान देऊन तिने आपलं मातृत्व आणि सर्व जबाबदाऱ्या मनापासून पार पाडल्या. घरसंसार सांभाळताना तिची आवड मागे पडली याची मला खंत आहे. आईचं समर्पण शब्दात व्यक्त करणं केवळ अशक्य आहे. त्यामुळे घरासाठी, मुलांसाठी आयुष्यभर राबणाऱ्या या माऊलीचं महत्त्व पटवून देणारी ‘आई कुठे काय करते’ ही मालिका म्हणूनच माझ्यासाठी खुप खास आहे. तेव्हा पाहायला विसरु नका २३ डिसेंबरपासून सायंकाळी ७.३० वाजता ‘आई कुठे काय करते’ फक्त स्टार प्रवाहवर.

--

--

Marathi PR
Marathi PR News

मराठी PR ... नावातच सगळं आलं... Email : info@marathipr.com