Two Poems

Mehfil
Mehfil
Published in
1 min readAug 29, 2020

By Rhushikesh Kharkar

Poem 1:

ना आस कोण्या वैभवाची
मी कालचा कंगाल आहे
आज मजवर आणता
व्यर्थ ही जप्ती कशाला?

अनुभवू दे शाप सारे
आपल्याच माणसांचे
सोसू दे साऱ्या क्षणांना
इतक्यात ही मुक्ती कशाला?

भरकटून आज थोडे
तोल शब्दांचा ढळू दे
बंधने साऱ्या जगाची
पाळण्याची सक्ती कशाला?

Poem 2:

इतकेच होते कातरवेळी न चुकता नेमाने
रंग उन्हाचा गालांवरती, ओठी हिरवे गाणे

चार सावल्या सैरावैरा दारी शोधत येती
निखळून गेला का एक चांदवा वाऱ्याने

काजळलेल्या भिंतीमध्ये जीर्ण दिव्याचे मर्म
सांगुन जाती मूक कवडसे हलक्या स्पर्शाने

दक्षिण-उत्तर पसरत जाते काळोखाचे अस्तर
काठ जरीचा त्यावर होते पश्चिम गोजिरवाणे

About Author: ऋषिकेश खारकर

एक बेफिकिर,

नदीच्या लाटांवर, उन्हाच्या वाटांवर, मनाच्या काठावर, नाजूक ओठांवर, रेशमी बटांवर अगदी चहाच्या कपावरही काहीतरी लिहायला पाहिजे असं म्हणत “वेळ कुठेय यार!!” अस बोलून हात वर करायचे अन पुन्हा आपलं जॉब/घर/नेटफ्लिक्स/झोप etc कडे वळायला मोकळे! या सगळ्या प्रपंचातून एक दिवस पाऊस पडतो, खिडकीत वाफाळलेला चहाचा कप घेऊन बराच वेळ उभे असताना सुचते काहीतरी. मग तेच काढायचे कागदावर चहावरच्या सायीसारखे अलगद! आणि हेच ते जे काय उरते यातून त्यालाच म्हणायचे कविता अन अश्या त्या कवितेचा जर जमलीच असेल ठीकठाक, तर मी कवी!

--

--