कट्यार पुन्हा एकदा…

Sthitapradnya
Rasik
Published in
8 min readNov 29, 2015

कट्यार. ह्या चित्रपटाबद्दल बरंच काही लिहून झालेलं आहे. अजून बरंच काही लिहिलं जाणार आहे. मी देखील इंग्रजी मधून त्यावर लिहिलं आहे. तेंव्हा मी नाटक पाहिलेलं नव्हतं. मग मी नाटक पहिलं, चित्रपट परत एकदा पहिला. माझ्या आधीच्या लेखानंतर काहीजणांनी मराठीतून लिहिण्यासाठी सुचवलं होतं. मलाही ह्या चित्रपटाबद्दल, ज्याची मराठीशी, महाराष्ट्राच्या संस्कृतीशी असलेली नाळ पाहता मराठीतून लिहावसं वाटत होतंच. म्हणून पुन्हा एकदा कट्यार. इंग्रजीत लिहिलेल्या लेखाचा हा अनुवाद नाही. मराठीतून कट्यारच्या गाण्यांबद्दल ती चित्रपटात जशी येतात त्या नुसार लिहित जातो. त्या अनुषंगाने नाटक आणि चित्रपट दोन्हीवर काहीतरी येईलच. हा एका सामान्य श्रोत्याचा दृष्टीकोन आहे, एका संगीतज्ञाचा अजिबात नाही. त्यामुळे चुका झाल्या असतील तर निःसंकोचपणे सुधाराव्या. आणि हो, पुढे सर्व कथा मांडलेली आहे, Spoiler म्हणतात ते सर्व आहेत.

सर्वप्रथम शंकर महादेवन यांनी गायलेला ‘सूर निरागस हो’ हे गाणं प्रसारित झालं. त्यातलं नाविन्य भावलं असूनही कट्यारच्या मूळ बाजाला तर धक्का लागणार नाही ना, अशी एक शंका होतीच. मग सचिनची खांसाहेबांसाठी झालेली निवड अजूनच अस्वस्थ करून गेली. प्रेक्षागृहात गेलो आणि सदा सर्वदाच्या मंगल स्वरांनी त्या सर्व शंका गळून पडत गेल्या. सूर निरागस हे अतिशय निरागस गाणं आहे. सर्वसामान्यांसाठी मंदिरात गायलेलं ते एक गोड भक्तीसंगीत आहे. त्यात गायकीच्या फिरतीचा अविष्कार नाही. ते गाणं सर्वांसाठी एक स्वागतगीत आहे. ईशस्तवनाची परंपरा राखणारं, प्रेक्षकाला उचलून अलगद विश्रामपुरच्या संपन्न आणि कलासक्त समाजजीवनात घेऊन जाणारं आहे. पंडितजींच्या कोमल आणि सुस्वभावाची ओळख करून देणारं हे गीत सुरुवात अतिशय छान करून देतं. नाटकात पंडितजी नाहीत. त्यांचा फक्त संदर्भ येतो. फक्त संदर्भातून, लोकांच्या मनातील प्रतिमेला धक्का न लावता, चित्रपटासाठी एक अत्यंत लाघवी पंडितजी उभे करणे हे आव्हान होतंच जे शंकर महादेवन ने समर्थपणे पेललं. ह्या गाण्याची त्यात त्यांना खूप साथ झाली हे नक्की.

त्यानंतर येतं ते तेजोनिधी लोहगोल. मैफिलीतलं, बैठकीचं. ह्या गाण्यात गायकी आहे. फिरत आहे, आणि ते गीत म्हणून उत्कृष्ट आहेच. नाटकात मूळ खासाहेबांच्या आवाजातलं गाणं पंडितजींच्या गायकीवर घेताना गायकीवर वेगळेपणाचे संस्कार केलेलं. मूळ गाण्यात गायकाच्या ताकदीचा आणि सूर्याच्या तेजाचा अविष्कार करणारं गाणं थोडं आर्जवाकडे आणि आर्ततेकडे झुकलेलं. सूर निरागस वरून हळू जरा खोलात घेऊन जाणारं. पंडितजींच्या गायकीचे पैलू हळू हळू मोकळे करून सांगणारं. इथे खासाहेबांचा प्रवेश. एखाद्याला पोहता येत नसेल, किंवा सवय वर्षांपूर्वी मोडलेली असेल तर लगेच ८ फूट खोलात टाकत नाहीत, कट्यारचं थोडं तसंच आहे. धडकन अंगावर येतं ते दिल कि तपिश. संगीताला थोडेसे सरावलेले कान घेऊन श्रोता तयार असताना.

गायकीला योग्य सन्मान न मिळाल्याने दुखावलेला, व्यथित झालेला एक गायक आपला उद्वेग ओघवत्या शैलीत मांडतो आहे. दिल कि तपिश. बिछडे सगळे सपने असं त्याचं रुदन व्यथित करत असताना आपण दरबारातील ऐश्वर्य डोळ्यात साठवून घेत असतो. एका साध्या झोपडीत राहून दिवसरात्र स्वतःच्या गायकीशी आणि संगीताशी एकनिष्ठ राहणारा गायक भर दरबारात राजगायकालाच आव्हान देतो आणि आहे नाही ते सर्व त्या गाण्यात ओततो. ही त्याची अवस्था कुठेतरी नंतर येणाऱ्या सदाशिवच्या गाण्याशी मिळती जुळती आहे. दिल कि तपिश मध्ये उद्वेग आहे आणि स्वतःच्या गायकीचा, घराण्याचा अभिमान सुद्धा. ते गाणं धडकन अंगावर येतं असं म्हणालो ते त्यामुळे. बिछाडे सपने असं म्हणताना गायक कुठेतरी समाजाला त्यासाठी जबाबदार धरत असल्याची तीव्रता आहे त्यात. मधेच पहिल्या पावसाचा आणि मृद्गंधाचा वर्णन करताना कातर होणारं गाणं पुन्हा समेवर येताना मानी होतं, धारदार होतं. अश्या गायकीला टाळ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद न मिळता तरच नवल. बाहेरून दाद देणारी मंडळी मनातून थोडीशी भांबावलेली आहेत त्यांना मृदूपणे जवळ घेतं ते घेई छंद मकरंद.

दरबारात भरून राहिलेला विखार आपल्या पहिल्या आलापात नाहीस करणारं पंडितजींचं गाणं. राजकवी म्हणतो ते काही चूक नाही. काही आविष्कारांना फक्त डोळ्यांनी दाद दिली जाते. पंडितजींचं ‘घेई छंद’ हे मूर्तिमंत आर्तता, थोडं करुण. उद्वेगातून उन्मनी अवस्थेत नेणारं. तार सप्तकाच्या ‘मिटताऽऽ’ मध्ये संपूर्णपणे घायाळ करून गारद करणार ते घेई छंद. कमळाच्या कोमल पाकळ्यांना पोखरून बाहेर न पडू शकणाऱ्या भुंग्याची मानसिक तळमळ दाखवणारं. पण अश्या अवस्थेत अडकूनही त्यात कुठे राग नाही. आहे ते फक्त आर्जव. त्या भावनिक समाधीतून सर्वप्रथम बाहेर येतात ते खासाहेब. कदाचित ते त्या गायकीला आपल्या मनात पोहोचू देतच नाहीत. ते त्यातला आशय वगळून गायकीच्या बांधणीची उकल करत बसतात. गाणं संपल्यावर लगेच मनातल्या मनात तुलना करून मोकळे होतात. आणि म्हणूनच राजाचा निर्णय त्यांना स्तिमित करून जातो. तसं पाहायला गेलं तर दोघंही अडकलेले, एक तो भुंगा आणि एक खासाहेबांची गायकी पण परिणाम साधला जातो तो महत्वाचा, अनुभव महत्वाचा. खासाहेबांना हे उकलत नाही ते नाहीच. आर्जव ह्या भावनेशी ओळख नाहीच म्हणून गाणं म्हणजे बांधणी, गाणं म्हणजे घराण्याची शिस्त अश्या नियमांच्या चौकटीतील त्यांचं गाणं.

हा दरबारातला प्रसंग प्रेक्षकांसाठी जड आहे, हे जाणून घेऊन मग चित्रपट थोडा गद्याकडे वळतो. थोडी कथा सागत पुढे जातो. पंडितजी म्हणजे फक्त आर्जव नाही तर प्रेम आणि थोडा मिश्कीलपणा सुद्धा. मन मंदिरा वेगळ काय सांगतं? छोट्या सदाशिवला शिकवतानाचं गाणं सहज आणि सुंदर. त्यात स्वरावली आहे. मार्दव आहे, अवखळपणा आहे. ते गाणं संपूर्णपणे शंकर महादेवनचं आहे. त्याच्या गायकीसाठी बनलेलं आहे. सुंदर स्वराचे आरोह आणि अवरोह आहेत. दारात तोरणं बांधावीत तशी एकसंधता आणि प्रसन्नता आहे. CGI चा उत्कृष्ट वापर ह्याच गाण्यात येतो. हे गाणं बऱ्यापैकी स्वप्नील आहे. त्याचे शब्द प्रोत्साहनपर आहेत, मनाला उभारी देणारे आहेत. मग त्या मागोमाग छोट्या सदाशिव ने केलेला स्तुत्य प्रयत्न पण येतो. त्याचा संगीताचा प्रवास सुरु झाला हे दाखवण्यासाठी ते पुरेसे आहे.

पुन्हा एकदा घेई छंद. पंडितजींच्या आवाजातला तो लाघवी भृंग गायब आणि त्याची जागा एका वेगळ्याच कोणीतरी घेतली आहे. पंडितजींच्या भृंगाने कुठेतरी अवस्था मान्य केल्याची जाणीव आहे तर खांसाहेबांचा भृंग झगडतो आहे. १४ वर्ष भोगायला लागलेल्या यातनांचं उत्तर शोधत आहे. स्वतः अडकलेल्या बंदिखान्यातून सुटण्याची धडपड करतो आहे. संपूर्णपणे हरलेला तो, नवीन काही सुचेनासं झालेला तो ही अवस्था मान्य करू शकत नाही. तो भृंग असा नाहीच. ती खासाहेबांची गायकी आहे. कुठेतरी स्वतःचा आत्मसन्मान राजगायकाच्या पदवीत शोधणारी गायकी. घराणे आणि शिस्तीच्या चौकटीत बंदिस्त आणि जगन्मान्यतेला आसुसलेली. शंकर महादेवननी फक्त चेहेऱ्यावर मांडलेल्या भावना काळजाला हात घालतात. आपलीच बंदिश आपल्याच समोर दुसऱ्या गायकीने अर्थहीन केलेली. आर्ततेतून तामसाकडे झुकलेली आणि आपण काही करण्यास असमर्थ ही विषण्णता त्यांच्या चेहऱ्यावर कोणालाही वाचता येईल अशी. तरी त्या मुरलीधराची लीला म्हणून कट्यार खासाहेबांना देताना ‘इदं न मम’ म्हणणारी निःस्वार्थता. दरबार पुन्हा एकदा पंडितजींनी जिंकलेला असतो. ह्यात काहीच दुमत नाही.

आपल्याच पत्नीने केलेला असा द्रोह, १४ वर्षांच्या अथक प्रयत्नांना मिळालेलं यश, तेही डागाळलेलं. त्या तशा विजयाची परत परत आठवण करून देणारा तो राजगायकाचा महाल. त्यात दिसणारे, ऐकू येणारे पंडितजींचे सूर. भावनांचा नुसता कल्लोळ. पण गायकीचा अभिमान, घराण्याचा सन्मान. कुठेतरी स्वतःला मिळालेली पत कर्तृत्वाने मिळाल्याची एक भावना, ज्याला इतरांच्या दूषणावह मदतीचा लागलेला हात. निस्सीम, निसंशय विजयश्री तरिही दूर आणि ती मिळवण्याची शक्यता धुळीस मिळालेली. हा विजय? हा असा? आनंद नसलेला. नुसते पद, जगन्मान्यता नाही. त्यासाठीच तर केला होता अट्टाहास. पार मिरजेहून इथवर येण्याचा. पण आता? वार्षिक दसऱ्याच्या सभेला प्रतिस्पर्धी असा कोणी नाही आणि गायकीवर लागलेला डाग धुवून काढण्याची क्षमता असूनही शक्यता नाही. तरी रोज इथेच ह्याच वाड्यात त्याच आठवणीचे, त्याच सुरांचे भेसूर नजराणे? सूर से सजी संगिनी, हो सुरमयी स्त्री आणि खंजीर सुद्धा, जा इथून जा. तुझे सर्व रंग रूप घेऊन जा. माझा शापही घेऊन जा…. अब मेरी तनहाई हो नाम तेरे…

डोळ्यात टचकन पाणी आणणारं गाणं आहे हे. चक्क दुर्दैवाला संगीतबद्ध केलं तर कदाचित असं ऐकू येईल. तरी त्या गाण्यात शिस्त आहे बांधणी आहे. तालाच्या कोष्टकांनी सुरू होणारा गाणं संपतं तेंव्हाही ताल. गायकी अजून अडकलेली. दुर्दैव, दुर्दैव ते ह्या परीस कोणते? सूर से सजी संगिनी हे अतिशय परिणामकारक गाणं आहे. इथे मी मूळ ‘या भवनातील गीत’ ची आठवण काढत होतो. पण माझा एक मित्र म्हणाला त्याप्रमाणे, चित्रपटात खांसाहेबांना मराठी संवाद नाहीत. त्यांना या भवनातील देणं पटकथेशी विसंगत ठरलं असतं हे नक्की. एवढा विचार करून हा चित्रपट बनवला गेला आहे आणि म्हणून त्यांना ते गाणं चित्रपटाबाहेर ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागला. तेजोनिधी पण पंडितजींच्या आवाजात आहे. खांसाहेबांच्या नाही. जुन्या जाणत्या प्रेक्षकांना ‘या भवनातील’ ऐकू येतच असेल आणि तरीही सूर से सजी संगिनी ने आपला परिणाम करणं अतिशय कठीण आव्हान होतं जे राहुल च्या गायकीने सार्थपणे पेललेलं आहे.

दिन गेले आणि मुरलीधर श्याम ह्या बंदिशी थोड्या सहज आहेत. त्या वेळी कथेला अग्रस्थान आहे. ही दोनही गाणी थोडी मागे राहतात, परिणामकारक पण नेपथ्यासारखी. भोला भंडारी ह्या गाण्याबद्दल लिहिण्यासारखं माझ्याकडे फार काही नाही. पूर्ण चित्रपटातील सर्वात कमी ताकदीचं आणि ह्याची खरच गरज होती का असा प्रश्न विचारायला लावणारं हे गाणं आहे हे नक्की. कुठल्यातरी साध्या मराठी चित्रपटात किंवा बॉलीवूड मध्ये सहज खपून गेलं असत, पण कट्यार ची धार बोथट करण्यावाचून इतर काहीच ह्या गाण्याने केलेलं नाही. त्यातून हा एक संगीतप्रधान चित्रपट. गायकांचे आवाज एव्हाना नटांशी समरस झालेले असतात. अश्या वेळी अगदी वेगळे गायक वापरून सगळ्याचा हिरमोड का हा एक अनुत्तरीत प्रश्न आहे खरा. असाच प्रश्न यार इलाही बद्दल पण विचारता येतो.

यार इलाही ही एक सुंदर जमलेली कव्वाली आहे. अतिशय सुंदर आणि विचार करायला लावणारे शब्द आहेत हे नक्की. पण मासा कितीही चांगला असेल तरी वरण भातात घालत नाहीत, तसं काहीसं हे गाणं ऐकताना वाटत. पुन्हा गायक वेगळा असल्याने तो एक धक्का आहेच. राहुल देशपांडे अनेक संगीतप्रकार लीलया हाताळतो. त्याला हे गाणं न देण्यामागचं प्रयोजन माझ्या कल्पनेपलीकडे आहे. ह्या गाण्यातली खासाहेबांची गायकी बरीच वेगळी आहे. हे गाणं अजून थोडं वेगळं असू शकलं असतं हे नक्की.

सुरत पिया बिन… आहाहा…. हे गाणं अगदी वसंतरावांच्या काळात घेऊन गेला हे नक्की. नाटकाचा चित्रपट बनवताना ह्या गाण्याला जराही धक्का लावलेला नाही. पण तरी एवढ्या लवकर ते आटोपलेला आहे कि मनस्वी राग आला. दोनही गायकी आणि फक्त २.५ मिनिटात? हा अन्याय आणि अपमान दोन्ही आहे. अरुणी किरणी हे अतिशय सुंदर आहे पण सुरत पियाचा जवळ जवळ बळी देऊन का? शिव भोला भंडारी हे तद्दन साधारण दर्जाचं गाणं पूर्ण काढून तो वेळही सुरत पिया ला देता आला असता. ही एक वाईट चव ह्या चित्रपटाबद्दल कायम राहील हे नक्की.

महेश काळे हा एक प्रतिभावान गायक आहे. त्याने नाटकात सदाशिवचं काम केलेलं होतं. आणि चित्रपटात त्याने त्याला आवाज दिला. अरुणी किरणी अतिशय जबरदस्त जमून आलेलं आहे. स्पष्ट शब्दोच्चार, अतिशय द्रुत लयीत बांधलेला गाणं अंगावर रोमांच उभे करतं. आधीच दरबारात भावनेच्या उत्तुंग क्षणी येणारं हे गाणं त्या अनुभवाला पराकोटीच्या उंचीवर नेऊन ठेवतं. त्यात अतिशय फक्कडपणे जमून आलेली सतार. जोडीला सुबोध भावेचा समरस होऊन केलेलं अभिनय. एक सूर से सजी संगिनी आणि हे. ही दोन गाणी डोळ्यातून पाणी न आणतील तर नवल. हे गण एक अनुभव आहे. दरबारातील सर्व श्रोते, राजा आणि राणी, स्वतः पंडितजी समोर बसलेले अन सदाशिव गातो, बेभान होऊन, जग विसरून गातो. हाच बेभानपणा दिल कि तपिश मध्ये थोडासा आहे. पण त्यात बरोबरीने स्वतःच्या गायकीबद्दचा किंचित गर्व आहे. अरुणी किरणी मध्ये ‘मी’ नाही. ग ची बाधा नाही. आहे नाही ते सर्वस्व एका ह्या क्षणात संपूर्णपणे अर्पण करण्याची तयारी आहे. गुरुकृपेची इच्छा असली तरी ती निरपेक्ष आहे. हाच त्या दोन गाण्यातला फरक.

[img]http://i.imgur.com/FRCQnXb.jpg[/img]

गाणी संपली आणि कट्यारही. स्वरकट्यार एव्हाना पार काळजाच्या आरपार गेलेली होती. बाहेर पडताना काही विचार मनात येत होते. सुरत पिया बद्दल रागही होता. पण मग चित्रपट म्हणून विचार केला आणि माफ करायचं ठरवलं. एक मात्र जरूर की हीच सर्व गायक मंडळी घेऊन एक सविस्तर गाण्यांची CD काढायला हवी. ज्यात प्रत्येक गाण्याला त्याचा पूर्ण सन्मान मिळेल. १०-१० मिनिटांच्या वर घेई छंद आणि सुरत पिया बिन ऐकायला मिळतील. शंकर एहसान लॉय ने संगीत देताना मूळ संहितेला धक्का लावलेला नाही, किंबहुना काही ठिकाणी केलेल्या नाविन्याचा वापर स्वागतार्ह आहे. उदाहरणार्थ सतारीचा केलेला सुंदर वापर. राहुल, शंकर आणि महेश च्या अवजांबरोबर लक्षात राहते ती तितक्याच ताकदीची सतार. खरच एक CD हवी. ते आता होईलसं वाटत नाही, ही एक हुरहूर राहील ती कायमची.

नाटकाचा चित्रपट बनवताना सुबोध भावे नि काही स्वातंत्र्य घेतलेलं आहे. नाटकात अनेक पैलू असणारी खांसाहेबांची व्यक्तिरेखा बऱ्यापैकी सरळ झाली आहे. नाटकात निरागस आणि साधा असलेला सदाशिव थोडा मानी झाला आहे. त्याचं आणि उमाचं प्रेम पण नाटकात नाही. ह्याचं एकत्रित विचार करता असं लक्षात येतं कि सुबोध ने व्यवसायिकतेकडे लक्ष दिलेलं आहे. अर्थात हे करताना मूळ कलाकृतीला, आशयाला धक्का लावलेला नाही पण आपलं म्हणून त्यात काहीतरी दिग्दर्शक म्हणून टाकलेलं आहे. हे संगीतकारांबद्दल तितकच खरं म्हणावं लागेल.

अर्थात हे नाटक आलं तेंव्हा समाजाची एक सांस्कृतिक पातळी होती. शास्त्रीय संगीतावर आधारीत नाटके समजून त्यांचा आस्वाद घेणारी मंडळी होती. आता तेवढे नाहीत. कट्यार मुख्य प्रवाहात आणून सादर करण्याचे फायदे आहेत. व्यक्तिरेखेवर कमी भर देऊन संगीतावर जास्त भर दिल्याने संगीत नाटक म्हणजे काय ह्याची ओळख होण्यास बराच हातभार लागला. आता या पुढील संगीत चित्रपटांमध्ये (आणि ते येतीलच) संगीताबरोबर व्यक्तिरेखांच्या भावनिक स्तरांवर जास्त मेहेनत घेता येईल. आता लोकांना ओळख असेल, अपेक्षा असेल. साधा विचार करता नाटकात १२ सुरांचा संदर्भ येतो (कोमल आणि तीव्र धरून) आणि चित्रपट ७ सुरांबद्दल बोलतो. हा फरक नजरचुकीने झालेला नाही. मुळात आत्ताच्या पिढीला ह्याची ओळख व्हावी, गोडी लागावी ह्या साठी ह्या पेक्षा जास्त चांगली सुरुवात होणे नाही.

कट्यार सलग ३-४ आठवडे दणक्यात आणि दिमाखात चालत आहे. ह्याने प्रेक्षकांची पसंती कळलेली आहेच. नक्कीच अजून अनेक नाटकं, अनेक पुस्तकं आपल्याला चित्रपटाच्या रुपात पाहता येतील, थोडी वाट पाहूया! नाही का?

--

--